वडिलांना झालेला त्रास विदर्भाच्या जनतेला होऊ नये म्हणून नागपुरात कॅन्सर हॉस्पिटल उभारलं

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख चेहरा. फडणवीसांनी नागपूरमधल्या वॉर्डाचा नगरसेवक ते राज्याचा मुख्यमंत्री या सत्तेच्या पायऱ्या अत्यंत कमी वयात व प्रचंड वेगाने पार पाडल्या. त्यांचा हा वेग अनेकांना थक्क करणारा होता.

कोणी कितीही टीका केली तरी देवेंद्र फडणवीस आपल्या विरोधकांना पुरून उरले आहेत आणि महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या पक्षाचे सर्वात मोठे नेते बनले आहेत यात शंका नाही. त्यांना ओलांडून राज्याचं राजकारणाची चर्चा होत नाही हे तितकंच खरं.

देवेंद्र फडणवीस यांना मोठा राजकीय वारसा देखील लाभलेला आहे.

त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस हे अनेक वर्षे जनसंघ आणि भाजपचे आमदार होते. नागपूर भाजपवर त्यांची पकड होती. त्यापेक्षाही पुढे जाऊन असं म्हणावं लागेल की या संघभूमीत भाजपला खऱ्या अर्थाने रुजवलं असेल तर ते गंगाधरराव फडणवीस यांनी.

गंगाधरराव फडणवीस यांचा जन्म चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे झाला. शिक्षणासाठी ते नागपुरात काकांकडे आले. त्या वेळी काकांचे घर महाल परिसरात होते. महालातील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. घर संघाच्या कार्यालयाशेजारी असल्याने ते संघ विचारांशी जुळले. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नियमित स्वयंसेवक म्हणून त्यांनी सामाजिक कार्य सुरू केले. संघ विस्ताराच्या कार्यासाठी ते दोन वर्षे ओरिसात राहिल़े येथेच मानसशास्त्रत पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. गंगाधररावांचे वडील महिन्याला शंभर रुपये पाठवायचे, त्यात ते स्वत:सह दोन गरीब विद्याथ्र्याचाही सांभाळ करीत असतं. 

पुढे शिक्षकाची नोकरी केली, पण मन रमले नाही. अखेर गंगाधरराव राजकारणात उतरले व विविध पदांवर काम करताना जनसंघाची बांधणी केली. त्यांनी अनेक पक्षांचे चांगले लोक जनसंघात आणले. पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविली व त्यात सलग दोन वेळा जिंकले.

नितीन गडकरींच्या सारखा दिग्गज नेता गंगाधरराव फडणवीसांनीच घडवला. पुढे त्यांचा राजकीय वारसा त्यांच्या जाऊ शोभा ताई फडणवीस यांनी सांभाळला.

घरातील हे राजकीय वातावरण देवेंद्र फडणवीस लहानपणापासून अनुभवत होते. वडिलांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेले पाहिले. आणीबाणीच्या काळात वडील ११ महिने कारागृहात होते. तेव्हाच अवघ्या पाच वर्षांच्या देवेंद्र फडणवीसांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार होत गेले.

गंगाधरराव फडणवीस हे अनेक वर्षे राजकारणात होते मात्र त्यांनी कधी स्वतःचा खिसा भरायचा विचार केला नाही. त्यामुळे अखेरच्या काळात आर्थिक ओढाताणीचा सामना त्यांना करावा लागला.

गंगाधरराव फडणवीस यांना कॅन्सर झाला होता, तेव्हा देवेंद्र फडणवीस हे अजून शाळेत जायचे. त्याकाळी कॅन्सर हा असाध्य रोग मानला जायचा. त्यावरील उपचार ही अतिशय कठीण बाब होती. विशेषतः नागपूरमध्ये एकही रुग्णालयात कॅन्सरवर उपचार होत नसत.

म्हणूनच गंगाधरराव फडणवीस यांना उपचारासाठी मुंबईला आणावे लागे. या काळात त्यांची झालेली फरफट लहानग्या देवेंद्र फडणवीस यांनी अनुभवली होती. कित्येकदा ते मुंबईच्या टाटा रुग्णालयात वडिलांच्या सोबत जायचे देखील.

ग्रामीण भागातून आलेले गोरगरीब पेशंट यांची अवस्था पाहून देवेंद्र यांना गलबलून यायचं.

दुर्दैवाने त्यांचे वडील कॅन्सर विरुद्धची लढाई जिंकू शकले नाहीत आणि त्यांचे अकाली निधन झाले. देवेंद्र यांचं तेव्हा अवघा १७ वर्षे वय होतं. आमदार राहिलेल्या वडिलांना जर हि स्थिती अनुभवावी लागत असेल तर सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था असेल हा विचार त्यांच्या मनाला चाटून गेला.

तेव्हाच त्यांनी ठरवलं विदर्भातल्या कॅन्सर रुग्णांची अशी फरफट होऊ नये म्हणून नागपुरातच एक मोठ्ठ हॉस्पिटल उभारायचं.

नागपुरात आबाजी थत्ते ऊर्फ डॉ. वासुदेव केशव थत्ते नावाचे एक संघ प्रचारक होते. गोळवलकर गुरुजी आणि बाळासाहेब देवरस या सरसंघचालकांचे स्वीय सहायक म्हणून त्यांनी ४५ वर्षे काम केले होते. ते एन.एम.ओ. अर्थात राष्ट्रीय मेडिकोज संघटनेचे संस्थापक होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संघ स्वयंसेवकांनी नागपुरात डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्था स्थापन केली. पुढे देवेंद्र फडणवीस हे या संस्थेचे अध्यक्ष झाले.

त्यांनी या संस्थेच्या अंतर्गत गोरगरीब रुग्णांना माफक दरात उपचार मिळू शकणारे कॅन्सर संस्थान उभारण्याचं ठरवलं.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशीही त्यांनी सल्लामसलत केली. ते म्हणाले,

‘या संकल्पाची सिद्धी झालीच पाहिजे.’

तोवर देवेंद्र फडणवीस आमदार बनले होते. आपल्या अभ्यासू व तडाखेबाज भाषणामुळे राज्यात एक उत्कृष्ट संसदपटू व कार्यक्षम विरोधी पक्षातला नेता अशी छाप उमटवली होती. त्यांनी नागपुरात कॅन्सर संस्थान उभारण्याच्या निर्धाराला वाहून घेतलं. त्यांच्यासह अनेक स्वयंसेवक रात्रंदिवस झटू लागले.

या रुग्णालयासाठी २६ एकराची जागा विकत घेतली गेली. नागपूर विमानतळापासून केवळ १० किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे.

या चिकित्सालयात ७०० खाटांची व्यवस्था केली जाणार होती. सात लाख चौरस फुटांचे एकूण बांधकाम होणार होतं त्यापैकी  पहिल्याच वर्षी १ लाख चौरस फुटांचे बांधकाम पूर्ण झाले.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर २०१५ साली या संस्थेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला नितीन गडकरी, रतन टाटा, धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल आदी मान्यवर उपस्थित होते. प्रकल्पाची कल्पना साकारणारे देवेंद्र फडणवीस, प्रकल्पाचे कार्याधिकारी शैलेश जोगळेकर या सर्वांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी फडणवीस म्हणाले,

“आमची तर अशीच इच्छा राहील की कोणालाही या रुग्णालयात उपचारासाठी यावे लागू नये. पण जर असे झालेच तर रुग्णाला अत्युच्च दर्जाचे उपचार कमीतकमी खर्चात मिळायला हवेत. म्हणूनच आबाजींसारख्या चिकित्सक महापुरुषाच्या नावाने ही संस्था उभारली जात आहे.”

बाल कर्करुग्णांकरिता (पेडियाट्रिक्स) स्वतंत्र चिकित्सालय असलेले हे देशातील पहिलेच कॅन्सर इस्पितळ आहे आणि येथे प्रत्येक कर्करोगग्रस्त बालरुग्णावर निःशुल्क उपचार होणार आहेत. अशा बालरुग्णाचे पालक समृद्ध असतील व  त्यांना योग्य वाटले तर ते मनाजोगा निधी इस्पितळाला दान देऊ शकतात.  रुग्ण भरती झाल्यावर त्याला मदत करण्याला राहण्यासाठी जवळच ५० अपार्टमेंट उभारण्यात आले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी जिद्दीने साकारलेलं हे हॉस्पिटल विदर्भासाठीच नाही तर मध्यभारतासाठी वरदान ठरणार आहे.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.