राष्ट्रपती शपथ देण्यासाठी तयार होते, पण प्रणबदांना शेवटपर्यंत पंतप्रधान होऊ दिले नव्हते…

प्रणब मुखर्जी. राजकारणातील असा चेहरा आणि नाव, ज्याने जवळपास ५ दशकांपर्यंत दिल्लीच्या राजकीय समीकरणांवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. हि समीकरण समजून घेणं, सोडवणं आणि ती पुन्हा नव्यानं बनवणं या गोष्टींवर आपलं आयुष्य खर्ची घातलं.

यादरम्यान ते देशाचे संरक्षणमंत्री, परराष्ट्र मंत्री आणि अर्थमंत्री बनले. एकूणच राजकारण आणि शासन यांच्यातील उत्तम ताळमेळ बांधत ते सत्तेची एक एक पायरी सर करत गेले. २०१२ साली ते देशाचे १३ वे राष्ट्रपती बनले आणि त्यांनी आपल्या राजकीय जीवनाचा निरोप घेतला.

पण सत्तेचा नामधारी प्रमुख होण्यापूर्वी त्यांना देशाचा कार्यकारी प्रमुख होण्याची देखील संधी आली होती. ती देखील एकदा नाही तर ३ वेळा. मात्र यातील एका संधीच्या वेळी तर खुद्द देशाचे राष्ट्रपती प्रणबदांना पंतप्रधान पदाची शपथ द्यायला तयार होते, मात्र शेवटपर्यंत त्यांना पंतप्रधान होऊ दिले नव्हते. 

हि गोष्ट आहे १९८९ सालातील.

१९८४ साली इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी आणि प्रणब मुखर्जी यांच्यातील बिघडलेल्या संबंधांमुळे प्रणबदांना काँग्रेसमधून ६ वर्षासाठी निलंबित करण्यात आलं होतं. या दरम्यान त्यांनी स्वतंत्र पक्ष काढून राजकारणात हातपाय मारण्याचे प्रयत्न केले, पण त्यात त्यांना फारसं यश हाताला लागलं नाही.

मात्र पुढच्या काही वर्षात राजीव गांधी सरकारवर बोफोर्सचे आरोप होऊ लागले. मात्र या आरोपांमुळे राजीव गांधी गोत्यात आले ते त्यांचेच निकटवर्तीय आणि मंत्रिमंडळातील संरक्षणमंत्री व्ही. पी. सिंग यांच्यामुळे. त्यांनी राजीवजींच्या विरोधात थेट मोर्चा उघडला. सोबतच त्यांचे इतर सहकारी देखील व्हीपींच्या बाजूने उभे राहिले.

या सगळ्या घडामोडींमुळे राजीव गांधी एकटे पडले. कारण ज्या यंग ब्रिगेडच्या सांगण्यावरून प्रणब मुखर्जी आणि कमलापती त्रिपाठी यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांना बाजूला केलं होतं, तेच सगळे नेते आता राजीव गांधींपासून बाजूला झाले होते. त्यांची साथ सोडून दिली होती.

मात्र आता हीच परिस्थिती प्रणबदांच्या पुनरागनासाठी पोषक झाली होती. त्यामुळेच १९८९ च्या निवडणुकांपूर्वी काँग्रेस पक्षात प्रणबदांनी आपला राष्ट्रीय समाजवादी कांग्रेस (इंदिरा) चे विलीनीकरण केले. जवळपास साडेतीन वर्षांच्या वनवासानंतर प्रणबदांची घरवापसी झाली. पण संसद आणि सारखाच भाग बनण्यासाठी त्यांना अजूनही वेळ होता.

कारण त्यावर्षींच्या निवडणुकांनंतर व्ही. पी. सिंगांचं सरकार सत्तेत आले होते. मात्र अवघ्या वर्षभराच्या आतच अंतर्गत कलहाने हे सरकार पडले. 

काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि गांधी घराण्याचे एकनिष्ठ माखनलाल फोतेदार यांच्या ‘द चिनार लीव्ज’ या पुस्तकातील दाव्यानुसार, व्ही. पी. पायउतार झाल्यानंतर १९९० मध्ये तत्कालीन राष्ट्रपती आर वेंकटरमन यांची इच्छा होती कि, प्रणब मुखर्जी यांनी पंतप्रधान बनावे. पण राजीव गांधी यांच्या मनात काही तरी वेगळंच चालूच होते.

या पुस्तकात फोतेदार यांनी लिहिले आहे कि,

१९९० मध्ये जेव्हा व्ही. पी. सिंग यांच्या राजीनाम्याच्या बाबतीत आणि पुढील राजकीय परिस्थितीवर चर्चा आणि विचार करण्यासाठी राष्ट्रपती वेंकटरमन यांची भेट घेतली. ते त्यावेळी राष्ट्रपतींना म्हणाले, काँग्रेस केवळ एकमेव पक्ष आहे जो सामाजिक प्रत्येक वर्गाला सोबत आणि एकत्र घेऊन चालू शकते. आणि काँग्रेसच एक मजबूत आणि स्थिर सरकार देऊ शकतो.

त्यामुळे फोतेदार यांनी आग्रह केला कि, पुढच्या सरकारच नेतृत्व करण्यासाठी राजीव गांधी यांना निमंत्रण द्यावं. कारण राजीव हेच लोकसभेत सगळ्यात मोठ्या पक्षाचे नेते आहेत. तेव्हा राष्ट्रपतींनी फोतेदार यांचं बोलणं थांबवत जोर देऊन सांगितले कि,

राजीव गांधी यांनी प्रणब मुखर्जींना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा द्यायला हवा. आणि जर राजीव गांधी पंतप्रधान पदासाठी प्रणब मुखर्जी यांचे समर्थन करत असतील तर मी प्रणबदांना आज संध्याकाळी देखील शपत द्यायला तयार आहे.

जेव्हा फोतेदार यांनी हि गोष्ट राजीव गांधी यांना सांगितली तेव्हा त्यांना प्रचंड आश्चर्य वाटले. मात्र त्यानंतर देखील राजीव गांधी यांनी प्रणबदांच्या पंतप्रधान पदाला पाठिंबा दिला नाही. त्यांनी त्याऐवजी जनता दलाचे दुसऱ्या गटाचे नेते, चंद्रशेखर यांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देणारे पत्र राष्ट्रपती भवनाला पाठवून दिले, आणि प्रणबदांची पंतप्रधान होण्याची संधी नशिबाने दुसऱ्यांदा हिरावून घेतली.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.