नेहरूंच पंतप्रधानपद इंदिरा गांधींच्या खेळीमुळे वाचलं होतं..

भारत स्वतंत्र झाला आणि पंडित नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान बनले. असं म्हणतात कि काँग्रेस संघटनेचं वजन पंतप्रधान म्हणून सरदार वल्लभभाई पटेलांच्या बाजूने होते. पण महात्मा गांधीजींनी आपला वारसदार म्हणून नेहरूंची निवड केली आणि ते देशाचे पहिले पंतप्रधान बनले.

व्हॉटसअप युनिव्हर्सिटी कितीही सांगो, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्याकाळचे सर्वात लोकप्रिय नेते होते हे नक्की. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी अनेक वर्षे कारावास भोगला होता. महात्मा गांधी, सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या मृत्यूनंतर तर काँग्रेस पक्षावर व एकूणच देशावर त्यांची पकड मजबूत झाली होती.

नेहरू जोवर होते तो वर संपूर्ण देशात काँग्रेस पक्षाला निवडणुकीत हरवण्याचं स्वप्न देखील इतर कोणता विरोधी पक्ष बघू शकत नव्हता. इतकी त्यांची लोकप्रियता असूनही त्यांचं पंतप्रधानपद धोक्यात आलं होतं हे कस काय ? आणि त्यांची लेक इंदिरा गांधी यांनी हे पद कस काय वाचवलं हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल.   

त्यासाठी आधी पार्श्वभूमी जाणून घेतली पाहिजे.

गोष्ट आहे १९६२ सालची. ईशान्य बॉर्डरवरील कुरबुरी वाढल्या. चीनची विमाने भारतीय हद्दीत घुसून घिरट्या घालू लागली. चीनच्या सैनिकांनीही सीमा रेषा पार करून अतिक्रमण केले होते. खरं तर हे हिमालयातील पर्वतीय क्षेत्र होते. येथे सीमा रेषा आजही निश्चित नाही. पण या अतिक्रमणामुळे नेहरूंना आणि संरक्षण मंत्री कृष्ण मेनन यांना विरोधकांनी खिंडीत पकडले.

सोशालिस्ट पार्टीचे आचार्य कृपलानी यात सगळ्यात आघाडीवर होते.

त्यांना जनसंघाचे अटलबिहारी वाजपेयी, प्रजा समाजवादीचे हेम बारूआ, स्वतंत्रता पार्टीचे एन.जी.रंगा यांची साथ होती. कधी नव्हे ते काँग्रेसचे सदस्य देखील नेहरूंच्या धोरणाविरुद्ध कुजबुज करत होते.

आंतरराष्ट्रीय परराष्ट्र नीतीचे जाणकार भारताने हा विषय वाढवू नये या मताचे होते पण नेहरूंवरील दबाव वाढला होता. त्यावेळी केलेल्या सुप्रसिद्ध भाषणात त्यांनी अक्साई चीनमध्ये कसे गवताचे एक पाते देखील उगवत नाही आणि तेथील वाद निरर्थक आहे हे वक्तव्य केले.

याचाच एक अर्थ भारताने त्या क्षेत्रातील आपला ताबा सोडून दिल्यासारख होतं.

अख्ख्या लोकसभेमध्ये गदारोळ सुरू झाला. त्यावेळी बोलताना काँग्रेस पक्षाचेच नेते असलेल्या महावीर त्यागी यांनी आपल्या डोक्यावरची टोपी काढत सांगितलं ,

“माझ्या टकलावर देखील केस उगवत नाहीत याचा अर्थ असा नाही कि माझं डोकं देखील उद्या तुम्ही चीनला द्याल.”

काँग्रेस खासदार महावीर त्यागी यांचं वक्तव्य चांगलंच गाजलं. अखेर विरोधी पक्ष आणि मीडियांच्या दबावातून नेहरूंनी चीनला भारताची एकही इंच मिळू देणारी नाही अशी भूमिका जाहीर केली. या सर्वामध्ये देशाचे संरक्षण मंत्री कृष्ण मेनन हे टीकेचे सर्वात पात्र ठरले होते. त्यांची धोरणे शत्रूराष्ट्र चीनला धार्जिणी होती असं म्हटलं जात होतं.

नेहरू देखील आपल्या या मित्राच्या सल्ल्याचा आहारी गेले होते. त्यामुळे चीन विरुद्ध पूर्व सीमेवर भारतीय संरक्षण दलाने म्हणावी तशी तयारी बंदोबस्त केलाच नाही. 

खोडसाळ चीनने याचा गैरफायदा घेत १९६२ साली युद्ध लादले. भारताच्या हद्दीत घुसून आलेल्या सैन्याने धुमाकूळ घालण्यास सुरवात केली. पंतप्रधानांसाठी हा हल्ला अनपेक्षित होता. कमी तयारी असल्याचा परिणाम चीनच्या सैन्याने आपला सर्वात मोठा पराभव केला. चिनी सैन्य आपल्या मार्गाने परत गेले पण भारतासाठी हि लाजिरवाणी हार युद्धनीतीचा एक मोठा धडा शिकवणारी होती.

साहजिकच पंतप्रधान नेहरूंना संसदेत विरोधकांनी चांगलेच घेरले. अगदी काँग्रेस मधील नेते देखील नेहरूंवर टीका करत आहेत हे दृश्य पहिल्यांदा दिसत होतं

संरक्षण मंत्री व्ही.के.कृष्ण मेनन यांचा राजीनामा मागण्यात आला. आपल्या सहकाऱ्याच्या बचावासाठी नेहरू पुढे आले. कृष्ण मेनन यांनी त्यांना आपला राजीनामा देखील सोपवला होता पण नेहरूंनी तो आपल्या जाकिटाच्या खिशात ठेवून दिला. राज्यसभा व लोकसभा मध्ये असणाऱ्या काँग्रेस खासदारांची मिटिंग संसदेत बोलवण्यात आली.

मेनन यांचा राजीनामा खिशात घेऊन नेहरू त्या बैठकीला हजर राहिले.

या बैठकीत त्यांची विरोधकांशी खडाजंगी झाली. त्यावेळी पुन्हा महावीर त्यागी बोलायला उभे राहिले. ते म्हणाले,

पंडितजी अगर आपने कृष्ण मेनन का इस्तीफा नहीं लिया तो आपको इस्तीफा देना होगा।’

वातावरण तंग झालं. पंतप्रधानांचा पारा चढलेला होता. आधीच चीनच्या युद्धात झालेली हार त्यांना खात होती आणि शिवाय त्यात आपल्याच पक्षातील खासदार आपल्याला राजीनामा मागत आहे हे नेहरूंच्या मनाला लागलं. त्यांनी घरी परतल्यावर आपली मुली इंदिरा गांधी यांना सगळा प्रसंग सांगितला आणि आपण राजीनामा देणार असल्याचे सूतोवाच केले.

इंदिरा गांधी तेव्हा राजकारणात सक्रिय झाल्या होत्या. पंतप्रधानांची मुलगी म्हणून छोटी मोठी कामे करण्यासाठी अनेक कार्यकर्ते त्यांच्याशी संपर्क साधत असत. नेहरू व काँग्रेस पक्षाला जोडणारा दुवा म्हणून इंदिरा गांधी काम करायच्या. एकदा तर एका काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलं होतं. इंदिरा गांधींचे इतर नेत्यांशी देखील चांगले संबंध होते.

नेहरू राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहेत हे पाहून इंदिरा गांधी हादरल्या. वडील आपण सांगून ऐकणार नाहीत हे देखील त्यांना ठाऊक होतं. पण कृष्ण मेनन यांच्या साठी नेहरूंनी राजीनामा द्यावा हे काही बरोबर नाही असं त्यांचं मत होतं.

अखेर नेहरू ज्यांचं ऐकतील अशा व्यक्तीकडे त्या गेल्या, ते होते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन.

डॉ. राधाकृष्णन हे तेव्हा देशाचे राष्ट्रपती होते. त्यांच्या विद्वात्तेचा धाक नेहरूंना देखील होता. राष्ट्रपती म्हणून ते त्यांचा सन्मान तर करायचेच पण त्यांच्या राजकीय मतांचा देखील ते आदर करायचे. इंदिरा गांधींच्या सांगण्यावरून राधाकृष्णन यांनी नेहरूंना समजावून सांगितलं.

कृष्ण मेनन यांच्यासाठी संपूर्ण सरकार पणाला लावण्याची आवश्यकता नाही हि गोष्ट राधाकृष्णन यांच्या शब्दांमुळे नेहरूंना पटली. भावनातिरेकात वाहून जाऊन आपण मोठी चूक करणार होतो हे त्यांच्या लक्षात आले.

अखेर व्ही.के.कृष्णमेनन यांचा संरक्षणमंत्रीपदाचा राजीनामा त्यांनी स्वीकारला व त्यांच्या जागी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची निवड केली. इंदिरा गांधींनी दाखवलेल्या मुत्सद्दीपणामुळे नेहरूंचे पंतप्रधानपद वाचले.

हा किस्सा माजी मंत्री जयराम रमेश यांनी आपल्या पुस्तकात सांगितला आहे 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.