नर्गिसची आठवण म्हणून सुनील दत्त यांनी बार्शीमध्ये कॅन्सर हॉस्पिटल उभारले.
ऐंशीच्या दशकातली गोष्ट आहे. फिल्मइंडस्ट्री मधील एक आदर्श जोडपं म्हणून सुनील दत्त आणि नर्गिस यांना ओळखलं जातं होतं.
एकेकाळी चित्रपटसृष्टीवर राज्य करणाऱ्या नर्गिस आता संसारात रमल्या होत्या. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा होता. मोठा मुलगा संजय दत्त सिनेमात पदर्पणाची तयारी करत होता.
सगळं काही अगदी आखीवरेखीव सुरू होतं आणि अचानक त्यांच्या सुखी संसाराला कोणाची तरी दृष्ट लागली.
नर्गिस यांना कॅन्सर निदान झाला होता.
त्याकाळी कॅन्सर हा असाध्य रोग मानला जायचा. त्याच्यावर उपचार करण्यासाठी भारतात अद्यावत रुग्णालये नव्हती. सुनील दत्त यांच्यावर आभाळच कोसळले. कसबस त्यांनी स्वतःला सावरलं.
नर्गिस यांना अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
तिथे किमोथेरपी व इतर उपचार सुरू करण्यात आले. त्या काळात तर नर्गिस यांना प्रचंड यातना सहन कराव्या लागत होत्या आणि त्यांचे हे हाल सुनील दत्त यांना बघवत नसत.
त्यानंतर तर त्यांची तब्येत अजून बिघडली आणि त्या कोमा मध्ये गेल्या आणि त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवावं लागलं.
एक वेळी तर अशी आली की डॉक्टरांनी त्यांचा लाइफ सपोर्ट काढून घेउन त्यांना सुखाने मरू देण्याचा सल्ला सुनील दत्त यांना दिला होता.
पण सुनील दत्त मात्र त्यासाठी तयार झाले नाहीत, त्यांनी डॉक्टरांना नकार कळवला.
आपण कुठल्याही परिस्थितीत नर्गिसला मरू देणार नाही, असं ते म्हणत.
त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न सोडले नाहीत. विशेष म्हणजे काही दिवसांनी नर्गिस बऱ्या झाल्या पण त्यानंतर त्या फार काळ जगू शकल्या नाहीत.
थोड्याच दिवसात त्यांचं निधन झालं, मुलगा संजय दत्तच्या ‘रॉकी’ सिनेमाच्या प्रीमियरला देखील त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.
सुनील दत्त यांच्या डोक्यात एकच विचारचक्र फिरत होत,
आपल्या पत्नीला अमेरिकेत उपचारासाठी नेणे हे आपल्याला परवडत होतं पण भारतात असे अनेक जण आहेत ज्यांच्यासाठी कॅन्सरवर उपचार परवडत नाहीत. त्यांच्यासाठी काही तरी केलं पाहिजे.
त्याच क्षणी त्यांनी आपल्या बायकोची आठवण म्हणून एक हॉस्पिटल सुरू करायच ठरवलं, पण हे हॉस्पिटल मुंबईसारख्या शहरापेक्षा ग्रामीण भागात असावे अशी त्यांची इच्छा होती.
सुनील दत्त हे मूळचे पंजाबचे मात्र त्यांना हे हॉस्पिटल आपली कर्मभूमी महाराष्ट्रात व्हावे असे वाटत होते.
गुलशन राय नावाचे एक सुप्रसिद्ध निर्माते आणि डिस्ट्रिब्युटर होते. त्यांच्या ओळखीने काही जण सुनील दत्त याना भेटायला आले. योगायोगाने त्यांनी एका कॅन्सरच्या ग्रामीण रुग्णालयाचे प्रपोजल आणले होते.
यात होते बार्शीचे स्थानिक नेते दिलीप सोपल, मदन चौहान आणि डॉ. बी.एम.नेने.
डॉ.भगवान उर्फ शरद महादेव नेने हे मूळचे बार्शीचेच. त्यांनी इंग्लंडमधील प्रतिष्ठित विद्यापीठातुन वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षण पूर्ण केले होते. तिथे त्यांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असतानाही त्यांनी भारतात आपल्या मूळ गावी परत येण्याचा निर्णय घेतला.
बार्शी तालुका म्हणजे दुष्काळी भाग. येथे साध्या वैद्यकीय सुविधा मिळणे मुश्किल त्यात कॅन्सर सारख्या रोगावर उपचार तर अशक्यच होतं. डॉ नेणेंनी मात्र तिथे कॅन्सर हॉस्पिटल उभारायचंच असा प्रण केला होता.
त्यांचे पेशंट असलेल्या सर्वमंगलबाई कथले यांचे पती बाबुराव कथले यांनी या हॉस्पिटलसाठी बार्शी मधील साडे सात एकरची जागा दान दिली होती.
मुंबईच्या टाटा हॉस्पिटलने लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले होते.
पण कॅन्सर हॉस्पिटल उभे करण्यासाठी प्रचंड मोठ्या निधीची आवश्यकता होती. गुलशन राय यांच्या माध्यमातून त्यांची ओळख सुनील दत्त यांच्याशी झाली.
डॉ. नेनेंची बार्शी मध्ये कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याची कल्पना ऐकून सुनील दत्त प्रचंड खुश झाले. त्यांच्या देखील मनात हेच होते. लगेच सूत्रे हलवण्यात आली.
सुनील दत्त यांनी हॉस्पिटल उभारणीसाठी स्वतः मोठी रक्कम मदत म्हणून दिली.
पण सोबत 11 एप्रिल 1982 रोजी बार्शी मध्ये फिल्म इंडस्ट्रीमधल्या दिग्गज कलाकारांना घेऊन मल्टीस्टारर चॅरिटी शो घेतला. यात मिळालेले सगळे पैसे डॉ. नेने यांच्या अश्विनी ट्रस्टला दान दिले.
या सगळ्या पैशातून बार्शीमध्ये नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल स्थापन झाले.
आजही या रुग्णालयात सोलापूर, सातारा सांगली, कोल्हापूर सोबतच उस्मानाबाद लातूर या जिल्ह्यातुन आलेल्या गोरगरीब कॅन्सर पेशंट उपचार घेतात.
नुकताच डॉ.बी एम नेने यांचे निधन झाले. वयाच्या ८० व्या वर्षी सुद्धा ते या क्षेत्रात अथक काम करत होते़ आणि या सर्वांसाठी त्यांना पगार, फी, मानधन यासारखे मोबदला कधी घेतला नाही.
संस्थापक चेअरमन या नात्याने कर्करोगाचे कार्य त्यांंच्यासाठी एक मिशन, दृष्टी आणि स्पप्न होते.
काही वर्षांपूर्वी सुनील दत्त यांचा मृत्यू झाला मात्र त्यानंतरही त्यांची मुलगी प्रिया दत्त, नम्रता दत्त आणि फिल्मस्टार संजय दत्त यांनी या हॉस्पिटलमधला मदतीचा ओघ तसाच सुरू ठेवलेला आहे.
हे ही वाच भिडू.
- एक रुपयाच्या उधारीने सुनील दत्तला आयुष्यभराचा धडा शिकवला.
- नर्गिसची मुलाखत घेता आली नाही म्हणून सुनील दत्त यांची नोकरी गेली असती.
- हॉस्पिटलपासून ३२ किलोमीटरवरील मंदिरात बसून हार्ट सर्जरी करत त्यांनी इतिहास रचला !