CST स्टेशनसमोर असणारं हे पंचम पुरीवाल्याचं हॉटेल CST पेक्षा जुनं आहे..!!!

मुंबईच्या व्हि टी म्हणजे आत्ताच्या सीएसटी स्टेशनच्या एक्झॅट समोर एक हॉटेल आहे. आणि आपल्या फ्यूजा उडवणारी एक भारी गोष्ट म्हणजे हे हॉटेल सीएसटी स्टेशनपेक्षाही जास्त जुनंय.

ह्या हॉटेलला ऐतिहासिक वास्तु म्हणून जरी घोषित केलं तरी कोणी हरकत घेणार नाय.

१७० वर्षांपेक्षाही जुना इतिहास असलेल्या ह्या हॉटेलचं नाव आहे ‘पंचम पुरीवाला’.

पूर्वीचं व्हिक्टोरिया टर्मिनस आणि आत्ताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ह्या स्टेशनजवळ फोर्ट एरिआत हे हॉटेल १८४८ सालापासून दिमाखात उभंय.

मुंबईतलं सगळ्यात जुनं हॉटेल म्हणजे ‘पंचम पुरीवाला’ अशी ह्या हॉटेलची ओळख आहे.

हे हॉटेल सुरू केलं, पंचम दास शर्मा यांनी. ज्या काळात भारतात ट्रेन्स नव्हत्या त्या काळात पंचम शर्मा आग्र्याहून चालत आणि बैलगाडीने प्रवास करत मुंबईला आले आणि त्यांनी मुंबईकरांना पुरी भाजीचं जेवण खाऊ घालायला सुरवात केली.

मुंबईकर, पंचम शर्मा यांना पुरीवाला म्हणूनच ओळखायला लागले आणि तेव्हापासून त्यांचं नाव पंचम पुरीवाला म्हणूनच सगळ्यांच्या तोंडात बसलं. हळू हळू पंचम पुरीवाला म्हणजे मुंबईकरांचं हक्काचं आणि कायमचं पोट भरण्याचं ठिकाण झालं. आणि त्यांच्या हातच्या फेमस पुरी भाजीने हॉटेलचं स्वरूप घेतलं.

फक्त मुंबईकरच नाही तर पंचम पुरीवाल्याच्या पुरी भाजीने खुद्द महात्मा गांधींनाही भुरळ घातली होती. महात्मा गांधी मुंबईच्या दौऱ्यावर असले की हमखास इथे पुरी भाजीचा आस्वाद घ्यायला येत असत.

शिवाय, सुपरस्टार राजेश खन्ना आणि फिल्म इंडस्ट्रीतलीही अनेक दिग्गज मंडळी सुद्धा इथे वरचेवर येत असत.

आता हे सगळं ऐकून तुम्हाला असं फिक्स वाटलं असेल की हे हॉटेल टोलेजंग असणार, हॉटेलला फूल हेरिटेज लुक असणार, नावाप्रमाणे इथल्या पदार्थांच्या किंमतीही लय वाढीव असणार.

तर तुम्ही सपशेल गंडताय.

मुंबईला आणि मुंबईच्या लोकांना विशेष आव आणून वेगळं असं काही दाखवायची कधी गरज पडत नसते, त्यांच्याकडे जे असतं ते आपोआप उठून दिसतं, त्यामुळे ह्या हॉटेलला सुद्धा हटके काहीतरी करून दाखवायची कधी गरजच पडलेली नसणारे.

शिवाय हॉटेलमधल्या पदार्थांच्या चवीवरच त्यांचा अख्खा गेम असतोय त्यामुळे ह्या गेममध्ये हॉटेलचा अंबिएन्स, फर्निचर आणि इकडल्या तिकडल्या गोष्टी त्यांना लिंबू टिंबू वाटत असतात. कारण एकदाका संध्याकाळचे सहा वाजले की हॉटेलमधली टेबलं, हॉटेलबाहेरचा रस्ता आणि काउंटरवरचा गल्ला तुम्हाला कधी रिकामा दिसत नाय. आणि हे आत्ताचं किंवा आधीचं नाय तर हे तिथलं कायमचंच दृश्य असतंय.

हां.. एक गोष्ट मात्र हॉटेलच्या भिंतीवर तुम्हाला दिसते ते म्हणजे न्यूजपेपरमध्ये हॉटेलविषयी छापली गेलेली असंख्य आर्टिकल्स आणि फोटोग्राफ्स. जी या हॉटेलची शान वाढवतात.

आता येऊया हॉटेलमध्ये मिळणाऱ्या एकसो एक ऐतिहासिक पदार्थांवर.

इथल्या प्रत्येक पुरी भाजी प्लेटमध्ये किंवा कुठल्याही थाळीत आपल्याला नेहमी पाच पुऱ्या दिल्या जातात. कारण हॉटेलच्या नावातच ‘पंचम’ हा शब्द आहे. इथे मिळणाऱ्या मऊ लुसलुशीत आणि तरी कुरकुरीत पुऱ्या म्हणजे इथली एक खासियतच आहे.

शिवाय भोपळ्याची भाजी आणि बटाट्याची ट्रेडिशनल पद्धतीत बनवलेली रस्सा भाजी म्हणजे इकडले गाजलेले पदार्थ. टिपिकल नॉर्थ इंडियन स्टाइलनेच इथले सगळे पदार्थ बनवले जातात.

पुरी ही इथली खासियत असल्यामुळे, पुऱ्या सुद्धा इथे अनेक प्रकारच्या मिळतात. साधी पुरी, मसाला पुरी, पालक पुरी, बीटरूट पुरी, पनीर पुरी असले भारी भारी कॉम्बिनेशन इथल्या पुऱ्यांमध्ये मिळतात.

पुरीसोबत, मगाशी म्हटलं तसं बटाट्याची रस्सा भाजी, बटाट्याची सुखी भाजी, छोले, भोपळ्याची भाजी, मिक्स वेज करी अशा अनेक भाज्यांचे प्रकार आपल्याला इथे चाखायला  मिळतात.

शिवाय इथे अनेक गोड पदार्थांची सुद्धा रेल चेल असते. गुलाब जाम, आणि उन्हाळ्यात मिळणारा आमरस म्हणजे तर विषयच.

हॉटेलमधले बरेचसे पदार्थ हे पंचम शर्मा यांनीच बनवलेले आहेत आणि आज १७० हून अधिक वर्ष या हॉटेलला झाली असली तरी ह्या पदार्थांची क्रेझ आजही लोकांना तेवढीच वाटते. आणि  म्हणूनच त्यांना ट्रीब्यूट म्हणून इथल्या एका थाळीला ‘पंचम थाळी’ असंच नावही देण्यात आलंय.

इथला सगळ्यात महत्वाचा फॅक्टर म्हणजे, तुम्ही कोणतीही डिश घ्या. त्याची तुम्हाला कमीत कमी किंमत मोजावी लागते. हे हॉटेल ज्या जागी आहे तो परिसर म्हणजे दक्षिण मुंबईमधलं अत्यंत गाजकेलं, नावाजलेलं आणि इतिहास लाभलेलं एक महत्वाचं ठिकाण, फोर्ट.

अशा ठिकाणी खूप कमी हॉटेलं इथे अशी असतील जी स्वस्त आणि मस्त चवीचं जेवण मुंबईकरांना खाऊ घालत असतील. आणि मॅक डि, स्टारबक्स सारख्या आलीशान कॅफेमध्ये जाण्यापेक्षा गरमागरम पुरी आणि भाजीचा बेत मुंबईकरांना नेहमीच जास्त भुरळ घालत असतो. त्यामुळे ‘पंचम पुरीवाला’ची मुंबईतली क्रेझ कधी कमी होत नसतेय भिडू.

आता ह्या हॉटेलचा सगळा कारभार शर्मा कुटुंबाची सहावी पिढी सांभाळते आहे. संदीप शर्मा, अनुपम शर्मा आणि अक्षय शर्मा हे तिघेजण मिळून हॉटेलचा बिझनेस मोठा करतायत आणि भविष्यात हॉटेलचे अजून काही आउटलेट्स देशाच्या विविध भागात सुरू करण्यासाठी प्रयत्न करतायत. 

तेव्हा मुंबईत कधी गेलात तर, मॅकडी फॅकडीत जाऊन फाक्या मारत बसण्यापेक्षा पंचम पुरीवाल्याची पुरी भाजी खाऊन पोटाला शांत करा.

हे ही वाच भिडू :

1 Comment
  1. Yash says

    Bhidu mahitiy te mi kalbafevit rahato

Leave A Reply

Your email address will not be published.