या बॅडमॅनची एन्ट्री एखाद्या धमाकेदार डायलॉगने व्हायची.

आजकालच्या व्हिलनमध्ये काही मेळ नाही. खरे व्हिलन तर पूर्वीच्या काळी असायचे. प्राण, अमरीश पुरी, प्रेम चोप्रा, शक्ती कपूर. गरीब वर्गाची पिळवणूक करणे, स्त्रीवर्गाकडे हवसच्या नजरेने पाहणे, हिरोशी पंगा घेणे, हिरोच्या बहिणीवर रेप करणे वगैरे कामं ते इमाने इतबारे करायचे. त्यांचे कपडे, त्यांचे डायलॉग्ज, त्यांचे शेवटी हिरो कडून हारणे सगळ्यात एक वेगळीच स्टाईल असायची.

त्या पिढीचा शेवटचा व्हिलन होता गुलशन ग्रोव्हर उर्फ बॅडमॅन!!

मुळचा दिल्लीचा. शिक्षण वगैरे तिकडेच झालं. घरची परिस्थिती वाईट, शिकण्यासाठी भांडी घासायची पावडर, फिनेलच्या गोळ्या वगैरे विकायचा. दिल्लीकडच्या प्रत्येकाला अभिनय करायचं असेल तर एक प्लॅटफॉर्म रेडी असतो. गुलशनला सुद्धा तो मिळाला, रामलीला. सुरवातीला वानरसेनेतील वानर म्हणून काम करणाऱ्या गुलशनची रावण म्हणून प्रगती झाली का हे माहित नाही पण श्रीराम कॉलेजमध्ये शिकताना मोठ्या गाजलेल्या थिएटर ग्रुपकडून नाटक करायला मिळालं. दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये तो बराच फेमस झाला.

गुलशनने ठरवलं की आपण यातच करीयर करायचं. काही तरी करून रोशन तनेजा यांच्या अॅॅॅक्टिंग स्कूलमध्ये प्रवेश मिळवला. सगळी फी भरायची ऐपत नव्हती. मग तिथच पार्टटाईम काम करू लागला. त्याच्यासोबत शिकायला अनिल कपूर, मजहर खान, सुरेंदर पाल असे मोठे दिग्गज.

जेव्हा कोर्स पूर्ण झाला तेव्हा ज्यांची इंडस्ट्रीमध्ये सेटिंग होती त्यांना काम मिळालं. गुलशनवर खुश असणाऱ्या रोशन तनेजानी अॅक्टिंगस्कूलमध्ये शिक्षक म्हणून त्याला नोकरी दिली. बऱ्याचदा उपाशी पोटी असायचा पण ही नोकरी मनापासून केली. सनी देओल, टीना मुनीम, गोविंदा, कुमार गौरव असे अनेक जन त्याचे विद्यार्थी. संध्याकाळी त्यांना शिकवायचा आणि दिवसभर फिल्म मध्ये काम मिळत का हे स्ट्रगल करत फिरायचा.

एकदा तिथे शिकवत असताना त्याला एक विद्यार्थी भेटला, नाव संजय दत्त. संजूबाबाचे वडील सुनील दत्त मोठे सुपरस्टार. ते त्याला लॉंच करणार हे सगळ्यांना ठाऊक होतं. संजूबाबाच शिकण्यापेक्षा बाहेरच्या खोड्यांमध्ये बरच लक्ष असायचं. पण किती जरी झालं तरी त्याचा स्वभाव दिलदार होता. त्याने आपल्या फादरना या मास्तरविषयी सांगितलं. सुनील दत्तनी गुल्लूला मेसेज पाठवला,

“मिलने आव.”

गुलशन ग्रोव्हर गेला. त्याला सुनील दत्तनी आपल्या पोराच्या पहिल्या सिनेमात रॉकीमध्ये एक छोटा रोल दिला. गुलशनची लाईफ सेट झाली. त्या पाठोपाठ त्याचा दोस्त अनिल कपूरने देखील त्याच्यासाठी वशिला लावला. त्याचे वडील सुरेंदर कपूर तर गुलशनला म्हणाले होते म्हणे की,

“तू तो मेरे बेटेसे भी अच्छा अॅक्टर है.”

पुढे सनीदेओलसुद्धा मदतीला आला. अशा या सगळ्यांच्या मदतीने गुलशन ग्रोव्हरला चांगले चांगले रोल मिळाले. खायचे वांदे असणारा गुल्लू मोठ्या पडद्यावर गुलशन ग्रोव्हर म्हणून झळकू लागला.

त्या काळी बऱ्यापैकी फिल्मस्टारची लेकरबाळ यांनाच हिरोचे रोल मिळत होते. त्या हिरोच्या समोर उभ राहायला एखादा तगडी अॅक्टिंग येणारा अभिनेता लागायचा. गुलशनने ओळखल इथे आपल्याला चान्स आहे. तसंही खर्जातला आवाज चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन वगैरे त्याचे स्ट्रेंग्थ होतेच. राजेश खन्नांचा अवतार, कमल हसन सोबतचा सदमा आणि सनी सोबतच्या सोनी महिवाल या हिट सिनेमापासून त्याची गाडी सुसाट सुटली.

सुभाष घई यांच्या राम लखन मध्ये त्याने साकारलेल्या केसरिया विलायतीने लोकांना थरथर कापायला लावलं. तिथूनच त्याला नवीन ओळख मिळाली, बॅडमॅन. या पिक्चरमध्ये दोन हिरो होते, बरेच खलनायक होते. पण लोकांना बॅडमॅनचा अंदाज एवढा आवडला की थिएटरमधून बाहेर येताना प्रत्येकाच्या तोंडात त्याचीच चर्चा होती.

मग त्याने मागे वळून बघितल नाही.  

प्रत्येक सिनेमात त्याने आपल्या लुकवर वेगळे प्रयोग केले. याशिवाय त्याच्या खर्जातल्या आवाजात म्हटलेले खास तकिया कलाम हे तर संशोधनाचा विषय आहे. चेहऱ्यावर कुत्सित हसू, तारवटलेले डोळे, विचित्र कोस्च्युम घालून गुलशन ग्रोव्हरची स्वारी पडद्यावर अवतरायची आणि पहिलाच डायलॉग तकिया कलाम असायचा. ‘गन्ना चुस के ‘ मायातेरी तो मै बदल लुंगा काया, तेललगाके, तुम्हारे शरीर के पेड पर जवानी का फुल खील गया असे एका पेक्षा एक जबरदस्त आणि डबल मिनिंग डायलॉग असायचे.

गुलशन ग्रोव्हर सहज जरी एखाद वाक्य बोलला तरी त्यात हवस आणि खुनशीपणाची लाळ टपकताना दिसायची.

सगळ्यात फेमस तर त्याचा दिलजले मधला एक डोळ्याने काना असणारा पोलीस होता. सगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर उभारून जिंदगी का मजा तो खट्टे मै है म्हणणारा अस्सल टिपिकल इन्स्पेक्टर यज्वेन्द्र त्याने एन्जोय करत साकारला. जेव्हा शेवटी अजय देवगन त्याला झाडावर लटकवून स्टेनगनने गोळ्या मारून त्याच्या शरीराची चाळण करतो. त्यातूनही मरता मरता गुलशन एक महान डायलॉग मारतो,

“उपर गोलगप्पे कैसे खाऊ?”

तो काळच होता की चांगल्या अभिनयाची संधी ना हिरोला मिळायची न व्हिलन ला. बॉलीवूडने असेच रोल करण्यात गुलशनला वाया घालवलं. गुलशन ग्रोव्हर थेट हॉलीवूडला गेला. त्याकाळी इंटरनेट वगैरे काहीही नव्हत. हिंदी फिल्मइंडस्ट्री म्हणजे नाचगाणी एवढीच ओळख होती तेव्हा गुलशन ग्रोव्हरने स्ट्रगल करून तिथे रोल मिळवला चांगल काम करून दाखवलं. तो नसिरुद्दीन शाह, ओम पुरी यांनी केलेल्या भारी कामामुळे पुढे इरफान खान, अनुपम खेर, प्रियांका चोप्रा अशा अॅक्टर्सना हॉलीवूडची वाट सोपी झाली.

पण इकडे भारतात गुलशन ग्रोव्हरला व्हिलन म्हणून टाईपकास्ट केलेल्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीने त्याचा योग्य वापर केलाच नाही. नाही म्हणायला दिल विल प्यार व्यार मधला किशन कुमारला ओय गुल्लू म्हणणारा प्रेमळ आजोबा, आय एम कलाममधला भाटी अशा काही वेगळ्या रोलमध्ये त्याने जीव ओतून काम केलंय.

पण किती जरी त्याने प्रयत्न केले तरी त्याचा नव्वदच्या दशकात व्हिलन म्हणून आमच्यावर पाडलेल इम्प्रेशन कधीच विसरणार नाही. हेराफेरी मधला कबीर स्पिकिंग असो, १६ डिसेंबर मधल दुल्हन की विदायी का समय, मिथुनच्या फेमस नागीण फाईट मधला ब्लॅकी द बिग बॉस हे कधीही भांडणात तोंडावर मारायला भारी डायलॉग देणारा गुलशन ग्रोव्हर कधीही विसरला जाणार नाही.

ज्यांना बघितल्यावर घाबरून लहानमुले चड्डी ओली करत होते अशा व्हिलन लोकांच्या पिढीचा हा शेवटचा प्रतिनिधी. आमीर खानच्या मोगुल या सिनेमात दाऊदच्या रोल मध्ये परत येतोय.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.