पुणेरी पोरांना खेळताना बघून इंग्रजांना बॅडमिंटनचा खेळ सुचला.

गोष्ट आहे १८६० मधली. इंग्रजांनी भारतात बस्तान बसवलेल. पुण्याच्या दुसऱ्या बाजीरावला शनिवारवाड्यातून पळवून लावून नाही का त्यांनी देश ताब्यात घेतला त्याला पन्नास वर्षे झाली होती. भारतातली सगळ्यात शेवटची शक्तिशाली सत्ता म्हणजे मराठे हरल्यामुळे इंग्रजांना कोणतेही आव्हान उरले नव्हते. अठराशे सत्तावन्नला उठावाचे प्रयत्न झाले पण कंपनीसरकारने ते चिरडून टाकले. आता तर राणीचं सरकार चालू होतं.

तुरळक विरोध सोडता तसं बघायला गेला तर ब्रिटीशांसाठी भारताला निवांत काळ चालू होता. विशेषतः पुण्यात.

मराठ्यांवर लक्ष ठेवायसाठी पुण्यात ब्रिटीश आर्मीचा कॅम्प लावण्यात आलेला होता. मोठ सैन्यतळ होतं. पण आता युद्धस्थिती नव्हती. मग आपल्या घरापासून सातसमुद्रापार आलेल्या गोऱ्या अधिकाऱ्यांना प्रश्न पडायचा की दिवसभर काय करायचं.  रोज रोज महाबळेश्वर, लोणावळा जाता येत नव्हतं.

“बैठे बैठे क्या करे? करना है कुछ काम?”

अंताक्षरी नाही हो. ते खेळायचे मैदानी खेळ. वेळ होता, पैसे होते, रिकामं डोकं होतं. पुण्यासारखं आल्हादायक वातावरण होतं. कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून एक नवा खेळ बाहेर आला. कोण म्हणत की पुण्यातल्याच कुठल्या तरी पोरांना खेळताना बघून इंग्रज अधिकाऱ्यांना ही आयडिया सुचली. आता आपण काय तिथे नव्हतो मग काय सांगणार.

खेळ सुरु झाला. दोघांच्यात खेळला जाणारा हा खेळ. फ्रान्स मध्ये शोधल्या गेलेल्या टेनिसच्या धरतीवर हा खेळ सुरु झाला.  त्याला रॅकेट, शटलकॉक वगैरे अपडेट आलं. थोड्याच दिवसात भारतातल्या इंग्रज अधिकाऱ्यामध्ये हा गेम फेमस झाला. पुण्यात शोधला गेलेला खेळ म्हणून त्याला म्हणायचे,

“पुना गेम”

आता भारतात हिट झालेला या गेमची चर्चा इंग्लंडला पोचण्यात वेळ किती लागणार होता?

रिटायरमेंट नंतर इंग्लंडला परत गेलेल्या अधिकाऱ्यांनी अभिमानाने हा पुना गेम आपल्या गावाकडच्या दोस्तांना शिकवला. तिथे पण हा खेळ व्हायरल झाला. मोठमोठे राजे लॉर्ड जमीनदार यांच्याकडेही पुना गेमबद्दल ऐकायला मिळालं. त्यांनी याच्या स्पर्धा भरवायला सुरवात केली.

1873 मध्ये ग्लॉस्टरशर प्रांतातील बोफर्टच्या राजाने या खेळाचा परिचय एका कार्यक्रमानीमित्त जमलेल्या पाहुण्यांना करून दिला. हा कार्यक्रम ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणाचे नाव बॅडमिंटन होते. आपल्या देशाचा दुराभिमान ठासून भरलेल्या इंग्रजांनी भारताच्या गावाचं नाव काढलं आणि आपल्या गावावरून नवं बारस केलं

“बॅडमिंटन”

बघा आणि आपण आपले योगीजी गावांची नावे बदलली तर रुसून बसतो. असो.

१८९३ साली स्थापना झाली “द बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंग्लंड”. या संघटनेने आपली अधिकृत नियामवली बनवली आणि याच नियमानुसार १८९९ मध्ये पुरूषांच्या तर १९०० मध्ये स्त्रियांच्या “ऑल इंग्लंड चँपियनशिप” स्पर्धा सुरू झाल्या. पुढे या स्पर्धा जागतिक स्तरावर पोहचल्या.

बॅडमिंटनच्या जन्मभूमीत म्हणजे भारतात १९३४साली ऑल इंडिया बॅडमिंटन असोशीएशन सुरु झाली. पण जगात आपला डंका वाजवण्यासाठी दीपिकाचे पप्पा प्रकाश पदुकोण यांचा जन्म व्हावा लागला.  त्यांनी १९८० साली ऑल इंग्लंड चँपियनशिप जिंकली.

सध्या सायना, सिंधू वगैरे पोरी बॅडमिंटन मध्ये जग गाजवत आहेत. पण अजून प्रतीक्षा आहे एखाद्या पुण्याच्या खेळाडूची जो बॅडमिंटनची चँपियनशिप त्याच्या जन्मगावी आणेल.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.