मोदींना वाट्टेल ते बोलणाऱ्या ट्रम्प तात्यांना भारतीय मुलाचे “नादखुळे” पत्र.

आमटीत तेल जास्त झालं तरी अमेरिका येईल आणि आपला झेंडा लावून जाईल अशी भिती वाटते, अहो लहानपणी मी डोक्यावर तेल पण कमी लावायचो का तर चुकून या अमेरिकेनं आपल्यावर दावा ठोकला तर आईबापाला एकुलता एक असणारा मी अमेरिकाला दत्तक जायचो.

आत्ता अमेरिका कशीए हे सांगायची तुम्हाला गरज नाय. मुळात पाकिस्तानचे लाड करणारी, तालिबानला पोसून परत त्यांच्या उरावर ड्रोन हाणणारी माणसं कशी असू शकत्यात हे वेगळ सांगायची गरज नाही. तस मोठ्याला मोठ्ठ म्हणायची आणि मोठ्याचं मोठ्ठपण मान्य करायची आपली संस्कृती असल्यानं अमेरिकेची लाल म्हणून आजवर आपण अमेरिकेकडं दुर्लक्ष करतच आलोय. 

पण दोन दिवसामागं एक राडा झाला, ह्यो ट्रम्प थेट मोदींना बोल्ला. काय तर म्हणे, मोदी सारखं सारखं काबुलमध्ये बांधलेल्या लायब्ररीच कौतुक सांगत असत्यात. आत्ता तात्या हा माणूस येडाय, त्याला काही कळतं नाही हे सगळ्या जगाला माहिताय पण दरवेळी येड्यागत बिनामाहितीच बडबडून गावाला आपलां शहाणपणा दाखवायची काय गरज आहे का?

पण नाय. अक्कलहूशारी पाजळण्याची मक्ता फक्त याच्याकडे असल्यासारखं हा बोंबलत असतो. म्हणून आमच्या एका भारतीय युवकाने ठरवलं आत्ता यांना पत्र टाकूनच सांगावं की, बाबा रे तु येडायस. आत्ता हे पत्र मराठीत. ते पण बोलभिडूवर. ट्रम्पच्या पुढ सामान्य असणाऱ्या “भारतीय” बोलभिडू वाचकाने पत्र लिहावं आणि ते ट्रम्प तात्यानं वाचाव हा भाबडा आशावाद. 

असो पत्रास सुरवात करतो, लय टाईमपास झाला. 

तर ट्रम्प तात्यावं,

मक्याच्या कणासाला जशी केसं असतात तशी तुमची केसं. डोक्यावर पडल्यासारखा तुमचा चपटा भांग. चीनकडून दत्तक घेतल्यासारखे तुमचे डोळे. असलं सगळं तुमच ध्यानं आम्ही हित भारतात बसून सहन करतोय याच कारण फक्त आमची सहिष्णुता. 

तुमच्या असल्या वागण्यामुळच तुम्ही आमचं तात्या झाला. पण तुम्ही मोदी साहेबांना बोल्ला. त्याच कसय आम्ही कॉंग्रेसचे असतो, भाजपचे असतो, सेनेचे असतो, राष्ट्रवादीचे असतो, तिसऱ्या, चौथ्या आघाडीचे देखील असतो थोडक्यात आम्ही डावे, उजवे, अधले मधले सगळे असतो पण त्यापेक्षा जास्त आम्ही पक्के भारतीय असतो.

आत्ता मोदींना तुम्ही भाजपचे उमेदवार किंवा नेते असताना बोल्ला असता तरी आम्ही समजून घेतलं असत पण ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि तुम्ही बोल्ला, आणि त्यांना बोल्ला म्हणजे देशाला बोल्ला.

तात्या तुम्हाला माहिताय का, 

ज्या गौतम बुद्धांच्या मुर्ती फोडून तालिबान्यांनी आपली नसणारी मर्दानगी दाखवली होती त्याच आधारावर सांगतो, भारताच अफगाणिस्तानसाठी योगदान गौतम बुद्ध तिथे पोहचले तेव्हापासून चालू होतय. पण असल्या गोष्टी तालिबान्यांना कळणार नाहीत. त्यांनी बुद्धांच्या मुर्त्यांना हात घातला. भले मोठ्या मिसाईल ज्या तुमच्याच कृपेने तालिबान्यांना मिळाल्या होत्या त्या घेवून बुद्धांच्या मुर्ती बेचिराख करण्यात आला. तेव्हा भारत काय करत होता माहिताय का तर भारत तेव्हा अफगाणिस्तानात, तंत्रज्ञ, इंजिनियर, डॉक्टर, संशोधन पोहचवतच होतो. आणि आजही भारत तेच काम न दमता करतोय. 

आत्ता सांगायसारखी दूसरी गोष्ट म्हणजे आकडेवारी, आकडा लावण्याच्या पलिकडं आकड्यांचा विचार न करणाऱ्या तुमच्या बुद्धीला सांगतो आजवर सर्वात जास्त परकिय मदत भारताने कुठल्या देशाला केली आहे तर ती अफगाणिस्तान आहे. 

आत्तापर्यन्त भारतानं सगळ्यात जास्त मदत कुठल्या देशाला केली असल तर ती अफगाणिस्तानला. ३ बिलियन डॉलर हा एक आकडा आहे, त्याच्या पुढचं सांगायचं झालं काबुलमध्ये आत्ता चोवीस तास लाईट असते. आत्ता ती का असते तर भारतामुळे. भारताने काबुलमध्ये चोवीसतास विजपुरवठा मिळवून देण्यासाठी पॉवरग्रेड असतय तसल्यात मदत केलेय. रस्त्यांच म्हणला तर झारंज-देहराम हायवे आहे न तो भारतानं बांधून दिलाय. आत्ता धरणाचं तर सेलना धरण भारतानं बांधून दिलय बर हि सगळं जावूदे नॅशनल पार्लंमेंट ते पण भारतानं बांधलय. लयच मनावर घेवून लिहायला बसलं तर पानभर जागा पण पुरणार नाही.  

आत्ता आमचे पंतप्रधान नुसत लायब्ररीचं सांगत असले तर तस चुकलच म्हणा, पण त्याची तुला जास्त गरज वाटली असेल म्हणून सांगितल असेल आत्ता हि गोष्ट तू लगेच बोलून सिद्ध करायची गरज होती का? पण तू केलीस. एकंदरीत आत्तापर्यन्तच तुझ कांड बघता तूला लायब्ररीची गरज पण नाय म्हणा पण आमच्यासारख्या देशाला एखादा देश उभा करायचा असला तर पुस्तकांचीच गरज वाटते, कारण देश बिल्डींगा बांधून होत नाय तर तो माणसं घडवून निर्माण होतो. तो पुढं टिकवायचा असतो हे आमच्यासारख्या लोकांना चांगलच माहिताय.

आत्ता हे बघ बाबा, तू काय हे वाचणार नाहीस. तुझ्या आसपासचं पण कोण वाचणार नाय. तस या भारतीय पोरांची कोण दखल पण घेणार नाय हे आम्हाला माहिताय पण कसय आमच्यातल्याच काही लोकांना सांगाय लागतं बाबा ट्रम्प चुकतोय. यावेळी मोदी बरोबरय. कारण ते भारताचे पंतप्रधान म्हणून बोल्ले आहेत. न की भाजपचा प्रचार करायला. चला ट्रम्पला लिहलेले पत्र जाहिर करुन ते आपल्या माणसांना तरी ओपन करावं. 

  • मुळचा कराडचा पण काबुलमध्ये २ वर्ष काढलेला एक भारतीय बोलभिडू वाचक. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.