‘चलो बुलावा आया है माता ने बुलाया है..’ या गाण्याने नरेंद्र चंचल घराघरात पोहचले होते.

दरवर्षी नवरात्रीच्या उत्सवात अख्ख्या देशाच्या कानाकोपऱ्यात दोनच गोष्टी कानावर पडत असतात. एकतर फाल्गुनी पाठक आणि इतर गुजराती गायकांची गाणी गरब्याच्या नृत्यासाठी फेमस असतो. त्याचा दणदणाट प्रत्येक गरबा फेस्टिव्हल मध्ये सुरु असतो. पण दणदणाटापासून वेगळा एक आवाज कानावर पडत असतो जो फक्त ऐकत राहावसा वाटतो.

या आवाजात कोणताही धिंगाणा नसतो, किंवा थिरकायला लावणारं संगीत नसतं. दुर्गामातेची निस्सीम भक्ती यात सामावलेली असते.

या आवाजामागचा गायक म्हणजे नरेंद्र चंचल. 

‘तूने मुझे बुलाया शेरावालिये’ तसेच ‘चलो बुलावा आया है माता ने बुलाया है’ ही गाणी नवरात्रीमध्ये हमखास वाजतात. जसं मराठीमध्ये गणपतीची गाणी गाणारे सुरेश वाडकर आहेत. तसंच हिंदीमध्ये देवीची जास्तीतजास्त भक्तीगीतं गाणारे नरेंद्र चंचल.

नरेंद्र चंचल यांचा प्रवास  कसा होता जाणून घेऊ…

बालपणापासून जडली गायनाची आवड

नरेंद्र चंचल यांचा जन्म पंजाब येथील अमृतसर येथे. साधारण ७ – ८ वर्षांचे असताना नरेंद्र यांच्या घराजवळ विहीर होती. तर खोल विहिरीत मोठ्याने ओरडून स्वतःचा आवाज त्यांना पुन्हा ऐकायला यायचा. यामुळे आवाजाच्या दुनियेचं त्यांना आकर्षण वाटायला लागलं.

पुढे मग घरात असलेल्या खिडकीवर बसून ते मोठ्याने सिनेमातली वैगरे गाणी म्हणत असत. त्यामुळे आसपासच्या लोकांना कळू लागलं होतं, की नरेंद्र चांगला गातो. 

बाहेर मिळायचे हार, घरी पडायचा मार

नरेंद्रचं मध्यमवर्गीय कुटुंब होतं. त्यामुळे घरच्यांचा नरेंद्रच्या गायनाला कडाडून विरोध होता. परंतु नरेंद्रच्या आतली गाणी गाण्याची खुमखुमी जात नव्हती. त्यावेळी त्यांच्या घरी टीव्ही नव्हता. त्या काळात ग्रामोफोनचं खूप प्रस्थ होतं. म्हणून ग्रामोफोन मधून गाणी ऐकुन त्यांचा रियाज करण्याची सवय नरेंद्रला लागली.

हळूहळू नरेंद्र लोकांसाठी गाऊ लागला. पण कुठे ?  तर भर बाजारात गर्दीमध्ये नरेंद्र गायचा. सिनेमांची गीतं, कधी भक्तीगीतं गात असल्याने श्रद्धाळू लोकं नरेंद्रच्या गळ्यात हार वैगरे घालायचे. काही जणं त्याच्या आवाजाचं कौतुक करून त्याला पैसे द्यायचे.

गर्दीमध्ये एका कोपऱ्यात नरेंद्रचे बाबा मुलाच्या या सर्व गोष्टी बघायचे. ते घरी आल्यावर हे सर्व प्रकरण बायकोला सांगायचे. बाहेर जरी शाबासकीची थाप मिळत असली तरी घरी आल्यावर नरेंद्रला आई – बाबांचा मार मिळायचा. 

अमृतसर मध्ये मिळाली प्रसिद्धी , थेट आर्मी कडून आलं निमंत्रण

कुटुंबीयांच्या विरोधाला न जुमानता नरेंद्र चंचल यांनी गाणं सुरूच ठेवलं. एका मुलाखतीमध्ये ते म्हणाले होते, “घरी विरोध खूप होता. पण हळूहळू अमृतसर मध्ये मी प्रसिद्ध झालो होतो. यामुळे मला लग्न, जगराता, देवीचा उत्सव अशा खूप ठिकाणी बोलावणं यायचं. घरून पैसे मिळत नव्हते. त्यामुळे अशा ठिकाणी जाऊन खर्चाला थोडेफार पैसे मिळायचे.” 

सण – समारंभात किंवा उत्सवात देवीची गाणी नरेंद्र गायचे. शिवाय मन्ना डे, मोहम्मद रफी यांची गाणी सुद्धा ते सादर करायचे. यामुळे एक गायक म्हणून त्यांना अमृतसर आणि पंजाब मध्ये लोकप्रियता मिळाली.

इतकंच नव्हे तर त्यांनी थेट भारतीय सीमेपर्यंत मजल मारली. 

१९७१ साली भारत – पाकिस्तान युद्धानंतर सैनिकांचं मनोरंजन करण्यासाठी नरेंद्र चंचल आणि त्यांच्या ग्रुपला आमंत्रण देण्यात आलं. तेव्हा सीमेवर जाऊन त्यांनी स्वतःच्या गायनाने भारतीय जवानांचं मनोरंजन केलं.

नरेंद्र यांचा आवाज ऐकुन तिथल्या अनेक मोठ्या अधिकाऱ्यांनी त्यांना सिनेमात गाण्याचा सल्ला दिला. सिनेमा क्षेत्र त्यांना खुणावत होतं, पण त्यांना संधी मिळत नव्हती. 

आणि ‘बॉबी’ सिनेमातील एका गाण्यामुळे रातोरात मिळाली प्रसिध्दी

गाणी गाता गाता नरेंद्र चंचल यांची बुल्लेशाहशी ओळख झाली. बुल्लेशाह हा पंजाब मध्ये होऊन गेलेला मोठा कवी आणि तत्वज्ञानी. बुल्लेशाहचं साहित्य , त्याचं लिखाण नरेंद्र यांना आवडू लागलं.

त्यांनी बुल्लेशाहच्या कविता सुफी अंदाजात गायला सुरुवात केली. याचे त्यांनी अनेक ठिकाणी कार्यक्रम केले. 

एकदा मुंबईत कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यावर श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. या श्रोत्यांमध्ये एका माणसाला पराकोटीचा आनंद मिळाला होता. स्टेज मागील ग्रीन रुममध्ये येऊन त्या माणसाने नरेंद्र चंचल यांना कडकडून मिठी मारली. हा माणूस म्हणजे राज कपूर. 

ते साल होतं १९७३.

राज कपूर त्यांच्या ‘बॉबी’ सिनेमासाठी एका गायकाचा शोध घेत होते, जो सुफी अंदाजात ते गाणं म्हणू शकेल. नरेंद्र चंचल यांच्या रूपाने त्यांना तो गायक सापडला होता. दुसऱ्याच दिवशी नरेंद्र चंचल यांनी गाणं रेकॉर्ड केलं.

‘बेशक मंदिर मस्जिद’ हे त्या गाण्याचे बोल होते. हे गाणं इतकं गाजलं, की त्यावर्षी सर्वोत्कृष्ट पार्श्र्वगायक म्हणून नरेंद्र चंचल यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. यामुळे त्यांना हिंदी सिनेसृष्टीत बरीच ओळख मिळाली. 

पुढे ज्या गायकाची गाणी ते लग्न समारंभात गायचे त्याच मोहम्मद रफी यांच्यासोबत त्यांना १९८० साली आलेल्या ‘आशा’ सिनेमात गायनाची संधी मिळली. दुर्गामातेची आळवणी करणारं ‘तुने मुझे बुलाया शेरावालिये’ या गाण्यामुळे दुर्गामातेची भक्तीगीतं गाणारे गायक म्हणून नरेंद्र चंचल ओळखले जाऊ लागले. 

अशाप्रकारे टिपिकल बॉलिवुड गाणी न गाता त्यांनी देवीची भक्तीगीतं गाण्याला प्राधान्य दिला. इतकी वर्ष देवीची गाणी  गायल्यामुळे ते सुद्धा दुर्गामातेचे भक्त झाले आहेत.

दरवर्षी २९ डिसेंबरला ते कतरा येथील वैष्णोदेवी मंदिरात असतात. आणि वर्षाच्या अखेरीस म्हणजे ३१ डिसेंबरला मंदिर परिसरात ते भजन आणि गाण्यांचं सादरीकरण करतात. 

जेव्हा संपूर्ण भारतात मार्च महिन्यात खूप कमी कोरोना रुग्ण सापडले होते तेव्हा कोरोनाला दूर सारण्यासाठी नरेंद्र चंचल यांनी गायलेलं भजन प्रचंड वायरल झालं होतं.

“किथो आया कोरोना… ओ माताजी… किथो आया कोरोना…”

या त्यांच्या भजनाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली होती.

काही गाण्यांचं आणि गायकांचं काही खास दिवशी विशेष महत्व असतं. याचप्रमाणे नवरात्रीच्या दिवसांमध्ये नरेंद्र चंचल यांची गाणी कानावर पडली नाहीत, तर नवरात्री काहीशी अपूर्णच वाटतात . यावर्षी तर खूप ठिकाणी नवरात्री साधेपणाने साजरा केली. नरेंद्र चंचल यांच्या आवाजाला आपण सगळ्यांनीच मिस केलं. पुढच्या वर्षी त्यांची गाणी ऐकत नवरात्र दुप्पट उत्साहाने साजरी करू असं कित्येकांनी मनाशी ठरवलेलं.

पण माता का बुलावा आला तर तो कोणाला चुकत नाही.

तसेच घडलं. आज दुपारी भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचे निधन झाले . ते ८० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आज दुपारी दिल्लीमधल्या अपोलो रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर कलाविश्वामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.