राजीव गांधींच्या वादाशिवाय पण ‘आयएनएस विराट’ची अशी स्वतंत्र ओळख आहे…

आयएनएस विराट. भारताची विमानवाहू युद्ध नौका. १९८७ पासून भारताच्या ताफ़्यात होती.  जवळपास ३० वर्ष देशाची सेवा केल्यानंतर २०१७ मध्ये निवृत्त करण्यात आले. मात्र निवृत्तीनंतर देखील ही युद्धनौका चर्चेत आहे. सध्या ती भंगारात काढायची की युद्धस्मारकात रूपांतर करायचं यावरचा वाद न्यायालयात चालू आहे.

शिवसेनेन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून युद्धस्मारकात रूपांतर करण्यासाठी मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे.

पण या वादासोबतच आयएनएस ‘विराट’ला आणखी एका वादाची किनार आहे.

या वादाचा संबंध आहे तो थेट राजीव गांधी यांच्या खाजगी आयुष्यासोबत.

२०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिल्लीच्या रामलीला मैदानावरून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर टीका केली, ही टीका काहीशी खाजगी स्वरूपाची होती, पण देशाच्या संरक्षण मंत्रालयाशी जोडलेली होती.

मोदी म्हणाले की,

मित्रांनो, कधी तुम्ही ऐकले आहे का, की कोणी व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत सुट्टीला जाताना कोण्या युद्धनौकेला घेऊन गेला आहे? या प्रश्नावर आश्चर्य वाटण्याची गरज नाही, आपल्या देशात असे झाले होते. 

काँग्रेसच्या मोठ्या नामदार व्यक्तीने देशाची शान असलेल्या आयएनएस विराटचा एका खाजगी टॅक्सी सारखा वापर केला होता.

मोदींच्या या वाक्यानंतर बराच वादंग झाला.

त्यांनी इंडिया टुडेच्या एका रिपोर्टचा संदर्भ देत ही टीका केली होती. यानंतर इंडिया टुडेने ‘माहितीच्या अधिकारांतर्गत संरक्षण मंत्रालयात अर्ज केला. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या उत्तरात हि गोष्ट स्पष्ट झाली की, राजीव गांधी यांनी आयएनएस विराटचा वापर खाजगी टॅक्सी सारखा केला नव्हता.

निवृत्त प्रशासकीय अधिकारी हबीबुल्लाह तेव्हा म्हंटले होते,

राजीव गांधी आणि सोनिया गांधी एका सरकारी हेलिकॉप्टरमधून लक्षद्वीप मध्ये उतरले होते. आयएनएस विराट पंतप्रधानांच्या बॅकअप सुरक्षेसाठी समुद्रामध्ये तैनात होते. त्यांना बॅकअप सुरक्षेची गरज होती. समुद्रामध्ये या युध्यनौकेशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. 

पण आयएनएस विराटने केवळ पंतप्रधानांना सुरक्षा देण्याचं काम केले नव्हते.

असा आहे आयएनएस विराटचा इतिहास….

आयएनएस विराटला बनवण्याची प्रक्रिया १९४४ मध्येच सुरु झाली होती. हि युद्धनौका जगातील सगळ्यात जुन्या युद्धवाहू नौकेपैकी एक आहे. त्यामुळेच याला ‘ग्रैंड ओल्ड लेडी’ असं देखील म्हंटल जात. हे युद्धनौका तेव्हा ब्रिटिश नौसेनाच हिस्सा होती. तेव्हा तिचे नाव एचएमएस हमरीज असं होत.

तिथे जवळपास २५ वर्ष सेवा दिल्यानंतर ही युद्धनौका भारताने घेतली.

भारतीय नौसेनेने या जहाजेला १२ मे १९८४ मध्ये आपल्या ताफ्यात सामावून घेतले. 

‘जलमेव यस्य, बलमेव तस्य’ हे ब्रीदवाक्य घेऊनं मिरवणाऱ्या विराटवर एकेकाळी १८ सी हॅरिअर विमाने व काही चेतक हेलिकॉप्टर्स होती. तर एकाच वेळी ११०० नौसैनिक तैनात ठेवण्याची सोय देखील या युद्धनौकेमध्ये होती.

युद्धकालीन आणि शांतताकालीन मोहिमांमध्ये विराटने अतुलनीय कामगिरी बजावली. १९८९ साली श्रीलंकेमध्ये भारतीय शांतीसेनेच्या ऑपरेशन ज्युपीटरमध्ये विराट सहभागी होती. शेकडो हेलिकॉप्टर फेऱ्या करून अनेकांना वाचवण्यात विराटने सिंहाचा वाटा उचलला होता. 

कारगिल युद्धावेळी पाकिस्तानच्या कराची बंदरातून युद्धनौका बाहेर पडू नये यासाठी शत्रूवर पहारा ठेवण्याची कामगिरी या जहाजाने केली होती.

संसदेवरील अतिरेकी हल्ल्यानंतर २००१ मध्ये ऑपरेशन पराक्रममध्ये भारतीय संरक्षण यंत्रणांनी पाकिस्तानला आपली ताकद दाखवून दिली होती. त्या वेळी पश्चिम नौदल ताफ्याचे नेतृत्व करताना विराटने अनेक महिने पूर्ण तयारीत सज्ज राहून आपली भूमिका चोख बजावली होती. 

जवळपास ६ दशकांपेक्षा जास्त वेळ समुद्रामध्ये घालवत ‘आयएनएस विराट’ने जगाच्या २७ परिक्रमा पूर्ण केल्या आहेत. यात एकूण १ लाख ९४ हजार २१५ किलोमीटरचा समुद्री प्रवास पूर्ण केला आहे. तर लढाऊ विमानांनी २२ हजार ६२२ तासांचे उड्डाण पूर्ण केले आहे. इतका काळ सेवा बाजवलेले हे एकमेव जहाज होते.

कदाचित त्यामुळेच या युद्धनौकेचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये समाविष्ट झाले आहे.

२०१७ मध्ये या नौकेला भारतीय नौसेनेने निरोप दिला, आणि विराटला निवृत्त करण्यात आले. तेव्हा पासून या नौकेचे युद्ध स्मारकात रूपांतर करण्यासाठी प्रयत्न चालू होते, निवृत्तीपूर्वीच २०१५ मध्ये आंध्रप्रदेश सरकारने तयारी दाखवली होती. पण नंतर नकार दिला

त्यानंतर सरकारने आयएनएस विराटला भंगारात काढण्यासाठी निविदा काढल्या. यात अलंगमधील श्रीराम ग्रुप ने ३८ कोटी रुपयांना हि विकत घेतली. मात्र ३ महिन्यांपूर्वी याचे युद्धस्मारकात रूपांतर करावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

त्यावर संरक्षण मंत्रालयाच्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्राची गरज आहे.  आता अलीकडेचं शिवसेनेने यासाठी पुढाकार घेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांना पत्र लिहित मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.