गॅस नक्की का महागलाय ?

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सारखीच वाढ होते आहे. हा झटका माणसांना काय रोजच बसतोय. पण केंद्र सरकारने हे झटके कमी करायच्या ऐवजी अजून जबरी झटके द्यायचं ठरवलंच आहे.

सरकारने गुरुवारी नैसर्गिक वायूच्या म्हणजेच नॅचरल गॅसच्या किमतीत तब्बल ६२ टक्के वाढ केली आहे. या प्रचंड दरवाढीमुळ नजीकच्या काळात वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सीएनजी आणि प्रमुख शहरांमध्ये घरगुती वापरासाठी पुरवठा केल्या जाणाऱ्या पाईप गॅसच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

१ ऑक्टोबर अर्थात कालपासूनच पुढच्या ६ महिन्यांसाठी ही दरवाढ लागू झाली आहे.

भारतात, दरवर्षी सुमारे १ टक्क्यानं वाढत असलेल्या लोकसंख्येबरोबरच तेल, नैसर्गिक वायू आणि कोळशासारख्या इंधनांची मागणी देखील वाढते आहे. पुनर्नवीकरण शक्य नसलेल्या या उर्जास्त्रोतांवर संपूर्ण अर्थव्यवस्था टिकून असते.

यावर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई आणि ऑस्ट्रेलियाच्या मोनाश विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या अभ्यासामध्ये असं म्हंटलंय की,

भूतकाळाचा मागोवा घेऊन भारतातील नैसर्गिक वायूच्या विविध प्रकारांच्या गॅस उत्पादन आणि उपयोगाच्या भविष्यातील प्रवृत्तीबद्दल काही आडाखे बांधले असता त्यात असे दिसते की, सन २०४० पर्यंत भारतातील नैसर्गिक वायूचा साठा कमी होईल आणि टंचाईमुळे देशांतर्गत उत्पादित गॅसची किंमत दुप्पट होईल. खरे तर २०११ पासूनच देशांतर्गत गॅसचे उत्पादन कमी होत आहे. त्यामुळे दर वाढतच आहेत.

पण दरवाढीसाठी काही टेक्निकल कारण ही आहेत. 

तर देशांतर्गत गॅस धोरणानुसार दर सहा महिन्यांनी नैसर्गिक वायूच्या दरांचा फेरआढावा घेतला जातो. त्यानुसार देशात गॅसचे नवे दर निश्चित केले जातात. आता १ ऑक्टोबरला गॅसचे नवे दर निश्चित करण्यात आलेत. पूर्वीचा अ‍ॅडमिनिस्टर्ड रेट म्हणजे APM चा दर १.७९ डॉलर्स इतका होता.

१ ऑक्टोबरपासून हे दर वाढवण्यात आले आहेत. जाहीर केलेल्या किंमतीनुसार, कठीण तेल क्षेत्रातून उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक वायूचे दर प्रति दशलक्ष ब्रिटीश थर्मल युनिटसाठी (BTU) २.९० डॉलर इतके असणार आहेत. त्यात आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या केजी-डी ६ आणि बीपी पीएलसी (BP Plc) खोल समुद्रातील वायू क्षेत्रातून उत्खनन होणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमतही ऑक्टोबरपासून वाढली आहे.

आता झालेल्या दरवाढीचा परिणाम काय होणार आहे ?

नैसर्गिक वायूच्या किमतीतील वाढीमुळे सीएनजी, तसेच मुंबई व दिल्लीसारख्या शहरांमधील पाइपने मिळणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत १० ते ११ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, यामुळे वीजनिर्मितीच्या खर्चातही वाढ होईल.

मुंबईत सर्वाधिक ऑटो रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक CNG इंधनाचा वापर करतात. यासोबतच BEST च्या बस आणि अनेक खासगी गाड्या देखील CNG चा वापर करतात. यामुळे सार्वजनिक प्रवास देखील महागणार.

तर दुसरीकडे शेतकऱ्यांना ही त्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार. खत उत्पादक कंपन्यांना खत निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांमध्ये नैसर्गिक वायूचा वापर करतात. त्यामुळे उत्पादन खर्च वाढल्यास खत उत्पादकांडून भाववाढ केली जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा ग्राहकांना नॅचरल गॅसवर अवलंबून असणाऱ्या सगळ्याच गोष्टींसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.