चप्पल, स्लिपर घालून टु व्हिलर चालवल्यास खरच दंड होतो का..?

गाडीला किक मारताना पाय सटकलाय किंवा कुणीतर शेजारून येऊन डायरेक पायावर चाक घातलंय असले किस्से बऱ्याचदा घडतात. गाडी शिकताना तर डायरेक बिनाचप्पल घेर टाकून टांगा पलटी करण्यावर आपला कल असतोय. त्यामुळंच आपल्याला फुटपाथवरून गाडी घालताना काहीच स्पेशल वाटत नाय.

पण ट्रॅफिकच्या नियमांमध्ये एक असा नियम सांगितला जातो की,

चप्पल, स्लीपर, सॅण्डेल घालून टु व्हिलर चालवल्यास दंड बसतो.

सप्टेंबर २०१९ पासून जेव्हा मोटरनियम कायदे कडक करण्यात आले तेव्हापासून बऱ्याच गोष्टींना नव्यानं कायदेशीर स्वरूप दिलं गेलं आहे.

वाहन मोटार अधिनियम २०१९ नुसार अशा प्रकारे अनवाणी पायाने, स्लीपर किंवा सॅंडल घालून कुणी दुचाकी चालवताना आढळून आल्यास १००० रुपयांचा दंड वासून करण्याचे आदेश दिले गेले आहेत अशी आवई उठली होती.

कशानंकशावरून मामांच्या कचाट्यात घावणारे आम्ही, पण आपल्याला या नियमामुळं कधीच दंड झाला नाही. मग ही नक्की काय गोमय?

पण आता तुम्ही विचाराल रॉकेल घालून एमेटी हाकणाऱ्या माणसाला अशी शूज घालून जड पायांनी गाडी चालवण्याची सक्ती का म्हणून?

तर ह्याचंही कारण हा किस्सा सांगणारी लोकं देतात. त्याचं कारण सांगतात ते सुरक्षा.

स्लीपर किंवा सॅंडल घालून दुचाकी चालवताना गियर बदलण्यासाठी अडचणी येतात. तसेच अचानक पायाची पकड ढिली होऊ शकते आणि गाडी अचानक बंद पडू शकते, अशी कारणं  सुद्धा लोकांनी दिल्यात.

एक ऍक्टिव्हावाला तर सांगत होता कि

“पावसाळ्याच्या दिवसात पाय ओले झाल्यास दुचाकी चालवताना स्लीपर किंवा सॅंडलमधून पाय घसरण्याचाही धोका असतो.”

गाडी अचानक थांबल्यास अपघात होण्याची दाट शक्यता आणि पायाची सुरक्षा ही कारणेही यासाठी दिली जातात.

पण भिडू, चप्पल घातल्यामुळं दंड होतो ही गोष्ट शुद्ध अफवा आहे.

असं असतं तर मामा लोकांनी अडवल्या अडवल्या आपल्या पायावर पाय दिला नस्ता व्हय लायसन मागण्याआधी!

आता खरंतर सगळ्याच ट्राफिक गुन्ह्यांसाठी २०१९ सालापर्यंत दंड ठोठावला जात होता मात्र त्याची रक्कम नगण्य होती. आता जर का हजाराला अश्व बसत असेल तर हा नियम सिरियसली घ्यायची गरज आहे असं लोकांना वाटलं. आता ही गोष्ट जोपरेंत मामा लोक आपल्याला शिकवणार नाहीत तोपर्यंत लोकंही सिरियसली घेणार नाहीत हा भाग आलाच.

या अफवेसोबत इतरही अनेक अफवा पसरवल्या गेल्या होत्या. वानगीदाखल आता लुंगी घालून गाडी चालवता येणार नाही. जर का शर्टाच्या बाह्या मागे घेऊन गाडी चालवली तर दंड होणार. गाडीची काच धुतलेली नसेल तर चलान कापले जाणार.

या सगळ्या अफवांमुळे वातावरण पेटलं होतं. विशेषतः दक्षिणेकडील राज्यांमध्ये लोक यामुळे भडकले होते.

तेव्हा नितीन गडकरींनी आपल्या ट्विटर हँडलवरून या सगळ्याचा खुलासा केला होता की असं काहीच नायय. नवीन मोटार वाहन आधिनीयम कायद्यात अशा कुठल्याच गोष्टी नाहीत.

या अफवांपासून सावध राहण्यासाठी त्यांनी आवाहन केलं होतं.

त्यामुळं चप्पल घालून दुचाकी चालवण्यात धोका आहे ही गोष्ट खरीय. लोक तर सांगतात की चारचाकी चालवताना सुद्धा बूट घालणं चांगलं. पण सरकारने त्यासाठी कुठल्याही दंडाची तरतूद केलेली नायय.

पण जगातल्या इतर देशांमध्येही हीच पद्धत फॉलो केली जाते. अमेरिकेत दर राज्यात वेगवेगळे कायदे असतात. तिकडं वाहने हा राज्य सरकारचा विषय आहे. पण तिथल्या सगळ्याच ५० च्या ५० राज्यांमध्ये असा कोणताही कायदा नाही.

आणि दुचाकीसाठीचे कायदे किमान युरोपियन देशांमध्ये बऱ्यापैकी शिथिल आहेत. तिथं दुचाकी चालवण्यासाठी वेगळी लेन दिली जाते. दुचाकीस्वार माणसाला मध्येअध्ये अडवू नये आणि त्यासाठी वेगळी तरतूद व्हावी इतकं स्वातंत्र्य तिथं दिलं जातं. इतकंच नाय तर भारतातील टू व्हीलरचं लायसन तिकडं वापरता येते एवढी मोकळीक आहे.
त्यामुळं अशा अफवांवर विश्वास ठिऊ नका. सगळी जनता वूडलंड घेऊ शकत नाय हे सगळ्या सरकारला माहिताय. पण आपली सुरक्षा आपण घेतलेली बरी, होय भिडू?

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.