फडणवीसांनी पतंगरावांना सांगितलेलं , “बोलणं खरं केलं तर नागपुरात तुमचा पुतळा बसवू.”

नागपूरचा अभिमान म्हणून ओळखलं जाणारं गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय. काही महिन्यांपूर्वी त्याच उदघाटन करण्यात आलं. याप्रसंगी प्राणिसंग्रहालयाला शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलं.

शेकडो हेक्टर पसरलेल्या या प्राणिसंग्रहालयाला भारतातील सर्वात मोठा प्राणिसंग्रहालय म्हणून ओळखलं जातं. इथे गेलं तर ६ बिबट्या आपापसात खेळताना, ६ अस्वल, राजेशाही बैठकीत असलेला राजकुमार वाघ, नीलगाय आणि चितळ, यासोबत काही पक्षीही पाहायला मिळतात. येथे १३५ हेक्टर क्षेत्रफळात जंगलाप्रमाणे उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. जेणेकरून वन्य प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात राहता येईल. आणि नागरिकांनासुद्धा जंगल सफारीची मजा घेता येईल.

हरणासाठीचा पिंजरा 45 हेक्टर क्षेत्रफळावर आहे. यासोबत पर्यटनासाठी बंद बसमधून काचेतून वन्य प्राणी पाहण्याचा आनंद लुटता येतो. यासोबत कोरोनाच्या काळात प्राण्यांचीही विशेष काळजी घेतली जाते.

आज नागपूरचं नाही तर संपूर्ण विदर्भ महाराष्ट्राचा अभिमान असलेल्या गोरेवाडा प्राणिसंग्रहालयच्या निर्मितीची कथा मात्र खूप जुनी आहे. तब्बल वीस वर्षे या प्राणिसंग्रहालयाच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरु होते.  

याची सुरवात होते १९९९ सालापासून. 

राज्याचे तत्कालीन वनमंत्री व नागपूरचे आमदार विनोद गुडधे पाटील यांच्या कार्यकाळात गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाचा प्रस्ताव मांडण्यात आला. वन्यजीव संवर्धन, संशोधन, विदर्भातील पर्यटनाचा विकास, बेरोजगारांना रोजगार असे बरेच उद्देश त्यामागे होते. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने या प्रस्तावाला तत्त्वतः मान्यतासुद्धा दिली होती. मात्र, त्यासाठी लागणारा खर्च कोट्यावधीच्या घरात असल्याचे लक्षात आले आणि तेथूनच प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्याआधीच घरघर सुरू झाली.

दरम्यानच्या काळात बबनराव पाचपुते वनमंत्री झाले. त्यांनी गोरेवाड्यासाठी पुढाकार घेतला. या प्रकल्पाच्या नावावर स्वत: सहकुटुंब सिंगापूरचा दौरा केला. अर्थातच हा दौरा वादग्रस्त ठरला.

राज्यशासनाने १२ डिसेंबर २००५मध्ये एक अधिसूचना जारी केली, ज्यामध्ये वन्यजीव आणि वनस्पती, दुर्मिळ वनस्पती संरक्षित करण्यासाठी गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या अधिसूचनेनुसार सात वर्षांत म्हणजेच २०१२ पर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वास न्यायचा होता. पणअत्यन्त कासव गतीने हा प्रकल्प पुढे सरकत होता.

या प्रकल्पाला खरी गती मिळाली वनमंत्री पतंगराव  काळात.

मुख्यमंत्र्यांच्या पदाचे दावेदार असलेले पतंगराव यांना तुलनेने दुय्यम असलेले वनमंत्रीपद देण्यात आले पण नाराज न होता त्यांनी धडाक्याने कामास सुरवात केली. त्यांनी विशेष लक्ष देऊन गोरेवाडा प्रकल्पाच्या पूर्ण होण्याकडे जोर दिला. तो पर्यंत या प्रकल्पाचा खर्च हजार कोटींच्या वर गेला होता.

त्याकाळी मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण. भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे नुकतीच अशोकराव चव्हाण यांची गच्छंती झाली होती. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण हे ताक देखील फुकून पित होते. प्रत्येक फायलींची उलटसुलट तपासणी करून मगच त्यावर सह्या व्हायच्या.

एकदा यावरून विधानसभेत खडाजंगी झाली. पतंगरावांनी गोरेवाडा प्राणिसंग्रहालयावरून विधानसभेत गर्जना केली,

नागपुरातील गोरेवाडा प्राणी संग्रहालयाची फाईल मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील नगरविकास खात्याच्या सचिवांकडे पडून आहे. सहा महिने झाले. नगरविकास खात्याचे सचिव मंत्र्यांपेक्षा पॉवरफुल झाले आहेत. त्यांचे किस्से पाहिजे तर खाजगीत सांगतो. 

पतंगरावांनी आणलेल्या दबावामुळे अखेर गोरेवाडा प्राणिसंग्रहालायला वेग मिळाला. 

 पतंगरावांनी जेव्हा विधानसभेत ५० एकर जमिनीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणिसंग्रहालय उभारणार असल्याचे जाहीर केले. तेव्हा ते ऐकताच लॉबीत असलेले भाजपचे नागपूरचे आमदार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस धावत आले आणि म्हणाले,

हे प्राणी संग्रहालय तुम्ही उभारले तर तेथे तुमचा पुतळा बसवू. 

तेव्हा पतंगराव कदमांनी यावर तात्काळ हरकत घेतली. ते म्हणाले,

पुतळा बसवाल तर कावळे येतील त्यामुळे पुतळा काय नको.

पतंगरावांनी केलेल्या या मिश्किल टिप्पणीने सभागृह हास्यकल्लोळात बुडाले. पुढे या प्राणिसंग्रहालयाच्या दुर्दैवाने  बदलली आणि गोरेवाडा पुन्हा लाल फितीत अडकला. नागपूरचे सुपुत्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनवूनही त्यांच्या काळात हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला नाही. 

वीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या वर्षी तो पूर्ण झाला. महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय पातळीच्या तोडीस तोड अशा या प्राणिसंग्रहालयामध्ये  पतंगराव कदमांचा पुतळा काही उभा राहू शकला नाही.  

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.