‘मैं मर नहीं रहा हूं, बल्की आजाद भारत में पुनर्जन्म लेने जा रहा हू’ म्हणत फाशीवर गेले…

काकोरी कांडातील मुख्य क्रांतिकारक राजेंद्रनाथ लाहिरी

स्वातंत्र्यलढ्यातील एक भक्कम क्रांतिकारी फळीतले राजेंद्रनाथ लाहिरी हे महत्वाचे नायक होते. देशप्रेमाचं वेड हे किती उच्चकोटीचं असू शकतं याचा प्रत्यय राजेंद्रनाथ लाहिरी यांच्या आयुष्याकडे बघून येतो. अगदी शेवटच्या क्षणी जेव्हा त्यांना फाशी देण्यासाठी घेऊन गेले होते तेव्हाची हि ऐतिहासिक घटना.

वयाच्या आठव्या वर्षापासूनच देशभक्तीचं बाळकडू राजेंद्रनाथ लाहिरी यांना मिळालं होतं. लहान वयात काशी मध्ये आपल्या मामाकडे शिकायला गेलेल्या राजेंद्रनाथ लाहिरी यांना तिथे सचिंद्रनाथ संन्याल यांचा सहवास लाभला आणि तिथे त्यांना देशभक्तीचे धडे मिळू लागले. पुढे हिंदुस्थान सोशालिस्ट रिव्होल्यूशन आर्मी ठिकठिकाणी स्थापन झाली. त्यात वाराणसी शहरात या आर्मीचं नेतृत्व करण्याची जबाबदारी राजेंद्रनाथ लाहिरी यांच्या खांद्यावर होती. 

१९२५ साली क्रांतिकारी मिशनसाठी क्रांतीकारकांना पैशांची चणचण भासू लागली. राजेंद्रनाथ लाहिरी, रामप्रसाद बिस्मिल आणि चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी मिशनसाठी सरकारी खजिना लुटायचं ठरवलं. या हल्ल्याची सगळी जबाबदारी राजेंद्रनाथ लाहिरी यांच्यावर होती.

राजेंद्रनाथ लाहिरी ९ ऑगस्ट १९२५ रोजी काकोरी रेलवे स्टेशनवरून सुटलेली सहारनपूर-लखनऊ पॅसेंजर ट्रेनची चेन ओढून रेल्वे थांबवली आणि रामप्रसाद बिस्मिल, अश्फाकउल्ला खान, चंद्रशेखर आझाद आणि इतर सहा जणांनी मिळून तो सरकारी खजिना लुटला. या घटनेने इंग्रजांच्या पायाखालची जमीन सरकली. ब्रिटीशानी या सगळ्या क्रांतीकारकांना पकडण्याचा आदेश दिला.

इंग्रजांनी सरकारविरोधी कारवाई आणि खजिना लूट प्रकरणी ४० क्रांतिकारकांवर आरोप लावले. पैकी राजेंद्रनाथ लाहिरी, रामप्रसाद बिस्मिल आणि अश्फाकउल्ला खान यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. राजेंद्रनाथ लाहिरी हे इतरांपेक्षा जास्त धोकादायक असल्याने १९ डिसेम्बर १९२७ रोजी त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली खरी पण लोकांमध्ये तोवर राजेंद्रनाथ लाहिरी हे जननायक म्हणून प्रसिद्ध झाले होते. लोकं या शिक्षेमुळे इंग्रजाविरुद्ध पेटून उठले होते. 

१९ डिसेंबर १९२७ ऐवजी राजेंद्रनाथ लाहिरी यांना दोन दिवस अगोदरच म्हणजे १७ डिसेंबरला फाशी देण्यात आली. गोंडा जिल्ह्यातील जेलमध्ये त्यांना फाशी देण्यात आली. हा दिवस अत्यंत यादगार बनला. ज्या दिवशी फाशी द्यायची त्या दिवशी राजेंद्रनाथ लाहिरी लवकर उठले. त्यांनी अंघोळ केली आणि कारागृहातल्या देवापुढे जाऊन पूजा करू लागले. एक जेलर त्यांचा हा दिनक्रम बघत बसला होता.

मग राजेंद्रनाथ लाहिरी व्यायाम करायला गेले, तिथेही तो जेलर त्यांना पाहत होताच. व्यायाम करत असताना तो जेलर राजेंद्रनाथ लाहिरी यांच्याजवळ गेला आणि म्हणाला कि,

आता तर तुम्हाला फाशीची शिक्षा झाली आहे मग व्यायाम करून काय फायदा ?

तेव्हा बाणेदारपणे राजेंद्रनाथ लाहिरींनी त्या जेलरला उत्तर दिले कि,

जेलर साहेब मी एक हिंदू आहे आणि पुनर्जन्मावर माझा विश्वास आहे.

त्यामुळे पुढच्या जन्मी मी सुदृढ शरीराने जन्म घेऊ इच्छितो जेणेकरून माझ्या हातून अपूर्ण राहिलेलं काम मी पूर्ण करू शकेल.

म्हणून मी रोज सकाळी व्यायाम करतो. आज माझ्या जीवनातला हा गौरवशाली दिवस आहे मग मी हा क्रम कसा मोडू ?

त्यावेळी जेलरला राजेंद्रनाथ लाहिरी यांनी एक संदेश दिला होता जो पुढे जिथे फाशी दिली गेली तिथे कोरण्यात आला त्यावर लिहिलेलं होतं

‘मैं मर नहीं रहा हूं, बल्की आजाद भारत में पुनर्जन्म लेने जा रहा हू’

उत्तर प्रदेशात राजेंद्रनाथ लाहिरी यांच्या स्मरणार्थ १७ डिसेंबर हा दिवस मानाचा मानला जातो. स्वातंत्र्यलढ्यात बजावलेली आक्रमक भूमिका आणि आपल्या आयुष्यात जे ध्येय पूर्ण करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं ते त्याची पूर्ण केलं. स्वातंत्र्य संग्रामात राजेंद्रनाथ लाहिरी हे नाव कायमचं कोरलं गेलं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.