मॅचच्या दरम्यान पाऊस मदतीला आला आणि पाकिस्तानने १९९२ चा वर्ल्डकप जिंकला

पाकिस्तान सेमी फाइनलमध्ये जाईल की नाही हे अजून नक्की नाहीये. पण, १९९२ मध्ये याच टीमने वर्ल्डकप जिंकत सगळ्यांना धक्का दिला होता. नेमका काय घडलं त्या वर्ल्डकपमध्ये ?

दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी चाहत्यांची एक वेगळी थेअरी होती, ती म्हणजे ‘कुदरत का निझाम.’ त्यांचं असं म्हणणं होतं की १९९२ च्या वर्ल्डकपमध्ये जे झालं ते सगळं यंदाच्या वर्ल्डकपमध्येही होतंय.

आता याच्यात किती तथ्य आहे, तर यासाठी आपल्याला बघावा लागतो १९९२ चा वर्ल्डकप.  

तो वर्ल्ड कप पहिल्यांदाच दक्षिण गोलार्धात म्हणजेच ऑस्ट्रेलियामध्ये खेळवला जात होता. पावसाचे दिवस होते. तिथले वेगवान गवताळ पिचेस, त्यात ढगाळ हवामान हे वेगवान बॉलिंगला मदत करणारे आहे. प्रत्येक टीमने त्या दृष्टीने तयारी केली होती. आपापल्या देशातले तगडे फास्ट बॉलर्स शोधून त्यांना चान्स देण्यात आला होता. सामने राउंड रॉबिन पद्धतीने खेळले जात होते. म्हणजेच प्रत्येक टीमला बाकीच्या सगळ्या टीमशी एक तरी सामना खेळायलाच लागणार होता.

पाकिस्तानची तयारी जोरात होती. त्यांनी चाळीस वर्षाच्या इम्रान खानला रिटायरमेंटमधून खास वर्ल्डकपसाठी परत बोलावलं होतं. इम्रान खानने पीसीबीशी भांडून आपल्या हवी ती टीम बनवून घेतली होती. यामध्ये जावेद मियांदाद, रमीझ राजा, वसीम अक्रम, अकिब जावेद, इंझमाम उल हक अशा अनेक नव्याजुन्या  खेळाडूंचा समावेश होता.

बराच गाजावाजा झाला होता पण तरी पाकिस्तानची सुरवात डळमळीत झाली. वेस्ट इंडीजकडून दहा विकेटनी जोरदार मात खावी लागली होती. पाठोपाठ झालेल्या झिम्बाब्वेच्या दुबळ्या टीमला त्यांनी हरवले पण त्यांचा पुढचा सामना इंग्लंडबरोबर होणार होता.

मॅच ऍडलेडमध्ये होणार होती. आदल्या दिवशी तुफान पाउस झाला. हिरवळ असलेली खेळपट्टी निसरडी झाली. इम्रान खानने पीचचा रंग बघून दुखापत नको म्हणून आधीच मॅचमधून कल्टी मारली. जावेद मियांदाद बदली कॅप्टन बनला होता.

इंग्लंडचा कॅप्टन ग्रॅहम गूचने टॉस जिंकून अपेक्षेप्रमाणे पहिल्यांदा फिल्डिंग निवडली. इयान बॉथमच्या नेतृत्वाखालील त्यांची फास्ट बॉलिंग चांगलीच फॉर्मात होती. ओपनिंगला आलेले रमीज राजा आणि आमीर सोहेल यांनी नुकताच सेन्चुरी मारली असल्यामुळे फुल कॉन्फिडन्समध्ये होते.

पण पहिल्या बॉललाच त्यांना कळलं आज काही आपलं खरं नाही.

बॉल फास्ट तर येत होताच पण त्याची उंची कमी जास्त राहत होती शिवाय तो कोणत्या दिशेला स्विंग होईल काहीच अंदाज नव्हता. रन जाऊ द्या कसोटीप्रमाणे बॉल अडवता जरी आला तरी बेहत्तर असं म्हणत राजा आणि सोहेल बॅटिंग करत होते. पण जास्त वेळ हा खेळ टिकला नाही. रमीज १ रन काढून आउट झाला. 

त्याच्या पाठोपाठ आला नव्याने टीममध्ये आलेला इंझमाम. त्याने पूर्वी कधीचं अशा विकेटवर फलंदाजी केली नव्हती, त्याला काही कळालेच नाही, त्याने पहिल्याच बॉलला स्लीप मध्ये कच उडवला. आधी तर सेकंड स्लीपमध्ये  बॉथमच्या हातातून कॅच सुटला मात्र शेजारी उभ्या असलेल्या ऍलेक स्टुअर्टन तो बॉल खाली न पडू देता अविश्वसनीय कॅच घेतला. पाकिस्तानची अवस्था २ बाद ५ धावा अशी झाली.

सगळ्यात अनुभवी आणि लिजेन्ड्री बॅट्समन जावेद मियांदाददेखील अवघ्या तीन धावा बनवून आउट झाला. तेव्हा मात्र पाकिस्तान टीमचं उरल सुरल अवसान देखील संपलं. पत्त्याचा बंगला कोसळावा तसा पाकिस्तानचा डाव कोसळला.

फक्त शेवटच्या शेपटाने म्हणजेच वसीम हैदर, मुश्ताक अहमद या बॉलरनी केलेल्या वळवळीमुळे पाकिस्तानच्या ७४ धावा स्कोरबोर्डवर लागल्या.

नॉन प्लेयिंग कॅप्टन इम्रान खान तर रागाने धुमसत होता. त्याने पूर्ण टीमवर शिव्यांची लाखोली वाहिली होती. आता इंग्लंडला पन्नास ओव्हर मध्ये ७५ धावा बनवण्यापासून रोखणे एवढेच त्यांच्या हातात होते.

ग्रॅहम गूचने सावध सुरवात केली. जखमी वाघाप्रमाणे वसीम अक्रम आणि अकिब जावेद तुफान वेगात बॉलिंग टाकत होते. इंग्लंडचे ओपनर फक्त डिफेन्स करत होते. तरी गूच अक्रमच्या जाळ्यात अडकलाच. पण अनुभवी इयान बॉथमने कोणतेही प्रेशर न येऊ देता रॉबिन स्मिथला सोबत घेऊन डाव सांभाळला.

६ ओव्हर मध्ये १७ रन इंग्लिश स्कोरबोर्डवर झाल्या होत्या.  अजून ९ विकेट हातात होत्या आणि ४४ ओव्हर मध्ये फक्त ५८ धावा काढायच्या होत्या.

पाकिस्तानच्या आशा संपल्या होत्या. सगळे पब्लिक घरी निघाले होते. इतक्यात पाऊस आला. नुसता आला नाही, तर धुव्वादार बरसू लागला.

सगळे प्लेअर्स धावत मैदानातून बाहेर आले. पीच झाकण्यात आलं. लंचब्रेक केला गेला. पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता. अंपायरनी आपले कॅॅलक्युलेटर बाहेर काढले. काय काय बटन दाबली माहित नाही पण शेवटी इंग्लंडला जिंकायला १० ओव्हर मध्ये ६२ धावाच टार्गेट देण्यात आलं. मॅचचा निर्णय लागण्यासाठी कमीतकमी १५ ओव्हरचा खेळ होणे आवश्यक होते.

हे अशक्यप्राय आणि अन्यायकारक टार्गेट बघून इंग्लंडचे टीम मेम्बर्स चिडले. तरी त्यांची ते दहा ओव्हर खेळण्याची तयारी होती. पण इकडे धूर्त इम्रान खानने सुद्धा बोंबाबोंब सुरु केली. पाकिस्तानी टीम पावसात खेळायला उतरणार नाही, खेळ थांबवा अशी मागणी त्याने केली.

अखेर मॅच रद्द झाली. दोन्ही टीमना १-१ गुण वाटून देण्यात आला. जी मॅच हमखास पाकिस्तान हरला असता त्या मॅचसाठी पाकिस्तानला १ गुण मिळाला. 

पाकने त्यांनतर झालेला भारताविरुद्धचा वर्ल्डकपचा पहिला सामना देखील हरला, मग दक्षिण आफ्रिकाबरोबर देखील हरले. एकूण त्यांनी तीन सामने हरले आणि चार सामने जिंकले आणि एका अनिर्णयीत सामन्याचा १ पॉईंट असे त्यांचे ९ पॉईंट्स झाले आणि ते सेमीफायनलला पोहचले.

टेबलमध्ये त्यांच्या पाठोपाठ असलेल्या ऑस्ट्रेलियाचे ८ पॉईंट होते. पावसामुळे पाकला फुकटचा १ पॉईंट मिळाला नसता तर कमी रनरेटमुळे ते बाहेर पडले असते आणि ऑस्ट्रेलिया सेमीफायनल मध्ये असती. विशेष म्हणजे याच पावसाच्या वेडपट नियमामुळे दक्षिण आफ्रिका कारण नसताना सेमीफायनल मधून बाहेर पडली.

आता यावेळी सुद्धा हीच स्कीम लागू होतेय, पाकिस्ताननं पहिली मॅच हरली. साऊथ आफ्रिका सेमीफायनल मधून बाहेर पडली. पाकिस्तानची सेमीफायनल झाली, न्यूझीलंड विरुद्ध झाली जी त्यांनी जिंकली. दुसरी सेमीफायनल इंग्लंड विरुद्ध भारत झाली, जी इंग्लंडनं जिंकली. सेम आत्तापण झालं.

फायनलमध्ये इंग्लंड आणि पाकिस्तान समोरासमोर आले, ते मैदान होतं एमसीजी आणि आत्ताही तेच मैदान आहे. या स्पर्धेत अजून तरी पाकिस्तानला पावसाची मदत मिळालेली नाही,

पण फायनलच्या दिवशी पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आलाय, साहजिकच पाकिस्तानच्या आशा वाढल्या असतील…. एवढं नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.