शेती व औद्योगिक क्षेत्राला विजेची कमतरता भासू नये म्हणून इंदिराजींनी NTPC स्थापन केली होती..

भारतासमोर सध्या कोळश्याच्या साठ्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. ज्यामुळे अर्थातचं विजेचं संकट उभं राहिलंय. देशातल्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पांजवळ  काही दिवसांचाच  साठा शिल्लक असल्याचं बोललं जातंय. त्यात कोळसा बाहेरून आयात करायचा म्हंटल्यावर किमती मोठ्या प्रमाणात वाढल्यात. कोळशावर आधारित वीजनिर्मिती केंद्रे क्षमतेच्या निम्म्याहून कमी उत्पादन करत आहेत.

या सगळ्या गोष्टींमुळे राज्यांबरोबचं केंद्र सरकारपुढेही मोठं आव्हान असल्याचं बोललं जातंय. पण तुम्हाला माहितेय कोळसा उत्पादनात भारत टॉपचा देश मानला जातो. या कोळश्यासाठीच्या औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये भारताचं मोठं योगदान आहे.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात या प्रकल्पांची पायाभरणी केली गेली. 

देशातील विविध औष्णिक वीज प्रकल्पांचं सूत्रबद्ध नियोजन करून विजेची गरज कार्यक्षमतेने पूर्ण करण्याच्या उद्देशाने १९७५ मध्ये नवी दिल्ली इथे ‘नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन’ (ntpc) या महामंडळाची स्थापना करण्यात आली. इंदिरा गांधींनी दूरदृष्टीने हा निर्णय घेतला होता.

भारतात शेती व औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला गती मिळाल्यामुळे विजेची गरज वाढली. त्याचबरोबर देशाच्या सर्वदूर भागात विद्युतीकरणालाही  गती आल्यामुळे विजेचा घरगुती वापरही वाढला. देशाची विजेची गरज  पूर्ण करण्याच्या उद्देशाने जल, औष्णिक, आण्विकीय अशा वीजनिर्मितीच्या विविध पर्यायांवर भर देण्यात आला. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये दगडी कोळसा आणि नैसर्गिक वायू या इंधनावर आधारित औष्णिक वीज  प्रकल्प स्थापन करण्यात आले.

या प्रकल्पांच्या सुसूत्रित नियोजनासाठी  १९७५ मध्ये नवी दिल्ली इथे ‘नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन’ची  (एनटीपीसी) स्थापना करण्यात आली होती .

केंद्र सरकार, देशातील बँका, सामान्य गुंतवणूकदार  तसंच परदेशी  वित्तीय संस्था यांच्या सहभागातून या महामंडळाच्या भांडवलाची उभारणी  करण्यात आली. औष्णिक  वीजनिर्मिती प्रकल्पांचं नियोजन, उभारणी आणि ते कार्यान्वित करणं यामध्ये एनटीपीसीच्या अखत्यारीतील प्रकल्पांची एकूण संख्या २६ झाली.

त्यामध्ये कोळशावरील १५, नैसर्गिक वायूवरील  ७ आणि ४ संयुक्त प्रकल्पांचा समावेश होता. या प्रकल्पांची एकत्रित विद्युतनिर्मिति क्षमता मार्च २००६ अखेर २७०९४ मेगावॅट होती. देशाच्या एकूण वीजनिर्मिती क्षमतेमध्ये एनटीपीसीचा वाटा  २०.१८ टक्क्यांवर पोहोचला, तर एकूण  वीजउत्पादनात एनटीपीसीचा हिस्सा २८.५० टक्के झाला.

भारतातील पोलाद प्रकल्पांना स्वतंत्रीत्या वीजपुरवठा उपलब्ध  करण्याच्या उद्देशाने एनटीपीसीने स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडिया लि.  (सेल)च्या अधीन असलेल्या सेल पॉवर सप्लाय कॉर्पोरेशनमध्ये गुंतवणूक
केली. दुर्गापूर, रुरकेला व भिलाई इथे संयुक्त वीजनिर्मितीच्या प्रक्रियेतून पर्यावरणावर होऊ शकणारे परिणाम लक्षात घेऊन एनटीपीसीने पर्यावरण  संरक्षण व संवर्धनासाठी महत्त्व दिलं. औष्णिक वीजनिर्मितीमुळे तयार होणाऱ्या राखेचा योग्य उपयोग करण्याकरता १९९१ मध्ये स्वतंत्र  एनटीपीसी
विभाग स्थापन करण्यात आला.

सिमेंट, जाळीदार व कमी वजनाचे काँक्रिटचे ठोकळे तसंच इतर बांधकाम साहित्याच्या उत्पादनासाठी
औष्णिक वीज प्रकल्पांतून तयार होणारी राख उपयुक्त असल्याने या  राखेपासून अशा प्रकारच्या बांधकाम साहित्याच्या निर्मितीला या विभागाद्वारे  प्रोत्साहन देण्यात आलं. एनटीपीसीच्या या कामगिरीमुळे सार्वजनिक  क्षेत्रातील सर्वोत्तम व्यवस्थापन आणि सर्वाधिक विकासक्षमता असलेल्या  नवरत्न कंपन्यांमध्ये एनटीपीसीचा समावेश झाला.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.