१४५ गाड्यांचे मालक असलेल्या श्रीमंत मंत्र्याची पोलिसाकडून गोळ्या झाडून हत्या…प्रकरण असंय…

ओडिशाच्या राजकारणातलं एक मोठं नाव असलेले नबा किशोर दास यांच्यावर पोलिस अधिकाऱ्याने गोळ्या झाडून त्यांची हत्या केलीये. ओडिशाचे आरोग्यमंत्री असलेले दास हे एका कार्यक्रमासाठी आल्यावर ते गाडीतून खाली उतरताच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

गोळ्या लागताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात हलवलं. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी एअरलिफ्ट करून भुवनेश्वरला नेण्यात आलं. तिथे उपचार सुरू असताना ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे त्यांची भेट घ्यायला आले होते. साधारण ७ तास त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

नेमकी घटना कशी घडली ते बघुया.

ब्रजराजनगर या ठिकाणी एका कार्यक्रमासाठी नबा दास हे मुख्य अतिथी म्हणून गेले होते. तिथे पोहोचले त्यावेळी त्यांच्या चाहत्यांनी गाडीला गराडा घातला होता. गाडीच्या पुढच्या सीटवर बसलेले दास गाडीतून खाली उतरले आणि उतरल्या उतरल्या एएसआय गोपालदास यांनी मंत्री दास यांच्यावर गोळ्या झाडल्या. मिडिया रिपोर्ट्सनुसार, दास यांच्या छातीवर दोन गोळ्या लागल्या आणि गाडीच्या शेजारीच दास हे रक्ताच्या थारोळ्यात पडले.

प्रत्यक्षदर्शी बघणाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळ्या झाडल्यानंतर त्या पोलिस अधिकाऱ्याने तिथून पळ काढण्याचाही प्रयत्न केला पण पोलिसांकडून मारेकऱ्याला पकडण्यात यश आलं.

आता बघुया ज्यांची हत्या झाली ते नबा दास कोण आहेत.

हत्या झाली त्यावेळी ओडिशाचे आरोग्यमंत्री असलेले नबा दास यांची राजकीय कारकीर्द मोठी आणि चर्चेत राहिलेली सुद्धा आहे. त्यांंची राजकीय कारकीर्द सुरू झालेली ती खरंतर १९८० च्या दशकात. ८० च्या दशकात संबलपूर इथल्या एका कॉलेजमध्ये शिकत असताना विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवर त्यांनी आवाज उठवला. हळू हळू त्यांना विद्यार्थी नेता म्हणून ओळख मिळाली.

त्यानंतर ते मेनस्ट्रीम राजकारणात आले ते काँग्रेस पक्षासोबतच.

काँग्रेससोबत काम करतअसतांना २००९ साली त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी प्रचारासाठी त्यांनी बॉलीवूड अभिनेते शक्ती कपूर आणि गोवर्धन असरानी यांना आणलं होतं. त्यामुळे त्यांची प्रचारसभा अख्ख्या ओडिशात गाजली होती. या निवडणुकीत ते निवडून आले आणि पहिल्यांदा आमदार झाले.

त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसकडून निवडणूक लढवत पुन्हा आमदार झाले. २०१५ साली विधानसभेतला त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर संपुर्ण देशातील मीडियामध्ये त्यांचं नाव चर्चेत आलं होतं. त्या व्हिडीओमध्ये दास हे आपल्या मोबाईलवर पॉर्न बघताना दिसत होते.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं होतं,

“मी मोबाईल बघत होतो हे खरं आहे, पण मी पॉर्न बघत नव्हतो. किंबहुना मी कधीच तसले व्हिडीओज बघितलेले नाहीत. मी इंटरनेट सर्फ करत असताना अचानक तो व्हिडीओ समोर आला होता.”

२०१९ साली त्यांनी जवळपास ३० वर्षांनंतर काँग्रेसची साथ सोडली आणि नवीन पटनायक यांची बिजू जनता दल या पक्षात प्रवेश केला. सलग तिसऱ्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकलेले दास यांना नवीन पटनायक यांच्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळालं.

त्यानंतर दास चर्चेत आलेले ते २०२१ साली.

२०२१ साली त्यांनी जाहीर केलेल्या त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये एकूण १४५ गाड्यांचा समावेश होता. यापैकी बऱ्याचशा गाड्या या कमर्शियल वापरासाठीच्या होत्या. या १४५ पैकी ८० गाड्या त्यांच्या स्वत:च्या नावावर होत्या तर, ६५ गाड्या या त्यांच्या पत्नीच्या नावावर होत्या.

शिवाय, त्यांच्या या प्रॉपर्टीमध्ये तीन लायसन्ससहित हत्यारं होती. एक ३२ रिव्हॉल्वर, एक रायफल आणि एक बंदूक अशी ही हत्यारं होती.

या सगळ्या संदर्भात त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी आपले अनेक व्यवसाय असल्याचं म्हटलं. शिवाय, आपल्या मुलाचाही वेगळा व्यवसाय आहे आणि आपण सगळेजण वेळच्या वेळी टॅक्स भरतो त्यामुळे, अनेक गाड्या असण्यात गैर काही नाही असं म्हटलं होतं. ट्रान्सपोर्ट आणि खाणकाम व्यवसायात त्यांचा चांगला जम होता.

आता अगदी आठवड्याभरापुर्वी दास हे पुन्हा चर्चेत आले होते. त्यामागचं कारण म्हणजे त्यांनी शनि शिंंगणापूरच्या मंदिरात १ किलो सोन्याचा कळस आणि ७ किलो चांदी दान केली होती. जवळपास १ कोटी रुपयांचं दान त्यांनी यावेळी केलं होतं.

ही अशी मोठी आणि चर्चेत राहिलेली राजकीय कारकीर्द असलेल्या नेत्याची काल गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गोळ्या झाडणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आलंय.

अजूनपर्यंत या चौकशीमध्ये हल्ल्याचं कारण स्पष्ट झालेलं नाही. हा तपास आता सीआयडी-गुन्हे शाखेकडे देण्यात आलाय, ७ सदस्यांचं विशेष पथक या प्रकरणाचा तपास करणार आहे. या पथकात सायबर, बॅलिस्टिक आणि गुन्हे शाखेतील अधिकारी आहेत.टीमचं नेतृत्व डीएसपी रमेश सी डोरा करत आहेत.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.