सौरभ कालिया यांचा छळ करण्यात आला, तर के.नचिकेता यांना सोडण्यात आलं, काय होत यामागच कारण.

सोशल मिडीयावर सध्या एका वेगळ्या युद्धाने रंग भरला आहे, कॅप्टन सौरभ कालिया यांना कशाप्रकारे पाकिस्तानी सैनिकांनी मारलं, त्यांचे हाल केले हे प्रश्न पुन्हा चर्चेत येत आहेत. तर दूसरीकडे पाकिस्तानकडून पायलट के.नचिकेता यांना मात्र सन्मानपुर्वक सोडण्यात आलं होतं त्याचा संदर्भ देखील देण्यात येत आहे.

नेमकं काय झालं होतं त्या वेळेस..? 

भारत पाकच्या युद्धास सुरवात झाली होती. कारगीलचा प्रश्न चिघळला होता. दोन्ही बाजूने मारो या मरोचा नारा आसमंतात होता. काही काळापुर्वीच कॅप्टन सौरभ कालिया यांच्या मृतदेहाची विटंबना पाकिस्तानच्या सैन्याकडून करण्यात आली होती. हा इतिहास असताना भारताचा एक सैनिक पाकिस्तानच्या ताब्यात सापडावा आणि तो सुखरुप परत यावा हे अशक्य होतं. पण युद्धाच्या पेटलेल्या या वातावरणात देखील हि गोष्ट शक्य झाली होती.

आंतराष्ट्रीय कायदे कानून यांचे संदर्भ दिले जात असले तरी प्रत्यक्ष युद्ध सुरू झाल्यानंतर असे नियम गुंडाळून ठेवले जातात. पाकिस्तानच्या सैन्याने सौरभ कालिया यांना पकडून त्यांच्या मृतदेहाची विटंबना हि असेच आंतराष्ट्रीय कायदे पायदळी तुडवल्याच उदाहरण होतं.  

या पार्श्वभूमीवर पायलट के. नचिकेता भारतात कसे परतले? तेव्हा नेमकं काय झालं असा प्रश्न अनेकांना पडतो. 

पाकिस्तानी घुसखोरांनी अर्थात घुसखोरांच्या रुपात असणाऱ्या पाकिस्तानी सैन्याने कारगील वर कब्जा मिळवला होता. हि घुसखोरी मोडून काढत असताना भारताने वायुसेनेचा यशस्वी वापर करत पाकिस्तानी सैन्याचे कंबरडे मोडून काढले. याच काळात भारताचे मिग-27 पाकव्याप्त काश्मिरमध्ये क्रॅश झालं. काही वेळापुर्वी मिग-27 मधून आपल्यावर हल्ला करणारा भारतीय सैनिक समोर पाहून पाकिस्तानचे सैनिक आक्रमक झाले. पाकिस्तानी सैनिकांनी के.नचिकेता यांच्यावर हल्ला करण्यास सुरवात केली. 

के. नचिकेता या घटनेबद्दल सांगताना म्हणतात, 

मी पाकिस्तान सैनिकांच्या ताब्यात सापडल्यानंतर ते मला मारून टाकतील अस मला वाटलं होतं. पाकिस्तानी सैनिकांकडून मला मारहाण करण्यास सुरवात करण्यात आलीच होती. इतक्यात तो अधिकारी तिथे आला. त्याच नाव कैसर तुफेल. कैसर तुफेल यां अधिकाऱ्यांनी मला पाकिस्तानी सैनिकांच्या ताब्यातून सोडावून चौकशीसाठी नेलं.  

पुढे के. नचिकेता सांगतात, 

माझ्यावर प्रथम उपचार करुन त्या अधिकाऱ्यांनी माझ्यासाठी शाकाहारी जेवणाची सोय केली. पुढे मला माहिती विचारण्यात आल्यानंतर नियमानुसार आवश्यक ती माहिती माझ्याकडून त्यांना सांगण्यात आली. माझ्या चहा, नाष्टा व जेवणाची सोय पाकिस्तानच्या त्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. 

पाकिस्तानच्या सैनिकांच्या ताब्यातून सुटका करुन पाकिस्तानच्याच एका अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर योग्य उपचार केले होते. कैसर तुफेल यांनी आवश्यक ती सगळी माहिती वरिष्ठांपर्यन्त पोहचवून ते के. नचिकेता सुरक्षित राहतील याची काळजी घेतली होती. 

या गोष्टींबद्दल एका मुलाखतीत कैसर तुफेल यांनी सांगितलं होतं की, 

के. नचिकेता एक देशभक्त अधिकारी होते. त्यांनी आणि मी युद्धाच्या त्या वातावरणात एकत्र कॉफी घेतली. आम्ही वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केल्या. ते तणावमुक्त व्हावेत म्हणून मी आवश्यक त्या गोष्टी करत होतो. एका क्षणी त्यांनी मला सांगितलं की, बहिणीच्या लग्नासाठी मी सुट्टी घेतली होती, आपल्या बहिणीबद्दल ते भावूक होते. एक सैनिक शेवटी माणूसच असतो हे मला त्या घटनेतून शिकायला मिळालं. 

कैसर तुफेल या पाकिस्तानच्या अधिकाऱ्यामुळे के. नचिकेता पाकिस्तानच्या सैनिकांपासून वाचले. नाहितर सौरभ कालिया यांच्याप्रमाणे त्यांच्यासोबत व्यवहार करण्यात आला असता हि शक्यता नाकारता येत नाही. ज्याप्रमाणे कॅप्टन सौरभ कालिया यांच्यासोबत व्यवहार करण्यात आले ते कधीच विसरता येणार नाही. पण त्याचसोबत आपण शेवटी माणूस आहोत याचा विचार करणारे अधिकारी पाकिस्तानचे का असतील त्यांच्या मानवतावादी दृष्टीकोनाला आपण सलाम करायलाच हवा. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.