नेदरलँडमधून भारत जिंकायला आला आणि केरळच्या राजाचा आरमारप्रमुख झाला…

मल्याळम बोलणाऱ्या माणसांची संस्कृती, याड लावणारी गाणी, कला, पिच्चर, इतिहास, दारूवरचं प्रेम, खाण्यातली श्रीमंती आणि भाषेचा मजबूत अभिमान..!

या लोकांनी सगळ्यात आधी “आपण समाज म्हणून कोण हौत, आपलं नक्की अस्तित्व कायय” हे समजून घेतलं आणि आपल्या गोतावळ्यात येईल त्याला सामील करून घेतलं. मुसलमान लोकं भारतात सगळ्यात आधी इथंच उतरले, ख्रिश्चनही सगळ्यात आधी इथंच आले, ज्यू लोकांनीही पहिल्यांदा वस्ती इथंच केली…

पण ही लोकं केरळमध्ये येऊन कधीच वायली झाली नाहीत. ती मल्लूच बनून गेली. केरळच्या संस्कृतीशी ती एवढी एकरूप झालीत की ह्यातला कोण कुठल्या धर्मा-जाती-देशाचा हे सांगणं कठीणय.

ही स्टोरी अशाच एका सातासमुद्रापलीकडून उतरलेल्या माणसाची आहे ज्याला केरळने कायमचं आपलंसं केलं…

ह्यूस्टॅशियस डी लॅनोय हा मूळचा बेल्जीयमचा माणूस. डचांच्या (म्हणजे नेदरलँडच्या) ईस्ट इंडिया कंपनीत कामाला होता.

कोलाचेल इथं १७४१ मध्ये झालेलं युद्ध म्हणजे डचांच्या नाकावर भारतीयांनी मारलेली टाच..

डचांच्याच फौजेकडून चुकून ठिणगी पडली. त्याच्याच दारुगोळ्याने डचांच्या भाताच्या पोत्यांना उडवून टाकलं. सैन्य हे नेहमी पोटावर चालते असं म्हणतात त्याप्रमाणे ह्याचा एवढा जबर झटका बसला की त्रावणकोरच्या राजासमोर शरणागती पत्करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताच उपाय राहिला नाही.

या विजयाने फार मोठी लाभ-हानी कुणालाच झाली नाही मात्र युरोपच्या लोकांना समजून चुकलं की भारतीयांना जिंकून घ्यायचं असेल तर रचनात्मक चढाई, डोकेबाजपणाने युद्ध लादून वेगवेगळ्या मार्गांनी त्यांना फितवावं लागेल.

युरोपीय लोकांना ही अपचनीय गोष्ट होती. 

डचांच्या नौदलाच्या या तुकडीला उदयगिरी किल्ल्यात डांबण्यात आले. आपल्यासोबत नक्की काय होणार आहे याची कोणतीही कल्पना ह्या लोकांना नव्हती. पण ह्यूस्टॅशियस डी लॅनोय ह्याने मार्तंड वर्मा ह्या राजाचा विश्वास संपादन केला.

त्याशिवाय त्याच्या प्रधानालाही आपल्या बाजूने वळवून घेतलं आणि स्वतःसाठी व आपल्या जोडीदारासाठी जीवदान मागितलं. राजानेही त्याला बंधमुक्त केलं आणि त्रावणकोरची सेवा करण्याची संधी त्याला देऊ केली.

अशा प्रकारे ह्यूस्टॅशियस डी लॅनोय केरळच्या राज्याचा भाग बनला. ज्या किल्ल्यात हा करार झाला तो किल्ला आता थिरुअनंतपूरम हायवेजवळ विदीर्ण अवस्थेत उभा आहे. त्याच्यानंतर ह्या किल्ल्याला डी लॅनोयचा किल्ला म्हणजे मल्याळम अपभ्रंशात दिल्लीनाई कोट्टाई हे नाव पडलं. ह्याच किल्ल्यात त्याची समाधीही बनवण्यात आली आहे.

त्याने पुढची अनेक वर्षे त्रावणकोर राज्याची सेवा केली.

तो काम करत होता ती ईस्ट इंडिया ही जगातली पहिली बहुराष्ट्रीय कंपनी होती असे म्हणता येईल.

ह्या कंपनीला डच भाषेत Vereenigde Oost-Indische Compagnie अर्थात VOC म्हटले जात असे व तिचा व्यापार जगभरातील राष्ट्रांमध्ये होता. अनेक खंडांमध्ये कंपनीचे व्यापारी फिरत असत आणि आपल्या देशाची भरभराट करत असत.

आधीच ब्रिटिश कंपनी भारतात आपले हातपाय पसरत होती आणि त्यातच त्रावणकोर राज्याची घोडदौड सुरु झाली व त्यांनी आजूबाजूची छोटी राज्ये बळकावण्यास सुरुवात केली. त्यामुळे डचांना केरळच्या किनाऱ्यावर मिळणारा थोडाफार नफाही जाणार होता.

बेनेडिक्टस डी लॅनोय हा काळ्या मिरीचा व्यापारी होता.

त्यामुळे त्याला आपल्या हितसंबंधांसाठी युद्ध करणे भाग होते. डचांनी झुंजार लढत दिली. ह्याच्यामागे सगळी पॉवर ह्या माणसाचीच होती. त्याने नाविक कमांडर म्हणून डच सैन्याची धुरा हात घेतली व कोचीन वरून तो कोलाचेल इथं जाण्यासाठी रवाना झाला.

दोनाल्डी नावाचा जून एक बेल्जीयन सरदार त्याच्यासोबत होता.

मार्तंड राजा आपल्या रागासाठी कुप्रसिद्ध होता. हि दोन माणसं ताब्यात घावल्यावर ती नक्की काय म्हणतायत हे त्याला समजेनासं झालं. त्यांच्यासाठी अनुवादक भेटल्यानंतर मात्र त्याला त्यांची ऑफर आवडली आई त्याने ह्यांना आपल्याकडेड रुजू करून घेतले.

ह्यूस्टॅशियस बेनेडिक्टस डी लॅनोयला राजाने प्रेमाने वागवले, त्यांच्यासाठी राज्यात चर्च बनवून घेतले तसेच त्याला आपल्या सैन्याचा जनरल देखील बनवलं.

त्यांना डच सेनेत किमान कामावर ठेवण्यात आलं होतं. त्यामुळं एवढी जबरदस्त ग्रोथ मिळाल्यामुळं दोघेही तिथंच राहीले. ह्यूस्टॅशियस बेनेडिक्टस डी लॅनोयची युद्धनीती जबरदस्त होती त्यामुळे त्याला साम्राज्यात “वालिया कप्पीट्टानं” अर्थात महान कॅप्टन म्हणून संबोधले जात असे.

त्याने राज्याच्या सेनेची रचना युरोपियन पद्धतीने केली आणि विविध बांधकामे तसेच किल्लेही उभारले. उदयगिरीमध्ये दारूगोळा बनवण्याचा कारखाना तसेच तोफा घडवण्याची यंत्रणा सुरु करण्याचा मनही त्यालाच जातो.

४८ किलोमीटर लांबीची राज्याच्या उत्तरेकडे असणारी त्रावणकोर रेषा बनवण्याचा मानही त्यालाच दिला जातो. मारूनथुकोट्टाई ह्या छोट्या किल्ल्यावर त्याने दारूगोळा उभारण्याची अजून एक यंत्रणा विकसित केली.

मारूनथुकोट्टाई शब्दाचा अर्थच दारुगोळ्याचं शहर म्हणून होतो. 

ह्यूस्टॅशियस बेनेडिक्टस डी लॅनोयची स्थानिक लोकांशी चांगली दोस्ती झाली होती. गावात त्याला चांगला मान दिला जात असे.  स्थानिक लोक त्याला इस्टच म्हणून ओळखत असत. भाषांतरासाठी त्याच्यासोबत असणाऱ्या अंचुटेंगू (तेव्हाचे अंजेगु) गावातल्या मुलीसोबतच त्याने लगीन केलं.

सुरवातीला पोरीच्या घरच्यांनी बाहेरून आलेल्या लाल माणसाला पोरगी द्यायला कानकूच केली पण मार्तंड राजाने ह्यूस्टॅशियस बेनेडिक्टस डी लॅनोयच्या बाजूने बोलणी केल्यानंतर त्यांचाही नाईलाज झाला त्यामुळं हे लग्न होऊ शकलं.

त्यांना एक पोरगाही झाला होता. पण नंतरच्या काळात तो लढाईत मारला गेला. त्याच्या पोराची समाधीही ह्यूस्टॅशियस बेनेडिक्टस डी लॅनोयच्या इच्छेनुसार त्याच्या शेजारीच बनवण्यात आली आहे.

त्याच्या समाधीवर खालील मजकूर कोरण्यात आला आहे, 

“अंतर राखून असा ही ह्यूस्टॅशियस बेनेडिक्टस डी लॅनोय या त्रावणकोर राज्याची ३७ वर्षे अव्याहत सेवा करणाऱ्या जनरल-इन-चीफ साहबांची समाधी आहे. त्याची शक्ती अशीच अभेद्य राहो आणि त्याच्या नावाच्या भीती सतत शत्रूच्या मनात असो.  कायकुलाम ते कोचीनपर्यंतच्या साम्राज्यात त्याचे नाव सातत्याने दुमदुमत राहो. ६२ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या सेनानीने १ जून १७७७ मध्ये इथं चिरनिद्रा घेतली. त्याच्या आत्म्याला शांती लाभो.”

त्याने शरणागती पत्करल्याचं दृश्य भारतीय नौदलाच्या इतिहासात महत्त्वाचं मानलं गेलं आहे. पुण्याच्या सर्दन कमांड म्यूजियममध्ये हे चित्र सापडते. केरळमधून पुण्यात आलेले लोक अजूनही ह्या स्थळाला भेट देत  असतात.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.