एका साध्या लिफाफे विकणाऱ्या मुलाने पेपर बनवण्याचे कारखाने तयार केले

औद्योगिक क्रांतीमध्ये मराठी माणसांनी आपापल्या परीने योगदान दिले यात काही वादच नाही. पण असा एक मराठी माणूस होता ज्याने त्यावेळी औद्योगिक क्रांतीच्या काळात सगळ्यात मोठा खाजगी व्यवसाय उभारून इतर व्यावसायिकांना उद्योग उभा करण्याची प्रेरणा दिली होती. तर आज जाणून घेऊया या मराठी माणसाबद्दल, मराठी उद्योजकाबद्दल.

कागदनिर्माता मल्हार सदाशिव पारखे अर्थात बाबुरावजी पारखे

त्यांचे वडील सदाशिवराव हे ब्रिटिश रियासतीमध्ये सरन्यायाधीश होते. पारखे किशोरवयात असतानाच त्यांचं निधन झालं. बाबुरावजी यांनी पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून शिक्षण घेतलं आणि कला विषयात पदवी प्राप्त केली.

१९३० मध्ये पारखे समूहाची सुरवात झाली. भारत लिफाफा कंपनी पासून त्यांची उद्योजक होण्याकडे वाटचाल सुरु झाली. यात बाबुरावजींची आई माईसाहेब आणि लहान भाऊ गोपाळराव यांची त्यांना मदत झाली. हाताने लिफाफे आणि इतर कागदपत्रे तयार करून ते जवळच्या बाजारात विकत असे. कागदाची खरेदी ते शेठ फर्दूनजी यांच्याकडून करत असे. 

या व्यवसायाचं गणित त्यांना हळूहळू कळू लागलं होतं. कागद ज्यापासून तयार होतो तो बांबूचा लगदा तयार करण्याची त्या काळाची साडेबारा कोटी भांडवल लागणारी प्रचंड योजना त्यांनी साकार केली. महाराष्ट्रात नाही तर, भारताच्याही औद्योगिक इतिहासात खासगी क्षेत्रात एवढा मोठा उपक्रम केल्याची उदाहरणे त्या काळी तुरळकच होती.

सुरुवातीला अनुभव घेण्यासाठी त्यांनी डेक्कन पेपर मिलमध्ये नोकरी केली. नंतर स्वत:च्या उद्योगावर लक्ष द्यायचे ठरवले. इचलकरंजी संस्थाकडून कर्ज शिष्यवृत्ती मिळून ते शिक्षणासाठी जपानला गेले. लहान व्यवसायातून प्रगती करून मोठे कसे होता येते. हे ते जपानला शिकले. तिथे आपल्या भावी वाढीची बोलणीही करून आले.

पुढे त्यांनी खासगी व्यवसायांचे रुपांतर पेपर आणि पल्प कन्व्हर्शन लि. मध्ये केले.

१९४२ मध्ये बाबुरावजी पारखे यांनी लोअर परळ येथे

पेपर अँड पल्प कन्व्हर्नस प्रायव्हेट लिमिटेड ( PAPCO पापको ) हि एक मिल सुरु केली.

महात्मा गांधीच्या सत्याग्रहाच्या मोहिमेमुळे बाबुरावांचे संस्कारक्षम मन देश प्रेमाने भरले होते.

१९५१ मध्ये खोपोलीला त्यांनी दुसरं युनिट सुरु केलं तिथे कागद आणि पेपरबोर्ड बनवला जाऊ लागला. खोपोलीला स्थापन केलेल्या युनिटसाठी पारखे यांनी पहिले पेपर मॅन्युफॅक्चरिंग मशीन जपानमधून खरेदी केले आणि इथून त्यांची गाडी सुसाट सुटली. कागदनिर्मितीसाठी लागणारे सगळे उद्योग त्यांनी अभ्यासले आणि अंमलात आणले होते.

गुजरात, वापी अशा अनेक मोठमोठ्या आणि इतर पेपर कंपन्यांशी व्यवहार करून त्यांनी पेपकोला टॉपला आणलं. हा सगळा व्यवसाय तब्बल तीन दशके सुरु होता. १९८० च्या मध्यात कंपनीने १०० कोटींची उलाढाल केली होती. युरोपचा दौरा करून त्यांनी व्यवसाय वाढीला सुरुवात केली. बाबुराव छोट्या कागद गिरणीला लागणा-या यंत्रसामग्रीची निर्मितीही करू लागले. या कारखान्यात छपाई विभागही सुरु केला.

याच काळात कंपनीला मोठं नुकसान सुद्धा झालं. रुपयाची ढासळलेली किंमत, पेपर बनवण्यासाठी लागणारी लगद्यावरील आयात शुल्कात कपात, कामगारांच्या समस्या आणि वेळोवेळी बदलणारी सरकारी धोरण यामुळे कंपनीची मोठी हानी झाली. पुणे मुंबई महामार्गावर पापको प्रकल्प खोपोली येथे पाताळगंगा नदीला आलेल्या पुरामुळे घाट्यात गेला.

मुंबईमध्ये कापडगिरण्या बंद होऊ लागल्या होत्या तशीच गत आता कागदनिर्मिती कारखान्यांची होऊ लागली होती. पॅपको सारख्या पारखे ग्रुपचे काही जुने उपक्रम पुन्हा नव्याने वर येऊ शकले नाही. सेंट्रल पल्प मिल्स हि सर्वात मोठी युनिट १९९२ मध्ये दिल्लीच्या जे के सिंघानिया ग्रुपमध्ये बदली झाली आणि ती नव्या रूपात बाहेर आली ती म्हणजे जे के पेपर.

एका साध्या लिफाफे विकणाऱ्या मुलाने पेपर बनवण्याचे कारखाने तयार केले होते हे त्याकाळात सगळ्यात मोठं आश्चर्य मानलं गेलं होतं.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.