केंद्रीय मंत्र्याने राणेंसाठी पक्ष सोडला, पण नंतर विधानपरिषदेचा आमदार देखील होता आलं नाही

राजकारण ही जगातली सर्वात चंचल गोष्ट. भल्या भल्यांना ही सत्ता सुंदरी धोका देऊन जाते. कधी कोणाला कोणत्या वळणावर नेवून ठेवलं याचा काही नेम नसतो. सरळ भाषेत सांगायचं तर कधी कोणाला वरच्या स्थानावर घेऊन जाईल आणि कधी कोणाला वरुन धाडकन खाली घेऊन येईल हे सांगता येत नाही.

म्हणजे एकदम ‘फर्श से अर्श’ तक आणि ‘अर्श से फर्श’ तक पण.

असाच काहीसा प्रकार घडला आहे माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांच्या बाबतीत.

महाराष्ट्राच्या रामटेक लोकसभा मतदारसंघाची १९९९ पर्यंत एक विशेष ओळख होती. ही ओळख म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला. १९५७ पासूनच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसनं इथं विजय मिळवला होता. पण देशाला या मतदारसंघाची पहिल्यांदा ओळख झाली ती भारताचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्यामुळे.

१९८४ आणि १९८९ अशा दोन लोकसभा निवडणुका ते इथून लढले, आणि निवडून येत या मतदारसंघाचं त्यांनी संसदेत प्रतिनिधित्व केलं होतं.

पण त्यानंतर मात्र राज्यात शिवसेनेची ताकद वाढत गेली. त्यामुळे पक्षानं या मतदारसंघात विशेष लक्ष घातलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही रामटेकमध्ये विशेष रस होता. त्यांची महाराष्ट्रातल्या पहिल्या युती सरकारपूर्वीची रामटेकची सभा विशेष गाजली होती.

त्यातूनच रामटेकच्या ‘काँग्रेसचा बालेकिल्ला’ या ओळखीला पहिला ब्रेक दिला होता तो शिवसेनेच्याचं सुबोध मोहिते यांनी.

सुबोध मोहिते यांची ओळख म्हणजे विदर्भातील मोठा जनाधार असलेला मराठा समाजाचा अभ्यासू नेता अशी होती. राजकारणात येण्यापूर्वी मोहिते युतीच्या कार्यकाळात भाजपचे तत्कालीन सिंचनमंत्री असलेल्या महादेवराव शिवणकर यांचे स्वीय सहाय्यक होते. याच काळात त्यांनी आपला जनसंपर्क देखील वाढला होता.

पुढे ते या जनसंपर्काच्या जोरावर शिवसेनेत दाखल झाले. बाळासाहेब ठाकरे यांनी देखील त्यांना शिवसेनेच्या पहिला आघाडीतील नेता म्हणून पुढे आणले. आधीपासूनच ओळख असल्यामुळे मोहिते आणि बाळासाहेब यांचा विशेष स्नेह होता. त्यामुळे सेनेत आल्याबरोबर बाळासाहेबांनी मोहितेंना १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत थेट रामटेकमधून रिंगणात उतरवलं.

त्यावेळी समोर होते तत्कालीन काँग्रेसचे विदर्भांतील दिग्गज नेते बनवारीलाल पुरोहित. त्यांचं वजन एवढं होतं की त्यांनी १९९८ च्या निवडणुकीत सांगून विदर्भांतील युतीचे ११ खासदार पाडले होते.

पण तरीही १९९९ च्या निवडणुकीत बाळासाहेबांना रामटेकची चिंता नव्हती. त्यावेळी ते जाहीर पणे म्हणाले होते की, माझा वाघ तिथं उभा आहे. त्यामुळे मला काळजी नाही.

मोहिते यांनी देखील बाळासाहेब ठाकरे यांचा हा विश्वास सार्थ ठरवला आणि तब्बल १२ हजार मतांनी पुरोहित यांना धूळ चारली. सुबोध मोहिते पहिल्याच फटक्यात खासदार झाले.

पण नशीब आणि बाळासाहेब अजून त्यांना बरंच काही देणार होते. १९९९ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी उद्योग मंत्रालयावरचा भार कमी करण्यासाठी अवजड उद्योग हे नवीन मंत्रायल सुरु केलं. त्यावेळी हे खातं बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत निष्ठांवंत असलेल्या शिवसेनेच्या मनोहर जोशी यांच्याकडे आले.

पुढे २००२ मध्ये तेलगू देसम पक्षाकडे असलेलं लोकसभेचं अध्यक्षपद शिवसेनेकडे आले आणि इथं मनोहर जोशी यांची निवड झाली. त्यावेळी जोशींना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार होता. पण शिवसेनेच्या ताब्यात असलेलं हे अवजड उद्योग मंत्रालय कोणाला द्यायचं हा प्रश्न बाळासाहेब ठाकडे यांच्यापुढे अजिबात उभा राहिला नाही.

बाळासाहेबांनी सतीश प्रधान, प्रकाश परांजपे, चंद्रकांत खैरे आदी दिग्गज नेत्यांना डावलून तात्काळ दिल्लीला नाव धाडलं. सुबोध मोहिते…!!!

सुबोध मोहिते पहिल्यांदा खासदार होण्यासोबतच पहिल्याच टर्ममध्ये देशाचे अवजड उद्योग मंत्री झाले. यातूनच त्यांना शिवसेनेमध्ये किती मोठे स्थान होते हे स्पष्ट होतं. पुढे बाळासाहेब विखे पाटील यांच्याकडे हे मंत्रालय आलं. पण मोहितेंच सेनेतील स्थान मात्र अबाधित होतं.

पुढे २००४ च्या लोकसभा निवडणुकीत देखील बाळासाहेबांनी रामटेक मधून पुन्हा सुबोध मोहिते यांनाच उतरवण्यात आलं. यावेळी देखील मोहितेंनी बाळासाहेबांचा विश्वास सार्थ ठरवला. उच्च विद्याविभूषित अशा श्रीकांत जिचकार यांचा पराभव करून मोहिते दुसऱ्यांदा खासदार झाले.

पण दुसरी बाजू अशी होती की, सुबोध मोहिते हे राणे गटाचे म्हणून देखील ओळखले जातं होते. त्यातूनच जेव्हा नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांच्यासोबत १० आमदार आणि सुबोध मोहिते यांनी देखील शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला. सगळ्यांनी राणेंसोबतचं काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

याच क्षणापासून सुबोध मोहिते यांचे ग्रह फिरले ते आज तागायत फिरलेलेचं आहेत.

त्यांच्या राजीनाम्यानंतर रामटेकमध्ये पोटनिवडणूक जाहिर झाली. मात्र मतदारांना मोहितेंनी शिवसेना सोडण्याचा घेतलेला निर्णय रुचला नव्हता. त्या पोटनिवडणुकीत मोहितेंचा पराभव झाला आणि सेनेचे प्रकाश जाधव निवडून आले.

पुढे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मोहितेंना काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ते केलं. सोबतच विलासरावांनी त्यावेळी आपलं दिल्लीतील वजन वापरून मोहितेंना विधानपरिषदेच्या एकमेव जागेसाठी जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीची उमेदवारी मिळवून दिली. मात्र नशिबाचा खेळ इथं देखील बघायला मिळाला.

अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी ते हेलिकॉप्टर मधून पुण्याहून मुंबईला येत होते. पण ३ वाजता अर्ज भरायची मुदत असताना त्यांचं हेलिकॉप्टर वेळेत मुंबईत पोहोचलं नाही. त्यामुळे ऐनवेळी त्यांच्याऐवजी जळगावच्या मधू जैन यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली आणि शेवटच्या क्षणी अर्ज दाखल करून त्या आमदार झाल्या.

पुढे देखील काँग्रेसने मोहितेंना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची तिकीट दिले, पण त्यांना यश आलं नाही. त्यातून त्यांनी २०१७ मध्ये काँग्रेसवर टीका करत पक्ष सोडला आणि पुन्हा भाजप किंवा शिवसेनेत परतण्याची चाचपणी सुरु केली, नितीन गडकरींसोबतही ते काही काळ होते. परंतु, दोन्हीकडून त्यांना नकार मिळाला.

त्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेत प्रवेश केला. मात्र पुढच्या वर्षभरात त्यांनी मेटेंची साथ सोडून राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. तिथून ४ महिन्यांनी त्यांनी शेट्टी यांची देखील साथ सोडली. त्यानंतर ते आम आदमी पक्षाच्या संपर्कात आले होते.

अलीकडेच ४ महिन्यांपूर्वी मोहिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या.

नुकतचं नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत, पण त्याचवेळी दुसऱ्या बाजूला त्यांचे समर्थक आणि एकेकाळचे केंद्रात मंत्री राहिलेले नेते मात्र सध्या स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडत असल्याचं दिसून येतं आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.