देशाच्या पहिल्या आर्थिक घोटाळ्यात अडकणारे अर्थमंत्री भारताचा कुकर बनवून गेले..

साल १९५६. भारतीय पंतप्रधानांचे जावई फिरोज गांधी यांनी संसदेत खळबळ उडवून दिली होती. देशातल्या पहिल्या घोटाळ्याचे आरोप ते सरकारवर करत होते. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच नेहरूंचे सरकार अडचणीत आले होते.

हा होता हरिदास मुंदडा घोटाळा. 

हरिदास मुंदडा हे कोलकात्यातील व्यापारी होते. त्यांची राजकीय पोहोच मोठी होती. आपल्या याच राजकीय संबंधांचा वापर करून त्यांनी आपल्या घाट्यात असलेल्या कंपन्यांचे शेअर एलआयसीला अतिशय चढ्या दरात घ्यायला भाग पाडलं होतं. ज्यामुळे एलआयसीला कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं होतं.

एलआयसी निमित्तमात्र होतं, राजकीय पातळीवरून या व्यवहारातील सूत्रे हलवण्यात आली होती.

फिरोज गांधींनी हे प्रकरण जोरात लावून धरलं. याच्या चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एम.सी. छागला यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग स्थापण्यात आला. अवघ्या २४ दिवसात कारवाई पूर्ण केली. हरिदास मुंदडा यांना हेराफेरीच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आणि तब्बल २२ वर्षांची सजा सुनावण्यात आली. केंद्रीय सचिव एच.एच. पटेल आणि एलआयसीचे अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला. 

इथेच प्रकरण थांबलं नाही खुद्द देशाचे अर्थमंत्री टीटी कृष्णम्माचारी यांना देखील राजीनामा द्यावा लागला.

तिरुवेल्लोर थत्तई कृष्णमचारी उर्फ टीटी कृष्णमचारी.

मूळचे मद्रासचे. जन्म १८९९ साली एका कर्मठ ब्राह्मण कुटुंबात झाला. वडील मोठे न्यायाधीश होते. घरची परिस्थिती संपन्न होती. कृष्णमचारी यांचं शिक्षण मद्रास मध्येच झालं. इथल्याच क्रिश्चियन कॉलेज मध्ये शिक्षण झालं. याच कॉलेजच्या इकोनॉमिक्स डिपार्टमेंटमध्ये विजिटिंग प्रोफेसर झाले.

पण खरा इंटरेस्ट बिझनेस मध्ये होता. १९२८ साली  स्वतःच्या कंपनीची स्थापना केली. नाव दिलं टीटीके ग्रुप. या कंपनीचा सुरवातीचा उद्देश जगभरात निर्माण होणारे वेगवेगळे प्रोडक्स्टसनां भारतीय मार्केट खुले करून देणे. 

हा पारतंत्र्याचा काळ होता. भारतीय उद्योग क्षेत्र अजूनही बाल्यावस्थेमध्ये होते. आधुनिक शिक्षण घेऊन कक्षा विस्तारलेल्या भारताच्या नव मध्यमवर्गाला युरोप होत असलेले बदल, यांत्रिकीकरणामुळे आलेला सुखवस्तूपण याचे आकर्षण होते. यातूनच साबणापासून ते पेनपर्यंत रोजमरणाच्या गोष्टी युरोपातून आणून त्याचे डिस्ट्रिब्युशन करण्याचे अधिकार कृष्णमच्चारी यांनी घेतले.

त्यांचा धोरणी पण आणि उपजत चौकशी बुद्धी यांमुळे व्यवसाय वेगाने वाढला. जगात नेमकं काय घडतंय आणि आपल्या देशात नेमकी कशाची मागणी आहे याकडे त्यांचे बारकाईने लक्ष असायचे. यातूनच आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा देखील सखोल अभ्यास झाला होता. टीटीके कंपनीने चांगलीच उभारी घेतली. कृष्णमच्चारी यांच्या दूरदृष्टीपणामुळे दुसरे महायुद्ध सारख्या झटक्यांना देखील कंपनी सहजतेने सामोरे गेली आणि नफा देखील कमवत राहिली.

यातूनच कृष्णमच्चारी यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला.

मद्रासच्या प्रांतीय निवडणुकांमधून त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि निवडून देखील आले. तिथल्या विधानसभेत विचारलेल्या आर्थिक प्रश्नांवरून त्यांच नाव चांगलंच गाजलं. पुढे ते संविधान सभेत देखील निवडून आले. तिथे होणाऱ्या चर्चेमध्ये हा तरुण माणूस स्थानिक व आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा चांगला अभ्यासक आहे हे नेहरूंनी ओळखलं होतं.

स्वातंत्र्यानंतर पहिल्या लोकसभा निवडणूक झाल्या आणि जे मंत्रिमंडळ स्थापन झालं त्यात नेहरूंनी कृष्णमच्चारी यांना वाणिज्य मंत्रिमंडळाची जबाबदारी दिली. पुढे १९५६ साली जेव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या मुद्द्यावर अर्थमंत्री सीडी देशमुख यांनी राजीनामा दिला तेव्हा नेहरूंनी हि महत्वाची जबाबदारी कृष्णमच्चारी यांच्याकडे सोपवली.

पहिल्यांदाच एक उद्योगपती भारताचा अर्थमंत्री बनला.

आपल्या देशाचा उद्योग जगताचा पाया रचला जात होता. सुईपासून ते अंतराळ यान आपल्याच देशात बनवायचं हे नेहरूंचं स्वप्न होत आणि याच स्वप्नपूर्तीचा दिशेने पावले टाकली जात होती. टाटा,बजाज,बिर्ला, वालचंद असे अनेक उद्योगसमूह भारतात स्वदेशी प्रोडक्ट बनवण्यासाठी मेहनत घेत होते.

कृष्णम्मचारी यांनी बनवलेले औद्योगिक धोरण आणि टॅक्स रिफॉर्म्स या कंपन्यांना प्रोत्साहन देणारे ठरले.

अशातच वर उल्लेख केलेला मुंदडा घोटाळा प्रकरण घडलं. नेहरूंचे लाडके म्हणून ओळखले जाणारे कृष्णम्मचारी यांना अपमानित होऊन राजीनामा द्यावा लागला. तस बघायला गेलं तर त्यांचा या घोटाळ्यात  मात्र त्यांच्या मंत्रालयात झालेल्या गोष्टींची जबाबदारी स्वीकारून हे पद सोडावे लागले. त्यानंतर त्यांनी राजकारणातून थोडस लक्ष बाजूला केलं .

भारताच्या औद्योगिक क्रांतीच्या काळात कृष्णमच्चारी यांची टीटीके कंपनी देखील अग्रेसर होती. त्यांनी मोठ्या नाही तर दैंनदिन वापरात लागणाऱ्या छोट्या छोट्या वस्तूंच्या निर्मितीकडे आपले लक्ष गुंतवले होते. यातच होते कुकर.

कृष्णम्मचारी हे दक्षिण भारतीय होते. त्यांच्याकडे भात हा जेवणाचा अविभाज्य घटक आहे. तिथल्या स्त्रियांचा दिवस तांदूळ शिजवण्यापासून सुरु होतो. प्रत्येक गोष्टीत हे शिजवलेले तांदूळ वापरले जाते. बराच वेळखाऊ असलेला हा प्रोग्रॅम. मोठमोठ्या चुल्हाण्यावर तांदूळ शिजवत ठेवलेत हे तिथलं नेहमीचं दृश्य.

अजून प्रेशर कुकर चा वापर भारतीय स्वयंपाकघरात होत नव्हता. कृष्णम्मचारी यांनी आपल्या कंपनीतर्फे कुकर बनवायचं ठरवलं. इंग्लंडच्या प्रेस्टिज कंपनीशी त्यांनी तंत्रज्ञान हस्तांतराचे करार केले आणि १९५९ साली भारतीयांचा आपला कुकर बनवला.

नाव देण्यात आलं. टीटीके प्रेस्टिज

१९५९ साली कृष्णम्मचारीयांचे प्रेस्टिज आणि एच डी वासुदेव यांचे हॉकिन्स हे दोन कुकर एकदम भारतीय मार्केटमध्ये आले. दक्षिण भारतात हे कुकर आल्या आल्या हिट झाले. कमी कष्टात, कमी वेळेत आणि कमी खर्चात भात  शिजवण्याचा एक उत्तम पर्याय मिळाला होता.

कुकरचा शोध लावणाऱ्या  युरोपमध्ये जेवढा कुकर वापरला जात नव्हता त्याच्या कितीतरी पट अधिक वापर भारतात होऊ लागला. 

हॉकिन्स आणि प्रेस्टिज या कुकरमध्ये जोरदार स्पर्धा होती. दोन्ही कंपन्यांनी संशोधन करून भारतीय स्वयंपाकघराच्या दृष्टीने कुकरमध्ये अनेक बदल घडवून आणले होते. प्रेस्टिज आपल्या जाहिरात तंत्राच्या जोरावर हॉकिन्सपेक्षा दोन पावले पुढेच राहिली.

जो बीबी से करे प्यार वो प्रेस्टिजसे कैसे करे इन्कार

हि टॅगलाईन प्रचंड गाजली. प्रेस्टिज कुकर प्रत्येक घराघरात जाऊन पोहचला. फक्त कुकरचं नाही तर इतर होम अप्लायन्स क्षेत्रात प्रेस्टिज हा भारतातला मोठा ब्रँड बनला.

दरम्यानच्या काळात कृष्णम्मचारी नेहरूंच्या मंत्रिमंडळात पुन्हा आले. १९६२ साली त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलं. लालबहादूर शास्त्रींच्या काळात देखील त्यांनी देशाचं अर्थमंत्रीपद सांभाळलं. पुढे इंदिरा गांधींनी त्यांना या पदावर कायम ठेवलं नाही. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते हळूहळू राजकीय जीवनातून बाजूला होत गेले. १९७४ साली त्यांचं निधन झालं.

कृष्णमच्चारी यांच्यानंतरही त्यांच्या पुढच्या पिढ्यानी प्रेस्टिजचा मोठा विस्तार केला.

१९९० सालच्या जागतिकीकरणाचा जेव्हा तत्कालीन भारतीय कंपन्यांनी धसका घेतला तेव्हा या संकटाला संधी मानून प्रेस्टिज परदेशात गेला. तिथल्या आघाडीच्या कुकिंग वेअर कंपन्यामध्ये प्रेस्टिजचा समावेश होऊ लागला.

कुकरवर १० वर्षांची वॉरंटी आणि मिक्सर ग्राइंडरवर आयुष्यभराची सेवा देणारा हा पहिला ब्रॅण्ड. आयएसओ मानांकन आणि आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करणारा हा पहिला किचनब्रॅण्ड. त्यांनी आणलेली भांडय़ांच्या बाबतीत ‘एक्स्चेंज स्कीम’ कित्येक कुटुंबासाठी वरदान ठरली.

आज जग इतकं बदलत गेलय मात्र साठ वर्षांपासून असलेला प्रेस्टिजचा भारतीय किचनमधला दरारा अजूनही कायम आहे. कृष्णमच्चारी यांनी दिलेला राजीनामा  प्रेस्टिज कुकरच्या निर्मितीतून देशाच्या उपयोगाला आला असच म्हणावं लागेल.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.