या मराठी क्रांतिकारकाच्या सुटकेसाठी ख्रिश्चन धर्मगुरू पोपला हस्तक्षेप करावा लागला होता.

इंग्रजांनी भारतावर दीडशे वर्ष राज्य केलं पण पोर्तुगीजांनी गोव्यावर जवळपास साडेचारशे वर्ष राज्य केलं.  या गुलामगिरीच्या काळात त्यांनी केलेले अत्याचार इंग्रजापेक्षाही जास्त भयावह होते. लाजेखातर का होईना कायद्याचं राज्य असल्याचा आव आणणाऱ्या इंग्रजांच्या पेक्षा पोर्तुगीज कितीतर पटीने वाईट.

सर्वात प्रथम १५१० मध्ये गोवा विजापूरचा सुलतान आदिल शाह याच्या ताब्यात होते. पोर्तुगीजांनी अल्फोन्सो अल अल्बुकर्क याच्या नेतृत्वाखाली गोव्यावर हल्ला करून गोवा आपल्या ताब्यात घेतलं आणि गोव्यात पोर्तुगीज साम्राज्य स्थापन झाल. 

इंग्रजांच्या तावडीतून १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला पण स्वतंत्र भारतात गोव्याचा समावेश नव्हता. तेव्हा सुद्धा गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. त्यामुळे गोव्यात पोर्तुगीजांविरोधात संघर्ष चालूच होता. अनेक क्रांतीकारी दल यात लढा देत होते. या लढ्यात अग्रगण्य नाव घेतले जाते ते मोहन रानडे यांचे.

मोहन रानडे यांचा जन्म २५ डिसेंबर १९३० रोजी सांगली मध्ये झाला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाबाराव सावरकर ही भावंडे त्यांचा आदर्श होती. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊनच मोहन रानडेनी १९५३ साली आझाद गोमंतक दलात प्रवेश केला. ही सशस्त्र क्रांतिकारी संघटना होती. याच संघटनेच्या माध्यमातून त्यांनी दादरा नगर हवेलीची राजधानी सिल्वासाच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला.

पुढे त्यांच्याकडे गोव्याची जबाबदारी देण्यात आली. तिथे एका मराठी मुलींच्या शाळेवर शिक्षक म्हणून काम मिळाले. दिवसभर शाळेत शिकवणे आणि रात्री क्रांतिकार्याची आखणी करणे हा त्यांचा दिनक्रम असायचा. पण त्यांच्या त्याकाळच्या विद्यार्थिनीच्या म्हणण्यानुसार ते एक अत्यंत प्रेरणादायक शिक्षक होते.

 

गोव्याच्या तरुणांमध्ये राष्ट्रवाद आणि स्वातंत्र्याची इच्छा निर्माण व्हावी म्हणून ते दर शनिवारी सभा घेत असत. आझाद गोमंतक दलाला लागणारा शस्त्रसाठा गोळा करण्यासाठी पोर्तुगीज पोलिसांवर केलेल्या अनेक हल्ल्यात ते सहभागी होते. भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्या एका गोव्याच्या नागरिकाच्या हत्येत सुद्धा त्यांचा सहभाग होता.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रानडे सांगतात की,

 “आम्ही लोकांना एकत्रित करणे सुरु करून गोव्यातील पोर्तुगीजांच्या पोलीस चौक्यांवर सशस्त्र हल्ले करण्यास सुरुवात केली. २ जुलै १९५४ रोजी आम्ही दादरा नगर हवेलीवर हल्ला चढवला आणि २ ऑगस्टला त्यांची मुक्तता केली. दादरा नगर हवेलीवरील हल्ल्याने गोव्यातील स्वातंत्र्य लढ्याला चालना देण्यासाठी नवे सामर्थ्य आणि प्रेरणा दिली.”

ऑक्टोबर १९५५ मध्ये बेटी येथील एका पोलीस चौकीवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात मोहन रानडे जखमी झाले. त्यामुळे ते पोर्तुगीज पोलिसांच्या तावडीत सापडले आणि त्यांना अटक झाली. कटात सहभागी असल्याने त्यांना २६ वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आला. त्यांची रवानगी पोर्तुगाल मधील लिस्बन इथे करण्यात आली.

हजारो कार्यकर्त्यांचे अथक प्रयत्न त्याग आणि बलिदानानंतर १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा पोर्तुगीजांच्या मगरमिठीतून  मुक्त झाला.

गोवा मुक्तीनंतरही मोहन रानडे यांची सुटका झाली नाही. गोव्याच्या लढ्याचा हा स्वातंत्र्यवीर १४ वर्षे पोर्तुगालच्या तुरुंगात खितपत पडला होता. त्यांच्याकडे लक्ष द्यायलाही कोणाकडे वेळ नव्हता. अखेर त्यांचे मित्र जेष्ठ संगीतकार सुधीर फडके यांनी मोहन रानडे विमिचन समिती स्थापन करून या विषयाला वाचा फोडली.  तत्कालीन विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयी यांनी रानडे यांच्या सुटकेचा प्रश्न संसदेत पोहचवला.

इतकच नव्हे तर तेव्हाचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी.एन. अण्णादुराई यांनी पोर्तुगाल मधील व्हॅटिकन सिटी येथे जाऊन पोप पॉल यांची प्रत्यक्ष भेट घेत रानडे यांच्या सुटकेची मागणी केली होती. अखेर पोप यांच्या हस्तक्षेपानंतर १९६९ मध्ये रानडे यांची सुटका झाली.

त्यांच्या गोवा मुक्तिसंग्रामातील अमूल्य योगदानासाठी गोवा सरकारने ‘गोवाभूषण पुरस्कार’ तसेच केंद्र सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे.

गोवा मुक्तिसंग्रामात लढा उभा करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे क्रांतिकारक लढवय्ये पद्मश्री मोहन रानडे यांनी काल अखेरचा श्वास घेतला. दीर्घ आजारपणामुळे त्यांच्यावर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु त्यांचे निधन झाले. मृत्यूवेळी त्यांचे वय ९० वर्षे होते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.