राज ठाकरे नावाच्या वादळाचा राजकीय उदय या घटनेमुळे झाला.

निवडणुकांमधील निकाल काहीही लागू दे राज ठाकरे नावामागचा करिष्मा आजही कमी झालेला नाही. फार मोजकेच नेते आहेत ज्यांची भाषणे, ज्यांच्या मुलाखती लक्षपूर्वक ऐकलं जातं. ते कसे बोलतात, ते काय बोलतात याची उत्सुकता फक्त महाराष्ट्रातच नाही तर दिल्ली पर्यंत गाजत असते.

राज ठाकरे यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची हुबेहूब प्रतिकृती मानलं जातं. त्यांच्या सारखीच आक्रमकता, तसेच हावभाव, तर्जनी रोखून बोलण्याची स्टाईल, तोच रोखठोकपणा जनतेला आकर्षित करून घेत असतो.

उद्धव ठाकरेंशी झालेल्या मतभेदामुळे राज यांनी ९ मार्च २००६ रोजी आपला स्वतंत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सुरु केला. त्याच्याही आधी शिवसेनेत असताना त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. सेनेचं भविष्य त्यांच्यात पाहिलं जात होतं.

मात्र राज यांचा राजकारणात उदय कसा झाला या मागची कथा देखील इंटरेस्टिंग आहे.

अगदी लहान असल्यापासून राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या सभेला जायचे. त्यांच्या मांडीवर बसून राजनी राजकारणाचे धडे गिरवले. रस्त्यावर लढणाऱ्या शिवसैनिकांना घेऊन बाळासाहेबांनी पक्ष कसा बांधला याचे राज ठाकरे साक्षीदार होते.

आजोबांच्या काळापासून चालत आलेला मराठी माणसाच्या अस्मितेचा प्रश्न त्यांच्याही जवळकीचा होता. मुंबईत परभाषिकांकडून होत असलेली गळचेपी ते अनुभवत होते. आपणही यात काही तरी करावं याची खुमखुमी त्यांना देखील होती. पण राजकारणात त्यांचा प्रवेश झाला नव्हता.

बाळासाहेबांना सोडलं तर ठाकरे कुटूंबियांमधील कोणीही शिवसेनेच्या अधिकृत पदावर नव्हता. राज ठाकरेंचे वडील संगीतकार श्रीकांत ठाकरे हे मार्मिकचे संपादक होते पण जेव्हा मार्मिक मधून शिवसेनेचा राजकीय भूमिका मांडायचं ठरलं तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितल.  

ऐंशीच्या दशकातला हा काळ. शिवसेना आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक झाली होती.

आजवर अफाट लोकप्रियता मिळाली पण त्याच रूपांतर मतपेटीत करायला हवं याबद्दल बाळासाहेब आग्रही होते. त्यांनी मराठवाडा व इतर भागात आपला पक्ष पोहचावा  विशेष प्रयत्न केले. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर मध्ये करावे हि त्याच काळातील मागणी. सेनेत जुन्या विचारांचे नेते मागे पडत होते. काही बदल अपरिहार्य होते.

राज ठाकरे यांच्याबद्दल महाविद्यालयीन तरुणांमध्ये सुरवातीपासून आकर्षण होतं. त्यांचं व्यक्तिमत्व देखणं व उमदं होतं, आपल्या काकांप्रमाणेच ते रोखठोक व तितकेच दिलदार विचारांचे राज ठाकरे विद्यार्थ्यांच्यावर पटकन छाप पाडत होते.

फक्त मुंबईतच नाही तर मुंबई बाहेर देखील अशीच परिस्थिती होती. पुणे विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणूक होत्या. राज ठाकरे जेव्हा तिथे गेले तेव्हा फक्त बाळासाहेबांचा पुतण्या प्रचाराला आला आहे म्हणून तिथले त्यांचे सर्व उमेदवार निवडून आले. अगदी असच अमरावतीच्या विद्यापीठातील निवडणुकांवेळी देखील घडलं.

फक्त सतरा अठरा वर्षांच्या राज ठाकरे यांची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये सुरु झाली. विशेषतः ग्रामीण भागात देखील त्यांचं नाव जाऊन पोहचलं होतं. चाणाक्ष नजरेच्या बाळासाहेबांनी हे हेरलं होतं. नव मतदारांपर्यंत पोहचायचं असेल तर विद्यार्थ्यांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करून घेतलं पाहिजे हे विचार त्यांना देखील पटत होते.

काँग्रेसचे एनएसयुआय, भाजपचे एबीव्हीपी वगैरे प्रत्येक पक्षाचे विद्यार्थी संघटन होते त्याप्रमाणे शिवसेनेची विद्यार्थी संघटना सुरु केली पाहिजे ही कल्पना पुढे आली.   

 यातूनच अखिल भारतीय विद्यार्थी सेनेचा जन्म झाला.

पण या संघटनेच्या विद्यार्थ्यांना नेहमी एक समस्या भेडसावायची कि आपले प्रश्न घेऊन मातोश्री बंगल्यात जायचं तरी कसं ? मातोश्री म्हणजे बाळासाहेबांसारख्या वाघाची गुहा. तिथला दरारा काही औरच होता. मोठमोठे नेते या गुहेत प्रवेश करायला घाबरायचे. शिवाय मातोश्री बंगल्यात दोन ग्रेट डेन जातीची कुत्री देखील असायची.

या सगळ्या कारणांमुळे विद्यार्थ्यांचे मातोश्रीवर जायचे धाडस व्हायचे. त्यातून शिवसेनाप्रमुखांच्या समोर उभं राहून मागण्या मांडायचं म्हणजे सिंहाचं काळीज पाहिजे. या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या पुढे उभा राहिला. शेवटी असं ठरलं की विद्यार्थी सेनेच्या प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती राज ठाकरे यांना करायची.

तसही विद्यार्थी सेनेच नेतृत्व राज ठाकरे यांच्याकडे होतं. त्यांनी या कार्यकर्त्यांचा बाळासाहेबांशी संपर्क वाढावा म्हणून विद्यार्थी सेनेचं प्रमुख पद स्विकारलं.

ते वर्ष असावं १९८८. पहिल्यांदाच बाळासाहेबांनंतर ठाकरे कुटूंबियांपैकी कोणी तरी शिवसेनेच्या पदावर सक्रिय झाला होता. राज ठाकरे नावाच्या वादळाची हि सुरवात होती.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.