नागपुर, रामटेकसाठी कामाचा डोंगर उभारला अन् बक्षिस काय मिळालं, “बाहेरचा उमेदवार नको” हा ठराव

कॉंग्रेस पक्षाने महाराष्ट्राच्या कोट्यात असणाऱ्या एकमेव जागेवरून इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिली. इम्रान प्रतापगढी हे युपीचे. आत्ता त्यांच्या उमेदवारीवरून कॉंग्रेसच्या नेत्यांनीच टिका करण्यास सुरवात केली.

कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी इतके वर्ष कॉंग्रेससाठी राबलो मात्र उमेदवारी नवख्या व्यक्तीला दिली याबद्दल असंतोष व्यक्त केला तर महाराष्ट्रातल्या कॉंग्रेसी नेत्यांनी बाहेरचा उमेदवार नको म्हणून टिका करण्यास सुरवात केली. 

कॉंग्रेस प्रदेश महासचिव असणारे आशिष देशमुख यांनी तर आपल्या पदाचा राजीनामा देत बाहेरच्या उमेदवारावर टिका केली. बाहेरचा आणि महाराष्ट्राचा अशी टिका राज्यसभेच्या उमेदवारीवरून व्हायला लागली. एखाद्या राज्यातून बाहेरचा उमेदवार देण्याची प्रथा फक्त कॉंग्रेसचीच आहे का तर नाही. भाजप, कॉंग्रेस या दोन प्रमुख पक्षांसह उतर पक्ष देखील आपल्या कोट्यातून बाहेरच्या व्यक्तीला राज्यसभेत पाठवतात हा इतिहास आहे.. 

आत्ता बाहेरचा म्हणून टिका होणार हे स्वाभाविक आहेच, पण इतिहास देखील एक असाच दाखला आहे.. 

नागपुर ग्रामीण जिल्हा कॉंग्रेस कमिटीने एक ठराव दिल्लीला पाठवलेला अन् हा ठराव होता नरसिंह राव यांच्या विरोधात. आम्हाला बाहेरचा उमेदवार नको म्हणून नरसिंह राव यांच्या उमेदवारीला विरोध करण्याचा कार्यक्रम कॉंग्रेसकडून राबवण्यात आला होता.. 

ही गोष्ट समजून घेण्यासाठी आपणाला इतिहासत जावं लागतं… 

खरं तर नरसिंह राव मूळचे आंध्र प्रदेशचे. हैद्राबाद मुक्तिसंग्रामाच्या काळापासून त्यांच आणि महाराष्ट्राचं जिव्हाळ्याचं नातं राहील आहे. नरसिंह राव यांचं महाविद्यालयीन शिक्षण देखील पुण्यात फर्ग्युसन कॉलेज आणि एलएलबी नागपूर विद्यापीठातून झाली. स्वतः बहुभाषा कोविद असलेले पी.व्ही.नरसिंह राव हे मराठी भाषेचे उत्तम जाणकार होते.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेल्या रावांना त्यांच्याच राज्यातून मोठा विरोध होता.  त्यामुळे बराच काळ ते दिल्लीतच राजकारण सांभाळत होते. इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र खात्याचे ते मंत्री होते. त्यांची ओळख काँग्रेसचे चाणक्य अशी बनली. इंदिरा गांधी राजीव गांधी यांचे खास विश्वासू नेते होते त्यात नरसिंह राव यांचं होतं.

१९८४ साली इंदिरा गांधींची हत्या झाली आणि भारताच्या राजकारणाने वेगळंच वळण घेतलं.

अनपेक्षित धक्क्यामुळे अननुभवी राजीव गांधी  सत्तेत आले. जेव्हा तिकीट वाटप चाललं होतं.  नरसिंह राव यांना त्यांच्या नेहमीच्या हनमकोंडा मतदारसंघात दगाफटका होण्याची शक्यता होती. पण राजीव गांधींना नरसिंह राव लोकसभेत आणि आपल्या मंत्रिमंडळात हवे होते. त्यांना आंध्र प्रदेशच्या ऐवजी वेगळीकडे उमेदवारी द्यायचं ठरलं. यावेळी मतदारसंघ ठरला रामटेक.

रामटेक काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ होता. निवडून येण्याची खात्री असल्यामुळे नरसिंह राव यांनी तिथून अर्ज भरला. त्यांच्या विरुद्ध शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसने  शंकरराव गेडाम यांना तिकीट दिलं. पण पी. व्ही. नरसिंहराव हे १ लाख ८५ हजार ९७२ अशा विक्रमी मताधिक्क्याने निवडून आले.

राजीव गांधी यांनी नरसिंह राव यांना संरक्षण मंत्री बनवलं. त्यांच्या मंत्रिमंडळात आपल्या अनुभवाच्या जोरावर रावांनी चांगली कामगिरी बजावली.

त्यानंतर रामटेक व पर्यायाने नागपुरच्या विकासाची जबाबदारी आली ती आंध्रच्या नरसिंहराव यांच्याकडे.. 

नागपूर हे मध्यवर्ती ठिकाणी होते व त्याच्या आजूबाजूला नागपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघ म्हणजेच रामटेक मतदारसंघ पसरलेला होता. त्यामुळे नरसिंहराव जेव्हा रामटेकच्या दौऱ्यावर यायचे तेव्हा रात्री मुक्कामासाठी नागपूरलाच रहायचे. 

1982 च्या काळात महाराष्ट्राची उपराजधानी असलेलं हे ठिकाणं डेव्हलप नव्हतं. इथे नवीन उद्योगधंदे येत नव्हते. जून्या काळातल्या कापडाच्या मिल बंद झाल्या होत्या. दूसरीकडे उच्च शिक्षणाच्या म्हणाव्या तश्या सोईसुविधा नव्हत्या. 

दूसरीकडे नरसिंहराव देशाचे संरक्षणमंत्री झाले होते. देशाच्या राजकारणात क्रमांक दोनचे नेते ठरत होते. नरसिंहरावांनी आपल्या या मतदारसंघात इंजिनियिरिंग कॉलेज असावे असा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी रामटेक येथे आपल्या परिचित व्यक्तीला इंजियनिरिंग कॉलेज काढण्यास सांगितले. तसेच नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदीच्या काठावर अन्य एका उद्योगपतीला पॉलिस्टर कारखाना काढण्यासाठी प्रोत्साहन दिले.

हा कारखाना म्हणजे विदर्भातला पहिला २५० कोटींचा कारखाना होता.

विचार करा 1982 साली आपल्या मतदारसंघाट २५० कोटींचा कारखाना उभारून कित्येकांना नोकरी देण्याचं काम नरसिंहरावांनी केलं. सोबतच ॲल्युमिनियमचा कारखाना देखील काढण्यात आला. त्यांच्या या मोठ्या प्रोजेक्टमुळे अन्य लहानमोठ्या कंपन्यांना देखील प्रोत्साहन मिळाल आणि मौदा हे उद्योगिक केंद्र झालं.. 

हे उद्यौगिक केंद्र उभारण्याची कामगिरी केली ती नरसिंह राव यांनी.. 

दूसरीकडे नागपूरपासून २० किलोमीटर अंतरावर कळमेश्वर इथे इस्पातचा कारखाना उभारण्यात आला. अशीच गोष्ट कॅट स्कॅन मशीनची. जपानमार्फत भारताला कॅट स्कॅन मशीन देण्यात येणार होती. ही मशीन दूसऱ्या राज्यात जाणार होती. नरसिंहरावांनी मात्र ही मशिन नागपूरच्या मेडिकल कॉलेजला मिळवून दिली. सोबतच त्यांनी राम सायन्स सेटंर सुरू केले.

तेव्हा देशात केवळ ६ ठिकाणीच रामन सायन्स सेंटर होते. हे केंद्र पूर्वी मुंबईत सुरू करण्यात आलं होतं. मात्र नरसिंहरावांनी शिवाजीराव निलंगेकर यांच्या मदतीने हे केंद्र नागपूरात चार एकर जागेवर उभारलं. यामुळे शैक्षणिक संकुल म्हणून नागपुरात भर पडली. 

रामटेक व नागपूरवर प्रेम करत असताना नरसिंहरावांनी प्रसंगी आपल्या आंध्रप्रदेशवर देखील अन्याय केला. दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र आंध्रप्रदेशमध्ये उभारण्यात येणार होते मात्र नरसिंहरावांनी हे केंद्र नागपूरात आणले. 

हे सगळं नरसिंहरावांनी साध्य केलं ते पहिल्याच पाच वर्षात मात्र त्यांच बक्षिस त्यांना काय मिळालं तर नागपूरच्या ग्रामीण जिल्हा कॉंग्रेस कमिटने एक प्रस्ताव १९८९ च्या निवडणूकीसाठी पारीत केला. 

हा प्रस्ताव होता आम्हाला बाहेरचा उमेदवार नको… 

खुद्द नरसिंहरावांना देखील निवडणूक लढवण्याचा हिरमोड झाला. दूसरीकडे देशपातळीवर बोफोर्स पासून विविध प्रकरणं गाजू लागली होती. अशातच १९८९ च्या निवडणूका पार पडल्या. जनता दलामार्फत पांडुरंग हजारे यांना तिकीट देण्यात आलं. हजारे यांच्या रुपात स्थानिक विरूद्ध उपरा असा प्रचार करण्यात आला या निवडणूकीत नरसिंहरावांना २ लाख २ लाख ५७ हजार ८०० मते मिळाली तर पांडुरंग हजारे यांना २ लाख २३ हजार ३३० मते मिळाली. नरसिंहराव यांचा ३४ हजार ४७० मतांनी निसटता विजय झाला होता.

त्यानंतर मात्र १९९१ सालच्या निवडणूकीत रामटेक मधून नरसिंहरावांना तिकीट नाकारण्यात आलं. नंतर राजीव गांधींचं अकास्मित अपघातात निधन झालं अन् पुन्हा नरसिंहराव राजकारणाच्या केंद्रबिंदूवर आले ते देशाचे पंतप्रधान झाले.

जिल्हा कॉंग्रेस कमिटीने त्यांना बाहेरचा उमेदवार म्हणून विरोध केला नसता तर १९९१ साली देखील रामटेक हाच त्यांचा मतदारसंघ राहिला असता व आजच्याहून अधिक विकसित असं नागपुर आपणाला पहायला मिळालं असतं हे मात्र नक्की… 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.