५० वर्षांपूर्वी पाऊस पडला आणि क्रिकेटच्या दुनियेत वनडे क्रिकेट सुरू झालं…
१९७० ची गोष्ट.
त्या काळातलं क्रिकेट आणि आजचं क्रिकेट जमिनअस्मानचा फरक पडलेला आहे. त्या काळातलं क्रिकेट ब्लॅकॲण्ड व्हाईट होतं. पाच पाच दिवसांच्या कसोटीचं होतं. क्रिकेटरला पैसा मिळायचा तो दिवसाच्या मजूरीप्रमाणे. क्रिकेटर तेव्हा सेलिब्रिटी नव्हते तो हा काळ….
तर १९७० च्या नोव्हेंबर मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लडमध्ये ॲशेज सिरीज होती.
त्यासाठी इंग्लडची टिम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली होती. त्या काळात ॲशेज सिरीजमध्ये एकूण ६ टेस्ट मॅच होत असत. पैकी पहिली ब्रिस्बनमध्ये झालेली मॅच ड्रॉ झाली होती. दूसरी मॅच पर्थमध्ये झाली ती देखील ड्रॉ झाली.
पहिल्या दोन्ही कसोटी ड्रॉ झाल्या. तिसरी कसोटी मेलबर्नमध्ये होणार होती. ती तारीख होती २० डिसेंबर १९७०.
मात्र कसोटीच्या पहिल्याच दिवशी जोराचा पाऊस सुरू झाला. पहिला, दूसरा आणि तिसरा तिन्ही दिवस जोरदार पाऊस झाल्याने एकही बॉल खेळता आला नाही. पावसामुळे तत्कालीन ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने ही मॅच कॅन्सल करण्याचा निर्णय घेतला. पण या निर्णयामुळे आयोजकांना ८० हजार पौंडचा चुना लागणार होता. मेलबर्न कसोटीसाठी जी तिकीटविक्री झाली होती त्याची रक्कम लोकांना परत करावी लागणार होती.
हे नुकसान कस भरून काढायचा हा प्रश्न देखील होता..
तेव्हा दोन्हीकडील क्रिकेट बोर्डाने एक निर्णय घेतला. सहा कसोटी सामन्यांची सिरीज झाल्यानंतर अजून एक कसोटी घ्यावी. थोडक्यात सहाच्या ऐवजी सात कसोटी खेळाव्यात. पण याला इंग्लडच्या टिमने विरोध केला. ते म्हणाले सातवी कसोटी खेळायची असेल तर फुकट खेळणार नाही, त्यासाठी पैसै मोजायला लागतील.
आत्ता पाच दिवसांची अजून कसोटी मॅच खेळवायची झाली तर जास्तिचे पैसे द्यावेच लागणार होते. तिकडे मेलबोर्न मधल्या रद्द झालेल्या कसोटीच्या तिकीटाचे पैसे देखील परत करायचे होते. या सर्व गोष्टींवर एक उपाय काढण्यात आला…
तो उपाय म्हणजे एकदिवसीय मॅचचा…
मेलबर्न मधल्या लोकांसाठी एक दिवसाचीच मॅच खेळायची. त्यामध्ये एकूण ८० ओव्हर्स असतील. ४०-४० ओव्हर दोन्ही संघांना मिळतील व एका ओव्हरमध्ये ८ बॉल असतील..
ठरलं, पण आत्ता या नवीन गोष्टीसाठी आयोजक कोण हा प्रश्न होता. अशा वेळी तंबाखू उत्पादन करणारी रॉथमैस कंपनी समोर आली. त्यांनी या मॅचचे आयोजक पद स्वीकारलं. त्याची रक्कम होती ५ हजार पौंड. कंपनीने या मॅचसाठी २० हजार तिकीट विकायचं लक्ष्य ठेवलं होतं..
अन् ती तारीख उजाडली..,
५ जानेवारी १९७१ मेलबर्न स्टेडियम…
इंग्लड ११ विरुद्ध ऑस्ट्रेलिया ११ अशी दोन संघात मॅट झाली. सामन्यापूर्वी सर डॉन ब्रॅडमन दोन्हीकडच्या प्लेअर्सला भेटले. आस्ट्रेलियाने टॉस जिंकला. इंग्लडचे कॅप्टन रे इलिंगवर्थ यांना पहिली बॅटिंग करण्याचे आमंत्रण देण्यात आले. या मॅचमध्ये इंग्लडने ३९.४ ओव्हरमध्ये १९० रन्स काढल्या. इंग्लडची टिम ऑलआऊट झाली.
ऑस्ट्रेलियासमोर १९१ रन्सचं लक्ष्य होतं. फक्त ५ विकेट घालवून ऑस्ट्रेलियाने ही मॅच सहज खिश्यात घातली. या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार इंग्लडच्या जॉन एड्रिचला मिळाला. तो वन डे क्रिकेटमध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार स्वीकारणारा पहिला खेळाडू..
२० हजार तिकीटं खपवण्याचं उद्दिष्ट होतं तिथे ४६ हजार तिकीटे खपली. पैसान् पैसा वसूल तर झाला पण पोत्याने फायदा देखील झाला. याच मॅचच्या यशस्वी आयोजनानंतर ICC ने वन-डे ला औपचारिकपणे अधिकृतरित्या मान्यता दिली…
मॅच संपल्यानंतर डॉन ब्रॅडमन म्हणाले होते,
तुम्ही इतिहास निर्माण होताना पाहिला आहे…
त्यांचे हे शब्द शब्दश: सत्यात उतरले. क्रिकेटच्या विश्वास वन-डे मॅचेसला सुरवात झाली. पण खरे क्रिकेटप्रेमी याच टप्याल्या क्रिकेटचा अधोगतीचा काळ म्हणून ओळखतात हे देखील तितकच खरं…
हे ही वाच भिडू
- पहिल्या मॅचच्या वेळी ठरवलेलं, मी देशासाठी शंभर कसोटी खेळल्या शिवाय मागं फिरणार नाही.
- मुंबईच्या आधी भारतीय क्रिकेटवर होळकर टीमचं राज्य होतं.
- क्रिकेटमुळे सचिन देव बनला पण त्याला अरबपती या माणसाने बनवलं