२३ आमदारांचं पाठबळ होतं पण कधी मुख्यमंत्रीपदासाठी सौदेबाजी केली नाही..

सध्याचं राजकारण वेगवान बनलेलं आहे. इथं पक्षाचं विचारसरणीच महत्व कधीच संपलेलं आहे. नेतेमंडळींसाठी सत्तेची खुर्ची महत्वाची. कधी कोण उठून कुठल्या पक्षात जाईल याची खात्री नाही. काल ज्या नेत्याच्या विरुद्ध प्रचारसभा रंगवल्या उद्या त्याच्या मांडीवर थाप मारत शपथा घेतल्या जातात.

चार आमदारांचं पाठबळ असलेला नेता देखील गुरकावुन बोलताना दिसतो. अगदी ग्रामपंचायत नगरपालिकेपासून ते दिल्लीतल्या केंद्र सरकारपर्यंत हीच परिस्थिती आहे. सौदेबाजी हीच राजकारणाची खूण समजली जाते. डील करण्यात उस्ताद असणारे पॉलिटिकल मॅनेजर हेच सत्तेच्या खुर्च्या बळकावण्यात दिसतात.

पण एक काळ होता जेव्हा राजकारणात साधनशुचितेला महत्व होतं , लोक आपले प्राण पणाला लावून विचारसरणी जपायचे. पदांसाठी सौदेबाजीचा विचार स्वप्नात देखील यायचा नाही. आपल्या नेत्याच्या पाठीशी उभे राहण्यासाठी कोणतंही आमिष द्यावं लागायचं नाही.

असाच एक थोर नेता म्हणजे माजी मजूरमंत्री नरेंद्र तिडके.

विदर्भातल्या नागपूर जिल्ह्यातील साहुली येथे शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या तिडके यांचा लहानवयात राजकारणाशी संबंध आला. ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या स्वातंत्र्य चळवळीचा भारावून टाकणारा काळ अनेक तरुणांप्रमाणे तिडके यांनाही प्रभावित करून गेला. (स्व.) दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली युवक चळवळीत त्यांनी सहभाग घेतला.

१९४२ सालच्या लढ्यात विद्यार्थीदशेत असलेल्या तिडके यांनी कारावास भोगला होता. स्वातंत्र्यलढ्याच्या काळापासूनच त्यांनी काँग्रेसमध्ये काम करण्यास सुरवात केली. स्वातंत्र्य मिळाल्यावर ते सक्रिय राजकारणात सहभागी झाले.

देशात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीवेळी म्हणजेच १९५२ साली तत्कालीन मध्य प्रदेशातून नरेंद्र तिडके यांनी पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक लढवली व त्यात निवडूनही आले. आपल्या अभ्यासू धारधार व्यक्तिमत्वामुळे त्यांनी मध्यप्रदेशच्या विधिमंडळात एक वेगळीच छाप पाडली. पुढे विदर्भ द्विभाषिक राज्यात समाविष्ट करण्यात आला.

त्याकाळात संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीने जोर पकडला होता. मोरारजी देसाईंच्या अन्यायकारी सरकारने मराठी जनतेवर अन्याय करायचे धोरण अवलंबले होते. चळवळ ऐन भरात होती. कित्येकांनी यासाठी रक्त सांडले. या आक्रोशाला दिल्लीतही कोणी लक्ष देत नव्हते. अखेर मराठी माणूस काँग्रेस विरोधात उभा राहिला.

१९५७ साली झालेल्या मुंबई प्रांताच्या विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसला धडा शिकवण्यात आला. संयुक्त महाराष्ट्र समितीने जागोजागी काँग्रेसचा मोठ्या प्रमाणात पराभव केला. पश्चिम महाराष्ट्रात तर यशवंतराव चव्हाणांसारखे मोजके अपवाद वगळता सर्व काँग्रेस उमेदवार पडले. 

नव्यानेच मुंबई प्रांतात समाविष्ट झालेल्या विदर्भाने मात्र काँग्रेसला हात दिला. विदर्भ आणि गुजरात मध्ये निवडून आलेल्या आमदारांच्या जोरावर काँग्रेस सत्तेत आली. त्यातही यशवंतराव चव्हाण यांना मुख्यमंत्री बनण्यासाठी विदर्भातील नरेंद तिडके यांची मोलाची साथ दिली.

नरेंद्र तिडके यांनी २३ आमदारांची ताकद  यशवंतरावांच्या मागे उभी केली. एवढे आमदार बरोबर असतानाही तिडके यांनी मुख्यमंत्रीपदाची सौदेबाजी वगैरे केली नाही हेच त्यांचे वेगळेपण.

१९५७ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेलेल्या तिडके यांची १९७७ पर्यंत सलग सत्तेने साथ केली. प्रदीर्घ काळ सत्ता उपभोगूनही त्यांची कारकीर्द निष्कलंक राहिली. ग्रामविकास खात्याचे उपमंत्री म्हणून मंत्रिपदाची कारकीर्द सुरू करणाऱ्या तिडके यांनी कामगार, नियोजन, उद्योग, ऊर्जा, सहकार, संसदीय कार्य आदी खात्यांचा कार्यभार पाहिला.

राज्याचे अल्प काळ हंगामी नेतृत्व त्यांनी केलं.  त्यांच्या पाठीशी आमदारांचे एवढे मोठे बॅकिंग होते मात्र कधी मुख्यमंत्रीपद सोडाच पण मोठे मंत्रिपदाची अपेक्षा देखील केली नाही. 

महाराष्ट्राने पाहिलेला सर्वात कार्यक्षम कामगार मंत्री म्हणून नरेंद्र तिडके यांना ओळखले जाते.

महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील रोजगार हमी योजना आता केंद सरकारने स्वीकारली आहे. या योजनेचे प्रणेते वि. स. पागे हे असले तरी तिडके यांच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्याबाबतचा कायदा सभागृहात मंजूर झाला. माथाडी कामगार कायदा त्यांच्याच मंत्रिपदाच्या कार्यकाळात मंजूर झाला. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्षपद तिडके यांनी भूषवले होते.

१९५६ व १९६९मध्ये जीनिव्हा येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या परिषदेत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. १९५६मध्येच ऑक्सफर्ड येथे झालेल्या राष्ट्रकुल देशांच्या परिषदेत त्यांनी भाग घेतला होता. राष्ट्रीय मिल मजदूर संघात माफियांचा मुक्त संचार सुरू झाला, तेव्हा तिडकेंसारखी मंडळी हळूहळू दूर झाली.

अनेकदा राजकीय प्लॅटफॉर्मवर त्यांचे कामगार नेता जॉर्ज फर्नांडिस यांचे वाद संपूर्ण देशभरात गाजले. जॉर्ज फर्नांडिस यांनी त्यांच्या धोरणांवर अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली मात्र नरेंद्र तिडके यांच्या चारित्र्यावर कधी कोणी डाग लावू शकला नाही.

पांढरे स्वच्छ धोतर, खादीचा जाडाभरडा कुर्ता, नाकावर बराच खाली उतरलेला चष्मा, हातात कापडी पिशवी अशा वेशात नरेंद्र तिडके जेव्हा मंत्रालय परिसरात पायी फिरताना दिसत, तेव्हा हे गृहस्थ तब्बल २३ वर्षे मंत्री होते, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघासारख्या बलाढ्य कामगार संघटनेचे नेते होते यावर अलीकडच्या पिढीतील राजकीय कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसे.

असे नेते कार्यकर्ते होते म्हणून महाराष्ट्राने इतर राज्यांच्या तोडीस मोठी प्रगती केली. साध्या नगरपालिकेच्या राजकारणात नगरसेवक फोडाफोडीचे राजकारण आपण पाहतो तेव्हा नरेंद्र तिडके यांच्या सारख्या नेतृत्वाची हमखास आठवण येते हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.