जेलमधून पळून जाण्याची संधी होती तरी देखील बिस्मिल हसत हसत फासावर चढले
भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात क्रांतिकारकांनी आक्रमक धोरण स्वीकारून ब्रिटिशांना मुळासकट उखडून फेकून देण्याचा खाक्या आजमावला होता. आपल्याच देशात आपण गुलाम म्हणून जगणे हे लाचार आणि भ्याडपणाचं लक्षण मानून क्रांतिकारकांनी ब्रिटिशांवर हल्ले करून स्वातंत्र्य मिळवण्याचं बिगुल वाजवलं होतं. आजचा किस्सा एका अशा क्रांतिकारचा ज्याने ब्रिटिशांची झोप उडवली होती.
सरफरोशी कि तमन्ना अब हमारे दिल में हें म्हणत जनमानसात देशभक्तीबद्दलचा जागर निर्माण करणारे क्रांतिकारक, कवी साहित्यिक रामप्रसाद बिस्मिल. रामप्रसाद बिस्मिल यांना प्रामुख्याने ओळखलं जातं ते काकोरी कटामुळे. उत्तर भारतात जी क्रांतिकारक बनण्याची लाट सुरु झाली ती रामप्रसाद बिस्मिल यांच्यामुळे.
उत्तर भारतात तीव्रतेने ब्रिटिशांविरुद्ध लोकांना लढण्यासाठी प्रवृत्त करणारे रामप्रसाद बिस्मिल हे एक उत्तम कवी होते. आपल्या कवितेतून एकता आणि समानता , देशभक्ती या प्रमुख गोष्टींवर भर देत त्यांनी लोकांमध्ये जागृती निर्माण केली. रामप्रसाद बिस्मिल यांचं धोरण असायचं कि एखाद काम हातात घेतलं कि ते तडीस न्यायचंच न्यायचं. इथूनच सुरु झाला तो काकोरी कटाचा बेत.
९ ऑगस्ट १९२५ रोजी लखनौमधील काकोरी येथे रामप्रसाद बिस्मिल यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे थांबवून सरकारी तिजोरी लुटली. या लुटीच्या पैशातून जर्मनीमधून शस्त्र विकत घेता येणार होते. पण या कटाच्या काही दिवसांनंतर यात सामील असलेले क्रांतिकारक जेरबंद केले गेले. रामप्रसाद बिस्मिल यांच्यासोबत आणखी दहा जणांना अटक करण्यात आली.
रामप्रसाद बिस्मिल यांनी त्यांच्या आत्मकथेमध्ये अटक केल्यानंतरचा किस्सा लिहिला आहे कि, ज्यावेळी त्यांना पोलिसांनी जेलमध्ये टाकलं त्यावेळी हातामध्ये बेड्या न अडकवता पोलिसांनी त्यांना जेलमध्ये ठेवलं. रात्र झाली. पोलीस झोपलेले होते. जेलच्या बाहेर फक्त एक मुन्शी बसलेले होते. हा रामप्रसाद बिस्मिल यांना पळून जाण्यासाठी उत्तम मार्ग होता. तो मुन्शी क्रांतिकारक रोशनलाल यांचा नातेवाईक होता.
बिस्मिल यांनी मुन्शीला बोलावलं आणि सांगितलं कि
मी इथून पळून जाण्याचा विचार करत आहे, पण मी जर पळून गेलो तर तुमच्या जीवाला धोका निर्माण होईल, नोकरी जाईल, बऱ्याच अडचणी येतील, बघा इतका त्रास सहन करण्यासाठी तयार असाल तर मला पळून जाता येईल.
पण मुन्शीने सांगितलं कि जर तू पळून गेलास तर माझा परिवार उपाशी मरेल, माझा जीव ब्रिटिश लोकं घेतील. त्यामुळे बिस्मिल काहीही न बोलता रात्रभर बसून राहिले.
पुढे फाशीच्या शिक्षेसाठी त्यांना दुसऱ्या तुरुंगात नेण्यात आलं तिथेही त्यांना पळून जायची संधी होती मात्र तिथेही त्यांनी नकार दिला आणि तुरुंगात बसून राहिले. शेवटी फाशीची शिक्षा त्यांना देण्यात आली. फासावर जाताना त्यांनी म्हटलेले अखेरचे शब्द ऐकून ब्रिटिश अधिकारी सुद्धा थरकापले होते,
मालिक तेरी रज़ा रहे और तू ही तू रहे, बाकी न मैं रहूँ न मेरी आरजू रहे; जब तक कि तन में जान रगों में लहू रहे, तेरा ही जिक्र और तेरी जुस्तजू रहे!’
तुरुंगात असताना कविता आणि अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. धार्मिक भेदाभेद, जातीवाद, हिंदू मुस्लिम एकता अशा अनेक गोष्टींवर त्यांनी भरपूर लेखन केलं.
त्यांच्या साहित्यातील काही महत्वाच्या ओळी-
भारताची येणारी पिढी हि शिक्षित पिढी असायला हवी जी गरीब आणि शेतकरी लोकांना त्यांच्या गावात जाऊन त्यांची परिस्थिती बदलेल आणि त्यांना व्यापारी दृष्टी देईल.
ज्या देशामध्ये करोडो लोकं अस्पृश्य ठरवले जातात त्या देशाचा स्वातंत्र्य मिळवूनही काही फायदा नाही.
हिंदू मुस्लिम एकता हीच आपल्या लोकांची अंतिम इच्छा आहे, भलेही ती कितीही मुश्किलीने मिळो.
तरुण लोकांमध्ये क्रांतीचा पाया त्यांनी घातला. आपल्या साहित्यामधून जनजागृती करून लोकांना देश आणि स्वातंत्र्य यांचं महत्व पटवून दिलं. कोर्टात ज्यावेळी त्यांना हजर केलं गेलं तेव्हा त्यांच्या इंग्रजी भाषेच्या प्रभुत्वावर खुश होऊन न्यायाधीशाने विचारलं कि कायद्याची डिग्री तुम्ही कुठून मिळवली ?त्यावर रामप्रसाद बिस्मिल म्हणाले कि, किंगमेकर लोकांना डिग्रीची गरज नसते.
बंदुकीच्या प्रेमापोटी क्रांतिकारक बनण्याचा रोमँटिसिझम तरुणांनी बाळगू नये. शेतकऱ्यांवर आणि गरीब लोकांवर भांडवलदार आणि श्रीमंत वर्ग जो जुलूम करतो तो रोखण्यासाठी आणि सगळ्यांना समान वागणूक मिळण्यासाठी बंदूक वापरावी.
रामप्रसाद बिस्मिल यांच्या कविताही भरपूर गाजल्या.
मीट गया जब मरने वाला
फिर सलाम आया तो क्या,
दिल कि बर्बादी के बाद
उनका पयाम आया तो क्या…….!
लेखणी आणि क्रांती या दोन गोष्टींची योग्य सांगड घालून देशभक्तीचं आदर्श उदाहरण रामप्रसाद बिस्मिल यांनी दाखवून दिलं होतं.
हे हि वाच भिडू :
- फाशी जाताना रामप्रसाद बिस्मिल म्हणाले, मरणाचं दुख: नाही आईपासून दुरावण्याचं दुख: आहे.
- आझाद यांच्या आईला शेणकूट विकायची वेळ आलेली, मराठी क्रांतिकारकाने त्यांचा सांभाळ केला
- असा होता थरार, साडेपाच लाखांच्या खजिना लुटीचा..
- स्वत:च नाव आझाद, वडिलांच नाव स्वतंत्र आणि पत्ता जेल सांगणाऱ्या, आझादांची शौर्यकथा.