राहत इंदौरींनी वाजपेयींवर खालच्या भाषेत टिका केली होती का..?

माणूस एकतर कॉंग्रेसचा असतो किंवा भाजपचा असतो, गेलाबाजार माणूस राष्ट्रवादी, सेना किंवा मनसेचा देखील असू शकतो. या पक्षीय राजकारणात आपण विसरतो की माणूस विचारांचा देखील असू शकतो. एखादा माणूस धर्मांध शक्तींच्या विरोधात असू शकतो किंवा एखादा माणूस सनातनी असू शकतो.

पक्षीय राजकारणाचा विचार करताना अशी माणसं विरोध करतात किंवा समर्थन करतात आणि मग तो अमक्या पक्षाचा समर्थक किंवा तमक्या विरोधक असा शिक्का त्यांच्यावर बसतो. दूसरी गोष्ट असते आपल्या कलेतून भूमिका घेण्याची.

आचार्य अत्रे असोत किंवा पु.ल. देशपांडे त्यांना आज आपण ओळखतो ते त्यांच्या भूमिकांमुळे. कॉंग्रेसचे विरोधक म्हणून अत्रे आपणाला जवळचे वाटण्यापेक्षा संयुक्त महाराष्ट्राची भूमिका घेणारे आणि लोकमत तयार करणारे महाराष्ट्र धर्माचे पालन करणारे अत्रे आपणाला अधिक माहित असतात. 

पण गफलत होते ती एखादा माणूस आपणाला माहित नसेल तेव्हा, किसी के बाप का हिंदोस्तान थोडी ही हैं म्हणताना राहत इंदौरी मुस्लीमांच संतुष्टीकरण करणारे वाटतात. मग सोशल मिडीयातून त्यांच्या मरणावर देखील टिका होते. टिका जरूर व्हावी पण टिका करताना पुरेसं ज्ञान असणं ही प्राथमिक अट देखील असावी.

सध्या सोशल मिडीयावर विशिष्ट हेतूने राहत इंदौरी यांच्या जाण्यानंतर टिका करण्यात आली. बोलभिडूचे वाचक मंगेश निमकर यांनी आम्हाला विचारलं की खरच यात तथ्य आहे का म्हणून हा लेख.

या शेरमधून राहत इंदौरी यांनी वाजपेयींवर टिका केली होती. सध्या हाच शेर पाठवून ते कसे वाजपेयींच्या विरोधात होते हे सांगितलं जात आहे. भूमिका घेणारे शायर म्हणून त्यांच हे मत मान्य करायला हरकत नाही.

पण महत्वाचा मुद्दा हा आहे की, राहत इंदौरी यांच्या जाण्यानंतर त्यांच्यावर टिका करतानाा आपण वाजपेयी यांच्या जाण्यानंतर राहत इंदौरी काय म्हणाले होते याकडे दूर्लक्ष करतो. त्यासाठी खालील व्हिडीओ देखील पहायला हवा,

तेच राहत इंदौरी वाजपेयी गेल्यानंतर जे बोलतात तीच गोष्ट माणूस गेल्यानंतर कसे बोलावे हे शिकवतात.
मै जब मर जाऊ, मेरी अलग पहचान लिख देना,
लहु से मेरी पेशानी पे हिंदुस्थान लिख देना…
मी जेव्हा मरेन तेव्हा तुम्ही माझी मुसलमान, शायर किंवा आणखी काहीही वेगळी ओळखं करुन द्या. पण माझ्या कपाळावरती हिंदुस्थान असचं लिहा. मी मुसलमान असलो तरी भारतीय आहे, हिंदुस्थानी आहे आणि मेल्यानंतर देखील हिंदुस्थानी हिच माझी ओळख अजरामत रहावी असं ते सांगतात.
वास्तविक एखाद्या पक्षाला किंवा, त्या पक्षाच्या नेत्याच्या विरोधात काही बोललं की हिंदु माणसाला देखील देशद्रोह्याच प्रमाणपत्र दिलं जातं. बहुसंख्यांकवादाला फाटा देतात तेव्हा खरतर राहत इंदौरी कोणत्या पक्षाच्या विरोधात कधीच नसतात. ते शेरोशायरीला मनोरंजनाची झालर लावून वास्तव परिस्थितीवर आपलं मत मांडत असतं. त्यांनी कधीच कुणाची भिडभाड ठेवली नाही.
पुरस्कारांसाठी किंवा मानधनासाठी स्वतःच्या भूमिका त्यांनी गहाण ठेवल्या नाहीत. म्हणूनच गालीबपासून सुरु झालेल्या विद्रोहाच्या परंपरेत इक्बाल, फैज अहमद फैज, बशीर बद्र, मुनव्वर राना, वसीम बरेलवी यांच्यानंतर वर्तमान वारसदार म्हणून राहत इंदौरी यांच्याकडे पाहिले जातं.
राज्यस्थानमध्ये सेहूर शहरात आयोजित एका मुशायऱ्यामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या भूमिकांवर टिका केली. त्यावेळी विचारमंचावर भाजपचे मंत्री उपस्थित होते. राहत यांच्या कवितेनं त्यांना आपल्या रागावर नियंत्रण ठेवता आला नाही. त्यांनी थेट माईकचा ताबा घेतला आणि राहत यांना शहाणपणाचा उपदेश दिला. पण राहत इंदौरी मागं हटले नाहीत. उपस्थित रसिक राहत इंदौरींच्या समर्थनार्थ उभे राहिले. आणि मंत्र्यांना कार्यक्रम सोडून पळ काढावा लागला होता. त्यावेळी राहत मंत्र्यांना उद्देशून म्हणाले होते –
जुंबा तो खोल नजर तो मिला, जवाब तो दे
मैं कितनी बार लुटा हूं, मुझे हिसाब तो दे’

गोध्रा इथं झालेल्या हत्याकांडावर त्यांनी केलेली शायरी देखील प्रचंड वादग्रस्त ठरली होती

त्यात त्यांनी कोणाची ही भीड न ठेवता कारसेवकांसोबत काहीच झालं नसल्याचं सांगितलं. घटनेच्या एका वर्षानंतरच आलेल्या रिपोर्टमध्ये ही गोष्ट समोर आली होती. रेल्वे मध्ये आग लावल्याच्या अफवांना माध्यमांनीच हवा दिल्याचं त्यांनी सांगितलं होतं. ते म्हणाले होते –
जिनका मसलक है रौशनी का सफर
वो चिरागों को क्यों बुझाएँगें
अपने मुर्दे भी जो जलाते नहीं
जिंदा लोगों को क्या जलाएँगे
सन २०१४ साली केंद्रात सत्ता बदल झाल्यानंतर झुंडबळीच्या घटना घडू लागल्या. त्यानंतर मनुव्वर राणा, इम्रान प्रतापगढी, राहत इंदौरी या त्रयींच्या राजकीय विद्रोहात्मक शायरीची चर्चा सुरु झाली. मुनव्वर राणा यांनी सत्तेविरोधात आघाडी उघडल्यानंतर राहत इंदौरी त्यांच्या समर्थनार्थ उभे राहिले. राष्ट्रवादाच्या सांस्कृतिक अन्वयार्थाविरोधात त्यांनी अनेक शेर लिहीले. प्रतिगामी गटाच्या राष्ट्रवादाविषयी आपली भूमिका मांडली. सत्ता प्रणित राष्ट्रवादाला त्यांनी फटकारलं. त्यांनी लिहीलं-
‘आंखो में पानी रखो, होठों पे चिंगारी रखो
जिंदा रहना है तो तरकीबें बहुत सारी रखो’
नोव्हेंबर -डिसेंबर २०१९ मध्ये जेव्हा भारतात CAA आणि NRC ला विरोध करण्यासाठीची आंदोलनं चालू झाली तेव्हा त्यांनी केलेली ‘किसी के बाप का हिन्दोस्तान थोड़ी है’ ही त्यांची रचना निदर्शनाची टॅगलाईन बनली होती.
लगेगी आग तो आएंगे घर कई ज़द में
यहां पे सिर्फ़ हमारा मकान थोड़ी है,
जो आज साहिबे मसनद हैं कल नहीं होंगे
किराएदार हैं, ज़ाती मकान थोड़ी है,
सभी का ख़ून है शामिल यहां की मिट्टी में
किसी के बाप का हिन्दोस्तान थोड़ी है!

किसी के बाप का हिन्दोस्तान थोड़ी है!

जे आज सत्तेत आहेत, ते उद्या असणार नाहीत. ही लोकशाही आहे, सत्तेवर त्यांची मालकी नाही. स्वतंत्र होताना आणि झाल्यानंतरही सर्वच जाती-धर्माच्या रक्ताने भारताला सुरक्षित ठेवलं आहे.

हा देश घडवण्यात सगळ्यांचेच योगदान आहे. त्यामुळे हा देश कुणाच्या बापाचा नाही. असं ते ठासून सांगतात.

  • भिडू ऋषिकेश नळगुणे
    संदर्भ : सरफराज अहमद सोलापूर, सत्याग्रह, क्विंन्ट
Leave A Reply

Your email address will not be published.