भारतात पडीक असलेलं सोनं फायनान्ससाठी वापरता येईल हे १२५ वर्षांपूर्वी एका म्हाताऱ्याला सुचलं

भारतात सोनं हा विषय किती महत्वाचा आहे हे आपल्याइतकं कोणालाच माहिती नसेल. म्हणजे सध्या सोशल मीडियावर गळ्यात सोन्याच्या चैनी, लॉकेट, ब्रेसलेट कहर म्हणजे तर गोल्डन बूट हे पाहून आपल्याला इतकं तर नक्कीच माहिती आहे कि सोन्याची क्रेझ किती आहे ते. दसऱ्याला आपट्याची पानं देऊन सोनं देणंघेणं आणि घरातल्या दागिन्यांची निर्मिती नाही तर विकणे यापलीकडे आपला जास्त संबंध येत नाही.

करोना काळात गोल्ड लोनचं प्रमाण वाढलं होतं. सोन्याचे दागिने गहाण ठेवून त्यावर पैसे मिळू शकतात हि कल्पनाच वेगळी आहे आणि आज याच विचाराच्या जोरावर एक स्वदेशी ब्रँड जगात आपला डंका वाजवतोय आणि उत्तरोत्तर तो वाढतच जातोय.

या ब्रॅण्डमुळे खरंतर घरात पडीक असलेल्या सोन्याला किंमत प्राप्त झाली , नाहीतर आधीच्या दिवसांमध्ये सोन्याचे दागिने हे केवळ शृंगार करण्यापुरते मर्यादित होते. या ब्रँण्डची सुरवात भलेही एका धान्याच्या दुकानातून झाली असली तरी आज या ब्रॅण्डच्या यशाने डोळे दिपतील इतक्या मोठ्या प्रमाणावर हा ब्रँड विस्तारला आहे.

मुथूट फायनान्स. या ब्रॅन्डचं नाव तुम्ही ऐकलं असेल. मुथूट फायनान्सचं ७० करोड भारतीयांच्या जीवनात महत्वाचं स्थान आहे.

पण इतक्या मोठ्या प्रमाणावर या ब्रँडचं रूपांतर कस झालं ? सुरवात कशी झाली ते आपण बघूया.

भारतामध्ये प्रत्येक शुभ कामाला किंवा सणावाराला सोनं नक्कीच खरेदी केलं जातं. समाजामध्ये श्रीमंती दाखवण्याचा सिम्बॉल म्हणजे सोनं झालाय. पण ज्यावेळी सोनं सावकाराकडे गहाण ठेवण्याची वेळ येते तेव्हा आपण असला प्रकार करण्यास धजावत नाही कारण आपल्या दृष्टीने ते समाजात मान खाली घालायचं लक्षण आहे. सोनं या धातूच्या बाबतीत भारताचा जगात ९ वा क्रमांक लागतो.

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या सर्वेनुसार आज घडीला भारतातील जनतेकडे २५००० टन सोनं आहे. हे इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे कि चार पाच देशाचं सोनं जरी एकत्र केलं तरी ते भारताइतकं भरणार नाही. परत प्रश्न तोच कि हा मग इतकं सोन आहे पण त्याचा उपयोग काय पडीक राहण्याखेरीज.

याच प्रश्नावर उत्तर शोधलं कोचीमधल्या मुथूट निनान मिथाई यांनी. लोकांमध्ये आणि सोनं या धातूमध्ये असलेला आर्थिक दरवाजा त्यांनी उघडला. १८८७ साली कोजेनचेरी या गावात मुथूट निनान मिथाई यांनी एक धान्याचं दुकान सुरु केलं होतं. मेहनती आणि हुशार व्यक्तिमत्व म्हणून ते प्रसिद्ध होते.

मुथूट निनान मिथाई हे जिथं ब्रिटिश राजवट आहे तिथेच आपलं धान्य विकायचे. ब्रिटिश लोकं त्यांच्या कामावर आणि धान्यावर कायम खुश असायचे आणि त्यांचं सतत कौतुक करत असायचे. त्या लोकांच्या निवेदनानुसार त्यांनी एक चिट फंड सुरु केला. याचा उद्देश हाच होता कि ब्रिटिश कामगार आपल्या पैशाची बचत करतील. संकटकाळात हि बचत कामा येईल म्हणून त्यांनी तो चिट फंड सुरु केला.

गावात सुरु झालेला हा अभियान हळूहळू बाहेरही पसरू लागला. वाढती प्रसिद्धी पाहून मुथूट निनान मिथाई हे गोल्ड लोनच्या व्यवसायात आले. आपल्या कौशल्याच्या जोरावर त्यांचं नाव मोठमोठ्या व्यावसायिकांमध्ये येऊ लागलं. मुथूट निनान मिथाई यांना चार मुले होती. मुलांमध्ये १९८० साली वितृष्ट आल्याने वाटणी झाली.

मुथूट निनान मिथाई यांचा तिसरा मुलगा एम जॉर्ज यांनी हि फायनान्स कंपनी वाढवली. पुढे एम जॉर्ज यांचा मुलगा मॅथ्यू जॉर्ज यांनी मात्र मुथूट फायनान्सचं जगभर नाव केलं. या क्षेत्राची बारीक सारीक सगळी ओळख व्हावी म्हणून मॅथ्यू जॉर्ज यानिओ ऑफिस असिस्टंट म्हणून देखील काम पाहिले.

१९९३ साली मुथूट फायनान्सचे ते चेअरमन झाले. कंपनीचा विस्तार आणि लोकप्रियता पाहता मुथूट फायनान्सने आरबीआयकडून NBFC [ नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी ] लायसन्स मिळवलं. यामुळे मुथूट फायनान्सचा व्यवसाय वाढीस लागला. पर्सनल लोन, वाहनावरील कर्ज, गृहकर्ज याचासुद्धा व्यवसाय करते, पण जगभरात गोल्ड लोन फायनान्ससर म्हणूनच ते प्रसिद्ध आहे.

जनता आर्थिक अडचण आल्यावर गोल्ड लोनचा आधार घेते. कंपनीची सोपी सर्व्हिस असल्याने दररोज दोन लाखांहून अधिक लोकं गोल्ड लोनची माहिती कंपनीकडून घेते.

आज घडीला या कंपनीचा रेव्हेन्यू ११००० करोड पेक्षा जास्त आहे. या कंपनीमुळे ४४००० हजार पेक्षा अधिक लोकांना रोजगार मिळत आहे. ५००० हजाराहून जास्त ब्रान्च मुथूट फायनान्सच्या आहेत पैकी ७०% या ग्रामीण भागात आहेत. यावरून हि कंपनी अगदी तळागाळात पोहचली आहे.

शेतकरी, नोकरी करणारे, छोटे दुकानदार, छोटे व्यावसायिक हि लोकं या कंपनीचे नेहमीचे कस्टमर आहेत. जवळपास सगळ्याच गोष्टींमध्ये मुथूट फायनान्स अग्रेसर आहे. एका धान्याच्या दुकानापासून सुरु झालेला हा प्रवास आता सगळ्यात जास्त उलाढाल करणाऱ्या कंपनींपैकी एक आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.