भारतातल्या प्रत्येक शाळेत आपली प्रतिज्ञा म्हटली जाते हे खुद्द लिहिणाऱ्याला सुद्धा ठाऊक नव्हते

भारत माझा देश आहे ,सारे भारतीय माझे बांधव आहे…..

हि प्रतिज्ञा आपण शाळेत असताना कित्येक वर्ष म्हणत होतो, महाविद्यालयात आल्यानंतर पाठयपुस्तकांमध्ये सुद्धा हि प्रतिज्ञा आहे. इतक्या वर्षांपासून हि प्रतिज्ञा आपण घोकत आलो पण हि प्रतिज्ञा नक्की लिहिली कुणी लिहिली असा प्रश्न पडायचा. प्रश्न पडायचं कारण म्हणजे पुस्तकात जन गण मन हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं, वंदे मातरम हे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलं असा त्यांचा खाली उल्लेख असायचा मात्र प्रतिज्ञेखाली कोणाचं नावच नसायचं.  शाळा , कॉलेजातल्या मास्तर लोकांना विचारलं तर त्यांनाच माहिती नसायचं.

एकाने तर ठोकून दिलं कि साने गुरुजी किंवा यदुनाथ थत्ते या दोघांपैकी कुणीतरी लिहिली असेल. यदुनाथ थत्ते यांनी या प्रतिज्ञेचा अर्थ विशद करणार प्रतिज्ञा नावाचं पुस्तक लिहिलं आहे. अगदी पाठ्यपुस्तक मंडळाला देखील राष्ट्रीय प्रतिज्ञा लेखकाचं नाव माहिती नव्हतं.

पुढे २०१२ साली जेव्हा भारतीय प्रतिज्ञेचा सुवर्णमहोत्सव साजरा केला गेला तेव्हा या प्रतिज्ञेच्या लेखकाचे नाव  जवळपास सगळ्या भारताला कळाले. या लेखकांबद्दलचा आणि प्रतिज्ञा कशी तयार झाली याबद्दलचा आजचा किस्सा ….

आंध्र प्रदेशाचे प्रसिद्ध तेलगू साहित्यिक पेदिमेरी व्यंकट सुब्बाराव यांनी १९६२ मध्ये तेलगू भाषेत पहिल्यांदा हि प्रतिज्ञा लिहिली.

आंध्रप्रदेशाच्या नालगोंडा जिल्ह्यातील अन्नेपर्थी या गावाच्या पेदिमेरी व्यंकट सुब्बारावांचे संस्कृत, तेलगू, इंग्रजी आणि अरेबिक भाषांमध्ये पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण झाले होते. निसर्गोपचार तज्ञ् म्हणूनही ते परीची होते. विशाखापट्टणम जिल्ह्याचे जिल्हा कोषागार अधिकारी ते अनेक वर्ष सरकारी नोकरीत कार्यरत होते. त्यांनी लिहिलेली ‘ कालभैरवाहू ‘  हि कादंबरी विशेष गाजली होती.

मुळात राष्ट्रप्रेमाने प्रेरित झालेले, स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतलेले कवी पेदिमेरी व्यंकट सुब्बाराव यांना आपल्या जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना म्हणण्यासाठी एक प्रतिज्ञा लिहिली. त्यांच्या शिक्षण खात्यातील एका मित्राला हि कल्पना खूपच आवडल्याने त्याने आंध्रप्रदेशचे त्या वेळचे शिक्षणमंत्री पी.व्ही.जी. राजू ह्यांना हि प्रतिज्ञा दाखवली. त्यांनी ती शाळाशाळांमध्ये घेण्याचा आदेश दिला.

भारतीय केंद्रशासनाच्या शिक्षण विभागाद्वारे स्थापन करण्यात आलेल्या भारतीय शिक्षण विकास या समितीची ३१वी सभा तिचे पदसिद्ध अध्यक्ष केंद्रीय शिक्षण मंत्री एम.सी.छागला यांच्या अध्यक्षतेखाली ११ऑक्टोबर १९६४ रोजी बंगळुरू येथे झाली होती. त्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना सदोदित जागृत राहण्यासाठी समितीच्या शिफारशीनुसार शाळा, महाविद्यालये ह्यांमधे तसेच राष्ट्रीय दिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांना म्हणण्यासाठी एक प्रतिज्ञा असावी.

त्यावेळी पेदिमेरी व्यंकट सुब्बाराव यांनी लिहिलेली प्रतिज्ञा देशपातळीवर स्वीकारण्याची शिफारस करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.  लेखक म्हणून त्यांचा नामोल्लेख केलेला नव्हता. २६ जानेवारी १९६५ पासून देशभरात हि प्रतिज्ञा लागू करण्यात आली. या प्रतिज्ञेचा देशपातळीवरील विविध भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आणि १९६५पासूनच देशभरातल्या पाठयपुस्तकांमध्ये या प्रतिज्ञेचा समावेश करण्यात आला. केवळ पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेचा दर्जा न देता राष्ट्रीय प्रतिज्ञा म्हणून तिचा गौरव करण्यात आला.

एवढं सगळं होऊनही पेदिमेरी व्यंकट सुब्बाराव याना या प्रकरणाबद्दल काहीच माहिती नव्हतं. निवृत्त झाल्यानंतर एक दिवस ते घरी बसलेले असताना शेजारी त्यांचा नातू हि त्यांचीच प्रतिज्ञा वाचत होता. ती प्रतिज्ञा ऐकून त्यांना धक्काच बसला. चटकन उठून त्यांनी ते पाठयपुस्तक बघितलं आणि त्यांना हायसं वाटलं कि त्यांची लिहिलेली  प्रतिज्ञा राष्ट्रीय स्तरावर गेली असून आता ती पाठ्यपुस्तकात छापून आली आहे.

त्यांच्या कुटुंबियांना त्यांनी हे सगळं प्रकरण सांगितलं तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला लेखकाचं नाव पाठयपुस्तकात का नाही म्हणून जाब विचारला तेव्हा याचं प्रत्युत्तर मंत्रालयाने दिलं कि अधिकृतरीत्या त्यांचं नाव नोंदवलं गेलं आहे. मंत्रालयाने त्यांच्या बऱ्याच पत्रांची उत्तरे तशीच अनुत्तरित ठेवली.

ह्या प्रतिज्ञेचं महत्व लक्षात घेऊन आपण त्यानुसार वागलं पाहिजे. पेदिमेरी व्यंकट सुब्बाराव यांनी हि अतिशय महत्वाची गोष्ट आपल्याला दिली आहे.

माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.