रहाणे-ठाकूरचं खडूस समजलं जाणारं मुंबई स्कुल ऑफ क्रिकेट नेमकं काय आहे ?

द ओव्हल वरची भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल. दुसऱ्याच दिवशी फक्त १५१ रन्सवर भारताच्या ५ विकेट्स पडलेल्या आणि सगळी मदार होती अजिंक्य रहाणेवर. त्यात केएस भारत तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्याच बॉलला आऊट झाला आणि रहाणेच्या सोबतीला आला शार्दूल ठाकूर.

या दोन्ही बॅट्समन्सनी सातव्या विकेटसाठी १०९ रन्सची पार्टनरशिप केली. रहाणे ८९ रन्सची जिगरबाज इनिंग खेळून आऊट झाला. त्याची सेंच्युरी थोडक्यात हुकली, पण शार्दूलनं ५१ रन्स मारत किल्ला लढवत ठेवला, या दोघांच्या इनिंगमुळं भारताला फॉलोऑन टाळता आला आणि ऑस्ट्रेलियाचं लीड जवळपास १७० रन्सवर आणता आलं.

बॅटिंग करताना रहाणे आणि शार्दूलला हातावर बॉल लागले, शार्दूल तर दोन आर्म गार्ड लाऊन खेळला पण भिडत राहिला.     

या दोघांच्या जिगरबाज बॅटिंगचं कौतुक झालं आणि सोबतच कौतुक झालं, रहाणे-ठाकूरच्या खडूस ‘मुंबई स्कुल ऑफ क्रिकेट’चं.

हे खडूस मुंबई स्कुल ऑफ क्रिकेट आहे काय ? आणि त्याची इतिहासातली उदाहरणं काय आहेत ?

मुंबई भारतीय क्रिकेटची राजधानी आहे. साधंच उदाहरण घ्यायचं झालं तर भारताच्या फर्स्ट क्लासमध्ये आजवर ८७ वर्षे झाली रणजी क्रिकेट खेळलं जातं. यापैकी मुंबईने ४१ वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे. एकदा तर सलग १५ वर्ष मुंबईकडे रणजी ट्रॉफी होती.

हे सगळं झालं खडूसपणामुळं 

खडूसपणा म्हणजे विजिगिषु वृत्ती. शेवटच्या क्षणापर्यंत हार न मान्य करणे. मुंबईकरांच्या रक्तात ही भिनलेली आहे. असं म्हणतात की मुंबईची मुलं हातात बॅट घेऊनच जन्माला येतात. इथं सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर यांच्यासारखे मोठे खेळाडू होऊन गेले. बऱ्याचदा असंही व्हायचं की मुंबईची निम्मी टीम भारताकडून खेळत असायची. तेव्हा देखील उरलेले राखीव खेळाडू घेऊन मुंबईकर देशावर राज्य करायचे.

इतक्या वर्षांच्या कालखंडातही ती गोष्ट बदलली नाही. अगदी माधव आपटेंच्या काळापासून ते आज शार्दूल ठाकूरर्यंत मुंबईनं कधीही आपली झुंजार वृत्ती सोडली नाही. 

काही प्रमुख उदाहरण बघायची झाली तर.

१) अमोल मुजुमदार –

सचिन जेव्हा जगात नाव कमवत होता तेव्हा अमोल मुजुमदार मुंबईला रणजीमध्ये जिंकून देत होता. त्याने प्रथमश्रेणीमध्ये जवळपास ११ हजार रन्स काढले. हा एक विक्रमच आहे. पण तरीही त्याला नॅशनल टीम मध्ये एकदाही संधी मिळाली नाही. या मागच राजकारण, तत्कालिक कारणे सोडली तरी अमोल हा जिद्दी खेळाडू होता हे नक्की. त्याची महत्वाची ओळख म्हणजे खडूसपणा.

२००६ सालची गोष्ट. मुंबईची रणजी ट्रॉफी मध्ये बडोद्याविरुद्ध मॅच सुरु होती. अमोल मुझुमदार कॅप्टन होता. दुसऱ्या डावात मुंबईची अवस्था ५ बाद ० धावा अशी अगदीच वाईट झालेली. सगळ्यांना वाटत होतं मॅच संपली. पहिल्या इनिंगमध्ये ९७ धावा करणारा अमोल, तरुण सेन्सेशन रोहित शर्मा सकट पाच जण शून्य वर आउट झाले.

पण अमोल मुजुमदार सहज हार मान्य करणाऱ्यामधला नव्हता. त्याने मैदानात जाणाऱ्या विनायक सामंतला सांगितलं काहीही होऊ दे मॅच संपलेली नाही. आपण जिंकण्यासाठीच खेळायचं आहे. आणि घडलंही तसच. विनायक सामंतने ६६ धावांची जिगरबाज खेळी केली. रथी महारथींना डक वर आउट करणाऱ्या इरफान पठाणची बॉलिंग त्याने सहज खेळून काढली. नुसता खेळला नाही तर मॅच जिंकूनही दिली. मुंबईला अशक्यप्राय विजय मिळवून देत फायनलला पोहचवलं

२)अजित वाडेकर –

भारताची टीम इंग्लंडच्या दौऱ्यावर गेली होती. तेव्हा आपला कॅप्टन मुंबईचा अजित वाडेकर होता. आजवर भारताने इंग्लंडच्या भूमीत एकही मॅच जिंकली नव्हती. पहिले दोन सामने अनिर्णित राहिले. यजमान संघ सगळ्यांचा फेव्हरिट होता. तिसऱ्या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडने तडाखेबंद बॅटिंग करत ३५५ धावा केल्या. भारताने सुद्धा फारुख इंजिनियर आणि दिलीप सरदेसाई यांच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडला प्रत्युत्तर दिले.  

तीन दिवस झाले तरी भारताची पहिली इनिंग संपली नव्हती. त्यामुळे तिसरी मॅच सुद्धा ड्रॉ होणार अशीच सर्वांची अपेक्षा होती. 

हाडाचे मुंबईकर असलेल्या अजित वाडेकर यांनी मात्र मॅच सोडली नाही. चौथ्या दिवशी २८४ रन्सवर भारतीय संघाची इनिंग संपली. ७१ धावांनी भारतीय संघ पिछाडीवर होता. परंतु याच दिवशी भारतीय संघाने धमाकेदार पुनरागमन केलं. चंद्रशेखर यांनी घेतलेल्या सहा विकेट आणि त्यांना इतर गोलंदाजांनी दिलेली साथ यामुळे,  इंग्लंडचा डाव १०१ धावांवर आटोपला.

भारताला जिंकण्यासाठी १७३ धावा हव्या होत्या. 

अजित वाडेकर, गुंडाप्पा विश्वनाथ आणि फारुख इंजिनियर यांनी हे अशक्य वाटणारे टारगेट सहज शक्य केले. इंग्लंडच्या भूमीत भारताने पहिला विजय साकार केला. ते सुद्धा मुंबईकर अजित वाडेकर याच्या खडूसपणामुळे.

३)दिलीप वेंगसरकर –

वेंगसरकरची ओळख क्रिकेटचा फायरब्रॅन्ड खेळाडू अशीच होती. त्याने भारताला अनेक सामने जिंकून दिले. कधीही हार न मानण्याची वृत्ती त्याच्याही रक्तात भिनलेली होती. समोर कितीही मोठा खेळाडू असो दिलीप वेंगसरकर त्याच जिद्दीने उभे राहायचे. वेस्ट इंडिजच्या सुपरफास्ट बॉलरना त्यांनी जस तोंड दिलं होत, लॉर्ड्स वर शतके ठोकली होती त्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये त्यांचं कौतुक केलं जात होतं.

गोष्ट आहे १९९१ सालच्या रणजी फायनलची.

कधी नव्हे ते हरियाणा फायनल मध्ये पोहचली होती. कपिल त्यांचा कप्तान होता. पण मुंबईची टीम देखील मजबूत होती. संजय मांजरेकर कप्तान होता. वेंगसरकर, चंद्रकांत पंडित, सचिन, विनोद कांबळी अशी त्यांची मोठी बॅटिंग लाईनप होती. नुकताच सचिनने आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावण्यास सुरवात केली होती.

पहिल्या इनिंगमध्ये हरियाणाने जोरदार ५०० धावा ठोकल्या. मुंबईने प्रत्युत्तरादाखल ४१० रन्स केल्या. दुसऱ्या इनिंगनंतर कपिलच्या टीमने २४२ धाव काढल्या. मुंबई पुढे अशक्यप्राय वाटणारं टोटल उभं केलं. मुंबईची सुरवात खराब झाली. पण वेंगसरकर आणि सचिनने डाव सावरला. दोघांनी शतकी पार्टनरशिप केली. पण दुर्दैवाने सचिन ९६ धावांवर आउट झाला. कांबळी सोडलं तर कोणीही पिचवर टिकूही शकलं नाही.

पुढची सगळे खेळाडू पत्त्याप्रमाणे कोसळले. शेवटचा एबी कुरवीला याला घेऊन वेंगसरकर लढा देत होते. मुंबईची जिंकण्याची कोणतीही शक्यता नव्हती.

कपिल वेंगसरकर जवळ आला आणि  ‘आम्हाला यावेळी तरी जिंकू द्या’ अशी काकुळतीला येऊन विनंती केली.

पण वेंगसरकर हार मानले नाहीत. त्यांनी शेवटच्या बॉल पर्यंत लढा दिला. अखेर कुरवील्ला धावबाद झाला आणि हरियाणा जिंकली. कपिल देव म्हणतो त्या दिवशी मुंबईच्या खडूसपणाचा चांगलाच अनुभव आम्ही घेतला.

४) एकनाथ सोलकर –

तो एक चांगला ऑलराऊंडर होता. पण त्याची खरी ओळख जगातला सर्वोत्कृष्ट फिल्डर अशीच होती. फोरवर्ड शॉर्ट लेग ही सर्वात डेंजरस फिल्डिंग पोजिशन आहे. एकनाथ सोलकर मात्र बिनधास्तपणे डोक्यावर हेल्मेट न घालता तिथे उभा राहायचा आणि अशक्यप्राय वाटणारे झेल पकडायचा.

त्याकाळात प्रसन्ना, चन्द्रशेखर, बेदी, वेंकटराघवन या भारतीय स्पिनरची जगभरात हवा होती. पण त्यांच्या बॉलिंगच्या यशाचं बरचस श्रेय एकनाथ सोलकरच्या फिल्डिंगला ही जाते.

एकनाथ सोलकर आणि इंग्लंडचा सर्वात फेमस ओपनर जेफ्री बॉयकॉट यांची रायव्हलरी तर खूप गाजली. दोघे एकमेकांना भरपूर स्लेज करायचे. एकनाथ तसा पार्टटाईम बॉलर. पण एकदा एका सिरीज मध्ये जेफ्री बॉयकॉटला त्याने सलग तीन वेळा आउट काढले.

तिसऱ्यांदा आउट काढल्यावर तर त्याने ‘i got you bloody’ असं ओरडत जोरदार जल्लोष केला. एका पार्टटाईम बॉलरनं केलेला हा अपमान जेफ्री बॉयकॉट कधीच विसरू शकला नाही.

मुंबईचा खडूसपणा एकनाथ सोलकरमध्ये पुरेपूर भिनला होता. म्हणूनच तो कधी फिल्डिंग करायला घाबरला नाही आणि मोठमोठ्या खेळाडूंना नडायला घाबरला नाही. अशाच एका रणजी फायनल मध्ये एकनाथ सोलकर आणि मन्या हर्डीकर यांनी शेवटच्या बॉलपर्यंत लढवलेला किल्ला आणि बलाढ्य मद्रासकडून खेचून आणलेला विजय आजही जुने जाणते क्रिकेट रसिक सांगतात.

अशी लाखो उदाहरणे सांगता येतील.मुंबई क्रिकेटची कॉलर ही विजयात आणि पराभवात कायम ताठ राहिली.

मुंबई मध्ये मोठेमोठे प्रशिक्षक आहेत, कोचिंगची सोय आहे म्हणून इथले खेळाडू भारी आहेत असं अनेकांना वाटत. पण ते पूर्णपणे खरे नाही. मुंबईच्या या खेळाडूंनी क्रिकेटच्याही आधी खडूसपणाचे धडे शिकले म्हणून ते भारी आहेत. विजय मर्चंट, सुनील गावस्कर, विजय मांजरेकरपासून ते आजच्या सूर्यकुमार यादव, अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूरपर्यंत सगळ्यांच्या बाबतीत हे खरं ठरतं.

हे ही वाच भिडू.

 

1 Comment
  1. केवल says

    भिडू,
    शब्द चूकला असं मला वाटतं. तो खडूस ऐवजी खत्रुड असा अआहे

Leave A Reply

Your email address will not be published.