विरोधकांना आडवं करून बाळासाहेबांनी रायगडावर रोपवे बांधून दाखवला.

दुर्गराज रायगड म्हणजे प्रत्येक स्वाभिमानी मराठी मनासाठीचं तीर्थक्षेत्र. स्वराज्याची राजधानी. इथेच शिवराज्याभिषेकासारखी अख्ख्या भारताचा इतिहास बदलणारी घटना घडली होती. शिवरायांनी अखेरचा श्वास याच गडावर घेतला होता.

त्यांच्या समाधीच्या पवित्र दर्शनासाठी हजारो लोक रायगडावर येत असतात.

हा गड महाप्रचंड आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची २७०० फूट इतकी आहे. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम.

देवगिरीच्याहुन दशगुणी, दीड गाव उंच, प्रशस्त जागा. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाहि. उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाहि’ हे बघून महाराज खुशीने म्हणाले होते,

‘तख्तास जागा हाच गड करावा’

अतिदुर्गमपणा हेच रायगडाचं वैशिष्ट्य आहे.

आज चढायला पायऱ्या आहेत मात्र पूर्वी कोणालाही तो सहजासहजी चढायला जमत नसे. म्हणूनच तो अभेद्य होता. आजही तो चढायला इतका सोपा नाही.

साधारण नव्वदच्या दशकात रायगडावर रोपवे उभारायची संकल्पना उभी राहिली.

जगभरात अनेक दुर्गम ठिकाणी जाण्यासाठी रोपवेची व्यवस्था आहे. रायगडाला भेटी देणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेता यावे म्हणून रोप वे चा विचार पुढे आला. टिळकांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ यांना ही जबाबदारी देण्यात आली.

रायगड पुरातत्वखात्याने देखील या प्रोजेक्टसाठी हिरवा कंदील दाखवला. जोग इंजिनियरिंग लिमिटेड या कंपनीने बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावर रोप वे बांधण्यास सुरवात केली.

पण महाराष्ट्रातील गिर्यारोहक, गिरीप्रेमी, शिवप्रतिष्ठानसारख्या संगठना यांनी मात्र याला विरोध केला.

त्यांचे म्हणणे असे होते की रोप वे झाला तर कोणीही गडावर जाईल, धिंगाणा होईल, पिकनिक स्पॉट बनेल. गड पाहायचा तर तो डोंगर चढूनच जायला हवे, किल्ले हे चढायला कष्टप्रदच असावेत, तरच इतिहास नीट समजू शकतो.

काही इतिहाससंशोधक उपोषणाला बसले. मोठी कोंडी निर्माण झाली.

ही कोंडी फोडण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समोर आले.

रोपवे व्हावा ही त्यांची स्पष्ट भूमिका होती.

अपंग, वृद्धांना गड पाहता यावा, शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेता यावे या उद्देशाने रोप वे झालाच पाहिजे असे बाळासाहेबांचे मत होते.

उद्या माझ्यासारख्या कोणाला जर गडावर जायचे असेल तर त्याने काय कोणाच्या खांद्यावर बसून जायचे का, असे ते म्हणत.

बाळासाहेबांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन समजूत काढली. पण तरुण गिर्यारोहक मागे हटण्यास तयार नव्हते.

साबीरभाई शेख नावाचे कट्टर शिवसैनिक या महासंघाचे अध्यक्ष होते,

त्यांची कानउघाडणी करत बाळासाहेबांनी गिर्यारोहकांना एक पाऊल मागे घ्यायला लावले.

शिवसेना भाजप युती सरकार आल्यावर बाळासाहेबांनी या प्रकल्पाला गती देऊन १९९६ पर्यंत रोप वे सुरू देखील करून दाखवला.

  • आज हजारो आबालवृद्धांना शिवदर्शनाची सोय या रोपवे मुळे झाली. आज तिथे एक संग्रहालय देखील आहे.

एक आधुनिक आश्चर्य म्हणून देखील अनेक जण रायगडाच्या रोपवेचा थरारक अनुभव घेतात.

पुढे हळूहळू विरोध मावळत गेला. याच अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे तरुण कार्यकर्ते महाराष्ट्रातर्फे एव्हरेस्ट शिखराच्या मोहिमेवर निघणार होते.

त्यापूर्वी ते शिवसेनाप्रमुखांच्या भेटीला मातोश्रीवर आले.

बाळासाहेबांची नुकताच हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाली असल्यामुळे ते विश्रांती घेत होते. तरीही बाळासाहेबांनी त्यांना ओळखलं.

त्यातील ऋषिकेश यादव यांच्याकडे पाहून गंमतीमध्ये ते आपल्या सोबतच्याना म्हणाले,

‘‘आम्ही अपंग, वृद्धांची सोय म्हणून रोप वे बांधत होतो. हे लोक विरोध करत होते. यांना आडवा करून मी रोप वे बांधलाच.”

पुढे यादव यांच्या नेतृत्वाखाली सुरेंद्र चव्हाण यांनी मे १९९८ रोजी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा भीमपराक्रम करून दाखवला. भारतातल्या गिर्यारोहकांची ही पहिलीच यशस्वी नागरी मोहीम होती.

पहिला मराठी मावळा जगातल्या सर्वोच्च टोकावर पोहचला होता.

एकेकाळी टीका करणाऱ्या बाळासाहेबांनी गिर्यारोहक महासंघाच्या एव्हरेस्ट शिखर पार करणाऱ्या टीमचा धडाक्यात सत्कार करवून आणला आणि शासना तर्फे 25 लाखांचं पारितोषिक सुद्धा दिल.

संदर्भ- लोकप्रभा गिर्यारोहकांचा विरोध डावलून रायगडावर रोप वे बांधणारे बाळासाहेब…

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.