आता काश्मीरमध्ये पाकिस्तान क्रिकेटमधून राजकारण करायचा प्रयत्न करतंय..

काश्मिरात सगळं काही ठीक होतंय आणि पाकिस्तानला हे देखवलं, असं कधी होईल काय? आपल्या देशात कमी आणि भारतात जास्त डोकवायचं हा जणू  पाकिस्तानच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलाय. मग तो कलम ३७० चा मुद्दा असेल, नाहीतर कोरोना लसीचा प्रत्येक बाबतीत भारताविरुद्ध काहींना  काही कुरघोड्या करणं जणू पाकिस्तानचा नवीन बिजनेस बनलाय. आता प्रत्येक स्तरावरून प्रयत्न करून तोंडघशी पडल्यानंतर पाकनं क्रिकेटमधून राजकारणाचा नवीन डाव सुरु केलाय.

पाकिस्तानात आपल्या आयपीएल प्रमाणं पाकिस्तान प्रीमियर लीग तर होतेच, पण आता नवीन वाद कसा उकरून काढायचा म्ह्णून पाकिस्ताननं आपल्या ताब्यात असणाऱ्या काश्मिरात अर्थात पीओकेमध्ये (POK) काश्मीर प्रीमियर लीग या टी-२० फॉरमॅटच आयोजन केलं आहे. पुढच्या महिन्यात ६ ऑगस्ट ते १६ ऑगस्टपर्यंत या टूर्नामेंटचं आयोजन होणार असल्याचं समजत. या टी-२० मध्ये पाकिस्तानी खेळाडूंबरोबर काही विदेशी खेळाडू देखील दिसणार आहेत.

पाकिस्ताननं याबाबत म्हंटल कि, पाक व्याप्त काश्मीर मध्ये  खेळल्या जाणाऱ्या या टूर्नामेंटचं  सगळ्या जगभरात प्रसारण केलं जाणार आहे. यासाठी ६ टीम तयार केल्या गेल्यात, ज्यात बाग स्टॅलियन, मीरपूर रॉयल्स, मुजफ्फराबाद टायगर्स, ओव्हरसीज  वॉरियर्स, कोटली लायंस आणि रावलाकोट हॉक्सचा समावेश आहे.

काश्मीर प्रीमियर लीगच्या आयोजकांनी सांगितलं की, या टूर्नामेंटचे सगळे सामने मुजफ्फराबादच्या क्रिकेट स्टेडियममध्ये खेळले जातील.

या प्रत्येक टीममध्ये ५ पीओकेचे खेळाडू असतील. आता या लीगचा आयोजन करून पाकिस्तान पीओके मधल्या खेळाडूंना पाकिस्तान संघात घेण्याचा प्लॅन आखत असल्याचं बोललं जातंय. महत्वाचं म्हणजे ज्या १० दिवसात या खेळाचं आयोजन होणार आहे. त्याच काळात पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांचे स्वतंत्रदिन आहे. 

परदेशी खेळाडूंनीही इंटरेस्ट दाखवलाय

काश्मीर प्रीमियर लीगमध्ये श्रीलंकेचा माजी स्टार क्रिकेटर तिलकरत्ने दिलशान, इंग्लडचा माजी खेळाडू मॅट प्रायर, आणि मोंटी पनेसर, हर्शल गिब्स खेळताना दिसतील. यासोबतच पाकच्या म्हणण्यानुसार यात आणखी काही विदेशी खेळाडू देखील जोडले जाऊ शकतात.

त्याचबरोबर या काश्मीर प्रीमियम लीगमध्ये शाहिद अफरीदी, शोएब मलिक, मोहम्मद हफीज, सोहेल तनवीर, शादाब खान, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शर्जील खान, खुशदिल शाह, मोहम्मद इरफान या पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश असणार आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडूनच या काश्मीर प्रिमियर लीगचा आयोजन केलं जाणार आहे.  पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी हा या लीगचा ब्रँड अँबॅसिटर असणार आहे.  हा तोच शाहिद आफ्रिदी जो नेहमीच काश्मीरवरून वादग्रत विधान करत असतो. 

पाकिस्तानचा माजी कॅप्टन वासिम अक्रमने या लीगच्या आयोजनाला संपूर्ण पाठिंबा दर्शवलाय. दरम्यान वसीमला या काश्मीर प्रीमियर लीगचा उपाध्यक्ष बनवलं गेलंय.

आता पाकिस्तान या लीगचं आयोजन करून आणखी एक डाव खेळतयं, हे भारताला चांगलंच समजतंय. म्ह्णूनच, पीओकेत होणाऱ्या या काश्मीर प्रीमियर लीग संदर्भात भारत सरकारनं अद्याप तरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण काश्मीरबाबत भारताचा स्टॅन्ड आधीपासूनच क्लियर आहे. पाकव्याप्त काश्मीर बरोबर गिलगिट- बाल्टिस्तान सुद्धा भारताचा हिस्सा आहे. पण पाकिस्ताननं बेकायदेशीर पद्धतीनं या भागावर आपला कब्जा केलाय.

दहशतवादाला पाठिंबा देणारा पाकिस्तान पीओकेमध्ये काश्मीर प्रीमियर लीग आयोजित करून अमन-शांतिच्या प्रयत्नांचा दिखावा करतंय. आता पाकिस्ताननं या क्रिकेट लीगचा आयोजन अश्या वेळी केलय, जेव्हा भारतात पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी सरकारची धडपड सुरुये. त्यामुळे या टी-२० लीगचा आयोजन करून पाक भारताला खिजवण्याचा एकप्रकारे प्रयत्न करतयं.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.