हिंदुंना घरात हत्यारं ठेवायचा सल्ला देणाऱ्या प्रज्ञा सिंग ठाकूर सतत वादात राहिल्यात…

सध्या राजकारणातले मुद्दे हे विकास सोडून इतर गोष्टींकडेच जास्त झुकताना दिसतायत. म्हणजे, नागरिकांची कामं करणं, विकासाच्या मुद्द्यांवर बोलणं, यापेक्षा जास्त काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहण्याकडे नेत्यांचा जास्त कल असतो. मग ती वक्तव्य धार्मिक असतील, जातीयवादी असतील किंवा मग हिंसक असतील.

भाजप खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर या सध्या अश्याच एका वक्तव्यामुळे चर्चेत आल्यात.

कर्नाटकातल्या हिंदू जागरण नामक कार्यक्रमात त्या बोलत होत्या. लव जिहाद विषयी बोलताना त्या म्हणाल्या,

“आपल्या घरात शस्त्र ठेवा, बाकी काही नाही तर भाजी कापण्यासाठी धारदार चाकू ठेवा. परिस्थिती कधी समोर येईल हे कळत नाही. प्रत्येकाला स्वतःचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे. जर कोणी आमच्या घरात घुसून हल्ला केला, तर त्याने ते करावे. उत्तर दिले पाहिजे. आम्हाला अधिकार आहे.”

या वक्तव्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जातेय. त्यामुळे त्या अडचणीत येऊ शकतात असंही म्हटलं जातंय. पण वादग्रस्त वक्तव्य करण्याची किंवा अडचणीत सापडण्याची ही काही त्यांची पहिलीच वेळ नाहीये. विरोधकांची टीकाही त्यांनी याआधी अनेकदा सहन केलीये.

सर्वात आधी तर त्यांचं राजकारणात येण्याआधीचं आयुष्य कसं होतं ते थोडक्यात पाहुया.

तर, २ फेब्रुवारी १९७०ला मध्ये बिहारमधल्या भिंड या गावात त्यांचा जन्म झाला. आयुर्वेदीक औषधींचा व्यवसाय करणारे आणि आरसएसचे कार्यकर्ते असलेले चंद्रपाल सिंग हे त्यांचे वडील. त्यामुळे, लहानपणापासूनच हिंदुत्व, आरएसएस आणि पर्यायानं भाजप या गोष्टी प्रज्ञा सिंग यांच्या जवळ राहिल्या. कॉलेजमध्ये असताना त्या अभाविपच्या कार्यकर्त्या होत्या. या शिवाय त्यांना बाईक्स चालवण्याची फार हौस होती. आता बाईकची हौस असल्याचा रेफरन्स का दिला ते त्यांच्या वादग्रस्त मुद्यांमध्ये तुमच्या लक्षात येईल.

तर बघुया आतापर्यंत प्रज्ञा सिंग कधी-कधी आणि कश्यामुळे  वादात राहिल्यात.

सगळ्यात मोठी घटना म्हणजे मालेगाव बॉम्ब ब्लास्ट:

२००८ मध्ये २९ सप्टेंबरला महाराष्ट्रातल्या मालेगावात बॉम्ब ब्लास्ट झाला होता. या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात प्रज्ञा सिंग यांना एएनआयनं अटक केली होती. एटीसकडून सुद्धा त्यांची चौकशी झाली होती आणि जवळपास ९ वर्ष त्या जेल मध्ये होत्या.

आता त्यांचं मालेगाव बॉम्ब ब्लास्ट्शी कनेक्शन कसं काय तर, तपास करताना हा ब्लास्टसाठी वापरलेली  बाईक ही प्रज्ञा ठाकूर यांच्यानावर होती.

एटीएसनं दिलेल्या माहितीनुसार प्रज्ञा यांच्या विरोधातला सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे ती बाईक त्यांच्या नावावर असणं हा होता. पण २०१६ मध्ये एनआयएनं या प्रकरणातला फायनल रीपोर्ट सादर केला आणि त्या रीपोर्टमध्ये प्रज्ञा यांच्यावरचे गुन्हे मागे घेण्यात आले होते. त्यांच्यावर लावलेला मोक्का या कायद्यांतर्गतचा गुन्हाही मागे घेण्यात आला. हा कायदा संघटित गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यासाठीचा आहे.

सुटकेनंतर २०१९ साली त्यांनी भाजकडून लोकसभेची निवडणूक लढवताना अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली.

शहीद हेमंत करकरे यांचा अपमान केला .

भाजपकडून तिकीट मिळाल्यानंतर सतत मीडियामध्ये चर्चेत राहताना प्रज्ञा यांनी बरीच वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यापैकीच एक म्हणजे, २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरे यांच्याविषयी त्यांनी केलेलं विधान. करकरेंविषयी बोलताना त्या म्हणाल्या होत्या,

“मी हेमंत करकरेंना शाप दिला होता, त्यामुळे दहशतवादी हल्ल्यात ते मेले”

त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांकडून तर त्यांच्यावर टीका झालीच शिवाय भाजपमधीलही अनेक नेत्यांनी त्यांचं समर्थन सुद्धा केलं नाही.

गोमुत्र पिल्याने कँसर बरा होतो.

प्रचाराच्या दरम्यानच बोलताना देशातील गायींची अवस्था ही दयनीय झालीये असं म्हणत गायी आपल्या समाजात कश्याप्रकारे महत्त्वाच्या आहेत याविषयी बोलताना त्या म्हणाल्या,

“मला कर्करोग झालेला आणि मी गौमुत्र आणि पंचगव्य मिश्रित आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे सेवन करून स्वतःला बरे केले”

त्यांच्या या वक्तव्यानंतर गौमुत्र पिऊन कँसर सारखा रोग बरा होत असता तर, रुग्णांचा मृत्यूच झाला नसता. शिवाय ही गोष्ट इतक्या वर्षांमध्ये वैज्ञानिकांच्या लक्षात आली नसती का असाही सवाल विचारला गेला. तर, सोशल मीडियावरही त्या मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाल्या.

नथुराम गोडसे हे देशभक्त असल्याचा दावा.

प्रचारादरम्यान, आक्रमक हिंदुत्त्ववादी भुमिका मांडता मांडता त्यांनी महात्मा गांधी यांची निर्घृण हत्या करणाऱ्या गोडसेंबद्दल बोलताना,

“नथुराम गोडसे देशभक्त होते, देशभक्त आहेत आणि देशभक्तच राहतील”

असं वक्तव्य केलं होतं त्यामुळे काँग्रेसकडून तर त्यांच्यावर टीका झालीच होती.

याशिवाय, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रज्ञा यांच्या या वक्तव्याबद्दल त्यांना कधीच माफ करू शकणार नाही अशी प्रतिक्रिया दिली होती.

संसदेत पुन्हा गोडसेंचा केला उल्लेख.

संसदेत द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे नेते ए राजा यांनी नथुराम गोडसेंचं नाव घेताच,

“तुम्ही देशभक्ताचं उदाहरण देऊ शकत नाही”

असं वक्तव्य प्रज्ञा यांनी केलं. आता या वक्तव्याचा परिणाम असा झाला की, भाजपने त्यांच्या वक्तव्याची निंदा करत त्यांना सुरक्षा सल्लागार समितीतून काढून टाकलं. यासोबतच्या भाजपच्या संसदीय बैठकांनाही येण्यास त्यांना मज्जाव घातला गेला.

आतापर्यंत भाजपच्या खासदार असलेल्या प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केलीयेत. अनेकदा त्या ट्रोल झाल्यात तर अनेकदा खुद्द भाजपचे वरिष्ठही त्यांच्यावर नाराज झालेत. पण, आपल्या या वक्तव्यांमुळे मतदारांच्या डोक्यात आपलं नाव खेळवत ठेवणं प्रज्ञा यांना चांगलंच जमलंय.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.