वनडे स्पेशालिस्टचा टॅग निखिल चोप्राच्या करियरला ग्रहण लावून गेला…..

सुरवातीला महानतेचं प्रतीक असलेला एखादा शिक्का पुढे तुम्हाला तेवढ्यापुरतंच मर्यादित ठेवतो. या प्रकारच्या अनेक गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. क्रिकेटमध्ये हा नियम बऱ्याच वेळा खेळाडूंच्या करियरला बुडवून जातो. तसाच आजचा किस्सा आहे. विशिष्ट क्षेत्राचा स्पेशालिस्ट म्हणून लावलेल्या टॅगमुळे बऱ्याच खेळाडूंना इतर खेळात आपली जादू दाखवता आली नाही.

निखिल चोप्रा. खरंतर निखिल चोप्रा हा दिसायला एखाद्या इरोपेक्षा कमी नव्हता, चुकून तो बॉलिवूड सोडून क्रिकेटमध्ये आला असंच वाटत असायचं. ९० च्या दशकातला तो लहान मुलांचा हिरो होता. एक उपयुक्त ऑलराउंडर म्हणून तो संघात आला. वनडे सामन्यांमध्ये तो सगळ्यात बेस्ट स्पिनर होता. चांगला बॉलर तर तो होताच पण बॅटिंग ऑर्डरमध्ये तो पिंच हिटर म्हणून प्रसिद्ध होता. 

निखिल चोप्राची बॉलिंग पाहणं हि एक पर्वणीच होती. हवेत बॉल स्पिन करणं याचं त्याच्याकडे कसब होतं.

स्वतःच्या बॉलिंगवर कंट्रोल आणि सोबतच लाईन आणि लेन्थवर कमांड असलेला भिडू म्हणजे निखिल चोप्रा.

त्याच सगळ्यात यशस्वी म्हणजे तो आक्रमक तर खेळायचाच सोबत तो हुशार बॉलर होता, बॅट्समनच्या डोक्यात काय चालू असेल या हिशोबाने तो बॉलिंग करायचा.

त्याची बॉलिंग खेळणं चांगल्या चांगल्या खेळाडूंना जमायचं नाही, स्पिनर बॉलर म्हणून तुडवण्याची प्रथा क्रिकेटला काही नवीन नव्हती मात्र निखिल चोप्राची बॉलिंग हि सोपी असली तरी स्पिन बॉलिंगमध्ये अचानक फास्ट बॉल फेकून तो बॅट्समनला गोत्यात आणत असे. विविध ट्रिक्स तो बॉलिंग करताना वापरत असायचा आणि तो विकेट मिळवायचा. 

ज्यावेळी टीम संकटात असायची त्यावेळी तो तळाच्या खेळाडूंना सोबत घेऊन चांगली फटकेबाजी करायचा. वनडे स्पेशालिस्ट हा टॅग त्याला पडला तो कायमचाच. लिमिटेड ओव्हरच्या खेळात तो सगळ्यात जास्त फिट बसणारा खेळाडू होता. १९९६च्या वर्ल्ड कपवेळी तो भारतीय संघाचा भाग होता.

१९९८ मध्ये केनिया विरुद्धच्या सामन्यात त्याला खेळायची संधी मिळाली. १९९९ मध्ये टोरांटोच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात निखिल चोप्राने आपल्या बॉलिंगची जादू दाखवली. भारताच्या २२५ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघ आरामात हा सामना जिंकेल असं वाटत होतं. मात्र निखिल चोप्राने २१ धावा देऊन ५ विकेट मिळवत वेस्ट इंडिज संघाला १३७ धावांवर ऑल आउट केलं.

३९ वनडे सामन्यांमध्ये निखिल चोप्राने ३१० धावा आणि ४६ विकेट पटकावल्या होत्या. वनडे स्पेशालिस्टचा टॅग मात्र निखिल चोप्राला चांगलाच महागात पडला. वनडेमध्ये तो चांगला खेळायचा त्यामुळे त्याला संधी म्हणून फक्त एकच कसोटी सामना खेळायची संधी मिळाली.

२००० मध्ये निखिल चोप्राला साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट संघात स्थान देण्यात आलं होत. मात्र २४ ओव्हरमध्ये ७८ धावा देऊन त्याला एकही विकेट मिळाली नव्हती.  हा खरतर निखिल चोप्राचा भारतीय संघाला नीट वापर करून घेता आला नाही असा फॅक्टर ठरला होता.

१९९९-२००० च्या काळात मात्र निखिल चोप्राची जादू चालली नाही, ९ वनडे सामन्यांमध्ये त्याला फक्त १० बळी घेता आले. सिलेक्टर लोकांनाही चोप्राला संघात ठेवणं मुश्किल झालं होतं. श्रीलंका विरुद्धच्या आशिया कप सामन्यात भारत पराभूत झाला आणि निखिल चोप्राला संघाबाहेर बसावं लागलं ते कायमचंच. 

पुढे मग निखिल चोप्राने क्रिकेट कॉमेंटेटर म्हणून नव्याने करिअरला सुरवात केली. क्रिकेट समीक्षक म्हणून तो अनेक वाहिन्यांवर आपल्याला दिसतो. वनडे स्पेशालिस्ट हा शिक्का अजूनही त्याच्या करिअरवर आहे. त्याकाळात भारताचा बेस्ट ऑलराउंडर म्हणून निखिल चोप्रा ओळखला जायचा.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.