कॉलेजमधल्या पोरांना सुद्धा ठाऊक नव्हतं की आपण कोणाची रॅगिंग घेतोय..

आपण बघतो ना तसे राजकारणी नसतातच मुळी. आक्रमक दिसणारे नेते सुद्धा शांत असू शकतात यावर तुम्हाआम्हा लोकांचा असा काही विश्वास बसत नाही. पण असं असत बरं का. आज तुम्हाला अशाच एका मोठ्या आक्रमक राजकारण्याची छोटीशी गोष्ट सांगणार आहे.

गोष्टीत थोडा सस्पेन्स आहे. नाव तुम्हाला शेवटीच समजेल.

मुंबईतल्या प्रसिद्ध अशा जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट या संस्थेत बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स म्हणजे अप्लाईड आर्ट या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला एका राजकीय पार्श्वभूमी लाभलेल्या विद्यार्थ्यांने प्रवेश घेतला होता. 

आता जुन्या काळात कॉलेजमध्ये नव्या मुलांचं रॅगिंग करण्याची प्रथा होती. आजच्या प्रमाणे काही तो गुन्हा नव्हताच. प्रथेप्रमाणे वरच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी त्या मुलाची त्याच जागी रॅगिंग घ्यायला सुरुवात केली. एकदा काही मुलांनी त्याला धक्काबुक्की सुद्धा केली. पण तो मुलगा चुपचाप राहिला.

पण त्याच्यासाठी जीव ओवाळून टाकणाऱ्या त्याच्या काकांना ह्या प्रकाराने संताप आला. हा प्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या मुलाच्या काकांनी अत्यंत संतापून बोलवून घेतलं. ती अपराधी मुल त्यांच्या बंगल्यावर गेली. स्वतःच्या पुतण्याच्या उपस्थितीत त्या काकांनी त्या मुलांना शिक्षा केली आणि चांगलेच खडसावले. 

हे खडसावणारे काका दुसरे तिसरे कोणी नाही तर खुद्द शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे होते. आणि त्यांचे पुतणे म्हणजे कॉलेजमध्ये शिकणारे राज ठाकरे होते. 

आता हा किस्सा वाचून तुम्ही म्हणाल की हा किस्सा राज ठाकरेंचाच असेल अस वाटत नाही. इतके आक्रमक असणारे राज ठाकरे दुसऱ्या मुलांच रॅगिंग कस सहन करतील. 

तर अहो राज ठाकरे अत्यंत खोडील स्वभावाचे होते. राज हे दादरच्या बालमोहन विद्यामंदिरचे विद्यार्थी. त्यांचे कुटुंब दादर मध्ये राहत होते. परंतु तरीही राज अनेकदा आपल्या काकांच्या मातोश्री, कलानगर वांद्रे पूर्व येथील बंगल्यात मुक्कामाला असत.  

शाळेच्या दिवसात राज कलानगर वांद्रे येथून शाळेपर्यंत प्रवास करीत. त्यांची आई त्यांचा डबा दुपारी थेट शाळेतच पाठवून देई. दादरच्या आपल्या घरी ते शनिवार रविवारी जात असत. राज यांनी आपल्या काकांच्या लकबी आत्मसात केल्या. त्यांची ही वैशिष्ट्ये त्यांनी पुढे राजकारणात प्रवेश केला. राज हे अत्यंत खोडकर होते. लोकांच्या नकला करण्याची आणि वात्रटपणाची त्यांना जात्याच आवड होती. 

उद्धव आणि राज ठाकरे या दोघांच्याही आतेबहीण म्हणजे संजीवनी करंदीकर यांच्या कन्या सांगतात की,  

राज यांनी लहानपणी एखादी खोडी केली नाही किंवा कोणाला तरी छेडून सतावलं नाही असा एकही दिवस गेला नाही. पण राजचे वर्गमित्र असलेल्या दोघा जणांचे म्हणण मात्र अस आहे की शाळेमध्ये राज ठाकरे काहीसे लाजरेबुजरे होते. आज राज यांच्या सभांना प्रचंड गर्दी होते ती त्यांच्या आक्रमक वकृत्व शैलीमुळे. परंतु शाळेमध्ये त्यांनी एखाद्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला किंवा वर्गात ते काही विशेष बोलले आहेत असं त्यांच्या मित्रांना तरी आठवत नाही. 

बाळासाहेब आणि त्यांचा पुतण्या राज ठाकरे यांचं नातं नेमकं कसं होतं त्याचा हा प्रसंग. बाळ ठाकरे यांचा राज यांच्यावर अतोनात जीव  होता. आणि आज तुम्हाआम्हाला आक्रमक दिसणारे राज ठाकरे स्वभावाने लाजरेबुजरेच होते. 

संदर्भ – ठाकरे विरुद्ध ठाकरे – धवल कुलकर्णी 

हे हि वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.