राज ठाकरेंच्या मनसेच्या सदस्यत्वाचा पहिला फॉर्म रमाकांत आचरेकर यांनी भरला होता…

राज ठाकरेंची औरंगाबाद सभा हा सध्या प्रचंड चर्चेत असलेला विषय. राज ठाकरे या सभेत काय बोलणार? कुठला मुद्दा उचलणार? याची पार कट्टयांपासून सोशल मीडियापर्यंत सगळीकडे चर्चा आहे.

पण आपण मात्र आज एक वेगळाच विषय बघुयात, तो म्हणजे राज ठाकरेंचं क्रिकेट प्रेम आणि क्रिकेट कनेक्शन.

राजकारणाच्या परिघाबाहेर राज ठाकरे ओळखले जातात, ते त्यांच्या व्यंगचित्रांच्या फटकाऱ्यांमुळं. कित्येकांना बाळासाहेबांची छबी राज यांच्या भाषणात दिसते, तर कित्येकांना व्यंगचित्रांमध्ये.

भाषण, राजकारण, व्यंगचित्र, सिनेमे यापलीकडे राज ठाकरेंची आणखी एक आवड म्हणजे, क्रिकेट.

आपल्यापैकी अनेकांसारखे राज ठाकरे गल्ली क्रिकेटमध्ये मास्टर होते. राजकीय विश्लेषक धवल कुलकर्णी आपल्या ठाकरे विरुद्ध ठाकरे या पुस्तकात लिहितात, “गल्ली क्रिकेटमध्ये अंडरआर्म बॉलिंग टाकण्यासाठी राज ठाकरे प्रसिद्ध होते. क्रिकेट शिकण्यासाठी त्यांना कोच अण्णा वैद्य यांच्याकडे पाठवण्यात आलं. एकदा नेट प्रॅक्टिस करताना फुलटॉस बॉल त्यांच्या पायाला लागला आणि पाय सुजला.

हे बघून बाळासाहेब ठाकरे म्हणाले, आता पायावर निभावलं, पण हेच हाताला लागलं असतं तर? तुला चित्रकार व्हायचं आहे ना? त्यावर लक्ष केंद्रित कर. असं नको व्हायला की तू ना धड चित्रकार आहेस आणि ना धड क्रिकेटर.”

पायाला झालेल्या दुखापतीपेक्षा आपल्या काकाचा शब्द राज यांच्यासाठी महत्त्वाचा असावा, कारण त्यांनी क्रिकेट खेळण्याचा नाद सोडून दिला.

पण राज यांचं क्रिकेटवरचं प्रेम काही कमी झालं नाही. ते क्रिकेट आवडीनं बघायचे, सचिन तेंडुलकर तर त्यांचा खास मित्र. क्रिकेटच्या मैदानात राज दिसले नाहीत, कारण त्यांनी फटकेबाजीचं मैदान बदललं होतं.

त्यांचं क्रिकेटप्रेम २०१४ मध्ये पुन्हा चर्चेत आलं, ते दिवंगत रमाकांत आचरेकरांमुळे.

रमाकांत आचरेकर म्हणजे सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अमोल मुझुमदार असे दिग्गज खेळाडू घडवणारे प्रशिक्षक. आचरेकर सरांची शिस्त इतकी कडक होती, की त्यांनी सचिन आणि विनोदला बेशिस्तीमुळं लगावलेले फटकेही फेमस आहेत.

सचिन तेंडुलकर तर प्रत्येक विदेशी दौऱ्याआधी आचरेकर सरांचा आशिर्वाद घ्यायला विसरायचा नाही. त्यांची कोचिंगची पद्धत जगाला दाखवायला क्रिकेटच्या मैदानात धावांची टांकसाळ उघडणारे त्यांचे शिष्य पुरेसे होते.

२०१४ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्यव्यापी सदस्यत्व नोंदणी अभियान हाती घेतलं होतं. या अभियानातून २५ लाख लोकांना सदस्य करुन घेण्याचा विचार राज ठाकरेंनी बोलून दाखवला होता. याची सुरुवात झाली मुंबईच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर.

मनसेचे सदस्य म्हणून नोंदणी करण्यासाठी सामान्य कार्यकर्त्यांसोबतच अनेक अभिनेते आणि दिग्गजही होते.

पण पहिला फॉर्म भरला, तो रमाकांत आचरेकरांनी.

आचरेकर सर आता मनसेसोबत नवी इनिंग सुरु करणार का, सक्रिय राजकारणात दिसणार का? अशी भरपूर चर्चा झाली. पण तसं काही घडलं नाही.

आचरेकर रहायचे दादरमध्ये, राज ठाकरेंचं कृष्णकुंज हे निवासस्थान तिथपासून काही अंतरच लांब होतं. राज अगदी शिवसेनेत असल्यापासून त्यांचे आणि आचरेकरांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. जे मनसे स्थापन झाल्यावरही कायम राहिले.

जानेवारी २०१९ मध्ये रमाकांत आचरेकरांचं दुःखद निधन झालं. त्यांच्या अंत्यविधींना राज ठाकरेही उपस्थित होते. 

त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले होते, ”मी नुकतीच पक्ष बांधणीची सुरुवात केली होती, तेव्हा आचरेकर सरांनी दिलेला पाठिंबा मी कधीच विसरू शकत नाही. जेव्हा मनसेनं सदस्यत्व नोंदणी सुरू केली तेव्हा पहिला फॉर्म सरांनी भरला आणि आशीर्वादही दिले.

त्यांनी क्रिकेटच्या मैदानावर बॅटिंग करण्यासाठी सचिनला पाठिंबा दिला अगदी त्याचप्रकारे राजकीय मैदानावर बॅटिंग करण्यासाठी मला पाठिंबा दिला.”

आचरेकरांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात न झाल्यानं त्यांनी राज्य सरकारवर टीकाही केली होती.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.