म्हणून मोहम्मद रफींनी ब्रँड न्यू फियाट गाडी ड्रायव्हरला गिफ्ट देऊन टाकली होती.

मोहम्मद रफी यांचं गाणं न ऐकलेला एकही माणूस नसेल. विविध भाषांमध्ये आणि अनेक सिनेमांमध्ये त्यांनी आपला आवाज दिला. लोकांनी त्यांच्या गाण्यावर भरभरून प्रेम केलं. देशभरात अनेक चाहते रफींनी मिळवले. जितके उत्तम आणि पट्टीचे ते गायक होते तितकेच महान ते माणूस म्हणून पण होते. रफी केवळ गायकीसाठीच नाही तर त्यांच्या उदार वृत्तीमुळे देखील ओळखले जायचे. आजचा किस्सा त्यांच्या एका माणुसकीबद्दलचा.

मोहम्मद रफी हे त्या लोकांमधले होते ज्यांना सूट बूट घालून चांगल्यापैकी झकपक राहणं आवडायचं. चांगले आणि चटपटीत पदार्थ खाण्याचा त्यांना शौक होता. यांव्यतिरिक्त बॅडमिंटन आणि पतंग उडवायला रफींना प्रचंड आवडायचं. कार विषयी त्यांना जिव्हाळा होता. नवनवीन गाड्या फिरवायला त्यांना आवडायचं. 

रफींकडे वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक कार होत्या. कार कलेक्शन हा एक वेगळा आणि हटके प्रकार आहे असं त्यांना वाटायचं आणि ते आपली आवड जपत असायचे. तर एकदा झालं असं कि रफीनी नवी कोरी इंपाला कार विकत घेतली होती. त्यावेळी भारतातल्या अगदीच बोटावर मोजण्याइतक्या आणि प्रतिष्ठित लोकांकडे हि इंपाला कार असायची.

आता रफींनी हि कार घेतली खरी पण त्यांच्या ड्रायव्हरला हि नवीन इंपाला गाडी चालवायला जमेना. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्या ड्रायव्हरला गाडी चालवायला जमेना याचं कारण होतं कि इंपालाचं स्टिअरिंग हे डाव्या बाजूला होतं. रफींचा ड्रायव्हर हा कायम उजव्या बाजूला स्टेअरिंग असलेल्या गाड्या चालवण्यात पटाईत होता. 

रफींची ती नवीन गाडी त्या ड्रायव्हरला जमेना. या कारणामुळे रफींनी त्याला नोकरीवरून काढून टाकलं आणि एक नवीन ड्रायव्हरला कामावर ठेवलं. पण त्या जुन्या ड्रायव्हरला काढून टाकल्याने त्यांना मनोमन वाईट वाटले. रफींना आपल्या जुन्या ड्रायव्हरची चिंता वाटू लागली. ते विचार करत होते कि त्या ड्रायव्हरची रोजीरोटी माझ्यामुळे चालत होती. आता त्याची नोकरी गेल्याने तो कुटुंब कसं चालवेल. अशा अनेक प्रश्नांनी रफी बेचैन झाले. त्यांना हे सहन झालं नाही.

मोहम्मद रफींनी मग ७० हजार रुपयांची एक नवीन कोरी फियाट गाडी खरेदी  केली. त्या जुन्या ड्रायव्हरला बोलावून घेतलं आणि ती नवी कोरी फियाट गाडी त्याला बक्षीस म्हणून देऊन टाकली.

आता या फियाट गाडीचा तू मालक आहेस त्यामुळे तू या गाडीवर आपलं पोट भरू शकतो. देव तुझ्या सोबत आहे आणि चांगली मेहनत कर अशा शुभेच्छा सुद्धा दिल्या.

आपल्यावरच मोहम्मद रफींचं हे प्रेम बघून तो ड्रायव्हर रडू लागला. पूर्ण आयुष्यभर तो रफींचे हे उपकार तो विसरू शकला नाही. असे एक नाही तर हजारो किस्से मोहम्मद रफी यांचे आहेत कि त्यातून रफींची महानता कळते आणि ते अनेक लोकांची मदत करायचे.

मोहम्मद रफींची हीच खासियत होती कि ते जितके चांगले गायक होते तितकेच उत्तम ते माणूसही होते. चित्रपट क्षेत्रात दीर्घकाळ काम करूनही त्यांचे कधी कुणासोबत वाद झाले नाही उलट आपल्या आवाजातून ते लोकांना आनंदच देत आले. प्रतिष्ठित आणि उचभ्रु लोकांमध्ये राहूनही त्यांना आपल्यासाठी काम करणाऱ्या सामान्य लोकांची काळजी होती. 

मोहम्मद रफींचे असे अनेक किस्से आहेत ज्यातून त्यांच्या उदारतेचे दर्शन घडते. इतकं मोठं यश मिळवूनही जमिनीवर असणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे मोहम्मद रफी होय.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.