गॅस एजन्सीवाला थेट पाकिस्तानच्या ISI चा हस्तक निघालाय…!
भारतात सणासुदीच्या काळात दहशतवादी हल्ले करण्याच्या उद्देशाने आलेल्या सहा जणांना कालपरवाच दिल्ली पोलिसांनी अटक केली. त्यातल्या दोघांना पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स म्हणजे आयएसआय या गुप्तचर संस्थेने प्रशिक्षण दिल्याचे उघड झाल होत.
आता हे संपतंय न संपतंय तोच राजस्थानातली अजून एक घटना उघड झालीय.
राजस्थानातल्या झुंझुनू भागात राहणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केलीय. कारण काय तर या तरुणाने हेरगिरी करून सैन्याशी संबंधित माहिती पाकिस्तानला पुरवली आहे. या तरुणाचं नाव आहे संदीप कुमार. आणि यात सुद्धा आयएसआयचा हात असल्याचं स्पष्ट झालंय.
हा संदीप कुमार झुंझुनू येथील इंडेन गॅस एजन्सीचा ऑपरेटर आहे. राजस्थान गुप्तचर विभागाचे पोलीस महासंचालक उमेश मिश्रा यांनी सांगितल की, आरोपी तरुणाने राजस्थानच्या नारद येथे असलेल्या लष्करी छावणीतून छायाचित्रे आणि काही गोपनीय, संवेदनशील माहिती गोळा केली होती. त्यांच्या मते, आरोपी सतत पाकिस्तानी हँडलर्सच्या संपर्कात होता .
या संदीप कुमारवर आरोप आहे की पैशाच्या लोभात त्याने ही संवेदनशील आणि गोपनीय माहिती पाकिस्तानी हँडलर्स सोबत शेअर केली. यानंतर, राज्य गुप्तचर आणि लष्करी गुप्तचर दक्षिण कमांडने संयुक्त कारवाई केली. १२ सप्टेंबरलाआरोपीला ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली.
केंद्रातल्या सगळ्या एजन्सींनी याला चोप दिल्यावर या बाबाने आपलं तोंड उघडलं.
३० वर्षाचा हा आरोपी संदीप कुमार झुंझुनू जिल्ह्यातील नरहाडचा रहिवासी आहे. लष्कराच्या छावणीसमोर इंडेन गॅसची जी एजन्सी आहे, तिथं तो इन्चार्ज म्हणून काम करत होता. त्यात आणि हा आर्मी कॅम्पमध्ये गॅस पुरवठ्याचे काम सुद्धा करत होता.
चौकशी दरम्यान त्याने सांगितल की जुलै २०२१ मध्ये पाकिस्तानी हँडलर्सने त्याच्याशी संपर्क साधला. त्यात त्याला लष्कराच्या छावणीचे फोटो आणि काही गोपनीय माहिती मागितली. त्या बदल्यात त्याला मागेल तेवढे पैसे देऊ असं पण सांगितलं. त्यानंतर या बिलंदर माणसाने आपल्या बँकेचे डिटेल्स पुढच्या पाकिस्तानी हँडलर्सला पाठवले.
जेव्हा तपास यंत्रणांना एका इंडियन नंबरवर पाकिस्तानातून मॅसेजची देवाणघेवाण होते असं समजलं तेव्हा यांनी लगेच माग काढून संदीपला ताब्यात घेतलं. तोपर्यंत तर संदीपने कॅम्पचे फोटो काढून पाठवले सुद्धा होते. आता या गोष्टी पाहता, संदीपला अटक करुन त्याच्याविरुद्ध अधिकृत गुप्त कायदा (OSA), १९२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा OSA हे हेरगिरीविरोधी कायदा आहे.
हेरगिरीपासून देशद्रोहापर्यंतचे कलम या कायद्यात समाविष्ट आहे. २ एप्रिल १९२३, पासून OSA अस्तित्वात आहे. जर एखादी व्यक्ती देशद्रोहाच्या हेतूनेकाही चुकीच्या गोष्टीत गुंतलेली असेल आणि त्याच्याविरोधात अधिकृत गुप्त कायदया अंतर्गत गुन्हा सिद्ध झाला तर शिक्षा तीन वर्षांपासून ते १४ वर्षांपर्यंत असू शकते.
हे ही वाच भिडू
- ९/११ चा दहशतवादी हल्ला संपूर्ण जगाच्या राजकारणाची दिशा बदलून गेला
- समीर कालिया दहशतवादी असेल असं त्याच्या शेजाऱ्यांना देखील कधी वाटलं नाही..
- जम्मूमध्ये झालेला पहिलाच ड्रोन हल्ला भारताच्या सुरक्षायंत्रणेसाठी धोक्याची घंटा ठरू शकतोय