बडे भैयाचा रोल करणारा हा नट आयुष्याच्या इंटर्वलमधून अचानक गायबच झालाय.

ऐंशीच्या दशकाचा उत्तरार्ध. अमिताभ धर्मेंद्र ही सुपरस्टार मंडळी म्हातारी झालेली पण अजून त्यांच्यातील मारधाड पिक्चर बनवण्याची उर्मी कमी होत नव्हती. ऋषी कपूर ढेरी झाकणारे स्वेटर घालून झाडामागे पळत होता. अनिल कपूर,गोविंदा,मिथुन,जग्गू दादा संजू बाबा, सनी हे लोक हिरोगिरी करत होते. हिरोइन्स तर बिचाऱ्या गाण्यात नाचण्यापुरत्या उरल्या होत्या. प्रेम चोप्रा, अमरीश पुरी, रणजीत वगैरे आपल्या खलनायकीत खूष होते.

अशात काही लोक मात्र एका विशिष्ट साच्यातला रोल करण्यासाठी फेमस होते. म्हणजे पोलीस, जज, हिरोचे मित्र, हिरोचे भाऊ-बहिण, वगैरे वगैरे. यात एक चेहरा हमखास दिसायचा. राज किरण !!

आता आपल्याला नाव आठवणार नाही पण फोटो बघितल्यावर नक्की आठवेल. गोल गोरा चेहरा, छोटीशी मिशी, एकदम सोफेस्टीकेटेड म्हणतात तसा चेहरा. ड्युप्लीकेट प्रशांत दामले म्हटल तरी चुकीच ठरणार नाही.

हा असायचा हिरोचा मोठा भाऊ. नाव बऱ्याचदा रवी, विकी किंवा अजय. आईवडील गोरगरीब ( कम्पल्सरी). हा असायचा अभ्यासात हुशार.  मग फक्त एकाच मुलाला शाळेत पाठवल जायचं. दुसरा मुलगा उर्फ आपला हिरो भावाला वह्या पुस्तके मिळावी म्हणून हमाली करायचा वगैरे वगैरे. हा राजकिरण मोठा झाल्यावर नोकरीला लागायचा, पण मग कहाणी मध्ये ट्विस्ट. नोकरीला लागल्यावर मोठ्या घरातील मुलीशी लग्न करणे, आई वडिलाना विसरणे, त्यांना भेटल्यावर नोकराची वागणूक देणे वगैरे वळणे घेऊन शेवटी पश्चाताप.

राजकिरणच्या बहुतांश सिनेमात त्याचा हिरोचा भाऊ पार्टटाईम व्हिलन हाच रोल असेल.

कधी कधी आई वडिलांच्या ऐवजी बायकोला हुंड्यासाठी छळणे वगैरे जरा वैविध्य असणारे रोल त्याच्या वाट्याला आले. पण शेवटी सगळ गोड करणार हिरोच्या उपदेशाच भाषण कधी चुकलं नाही.

त्याच पूर्ण नाव राज किरण महतानी. हिरो व्हायचं म्हणून फिल्म इंडस्ट्रीमध्ये आला.

पण सुरवातच्या काळातल्या सुपरफ्लॉपमुळे गाडी गपगुमान सहायक भुमिकेकडे वळली. कर्झ, अर्थ, बसेरा अशा काही भारी सिनेमात काम केल्यावर मात्र त्याची गाडी रूळावर आली. पण असे सिनेमे काही पैसे मिळवून देणारे नव्हते. मग त्याने गाडी वळवली कौटुंबिक सिनेमाकडे.

प्यार का मंदिर, प्यार का देवता, घर एक मन्दिर, घर हो तो ऐसा अशा सिनेमांची त्याने रांगच लावली. एक मात्र मानलं पाहिजे की तो त्यात शोभत देखील होता.

नाही म्हणायला एक नया रिश्ता या सिनेमात त्याने रेखा बरोबर रोमान्स केलाय. ही त्याच्यासाठी अचिव्हमेंटच मानली पाहिजे. 

पण जसं जसं नव्वदच दशक उजाडलं तस हम आपके है कौन, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे सारख्या सिनेमामुळे फिल्म इंडस्ट्री बदलू लागली होती. सिनेमातली गरिबीसुद्धा कमी झाली होती. याचाच परिणाम राजकिरणच्या टाईपचे रोल कमी झाले.

तो काही वाईट अभिनय करायचा असे नाही. त्याच्या अर्थ सिनेमातल्या तुम इतना जो मुस्कुरा रहे हो मध्ये शबाना आझमी समोर केलेल्या अभिनयाला तोड नाही. पण त्याच्या नंतरच्या काळातल्या टाईपकास्ट रोलला लोक कंटाळले होते.

त्याला हे अपयश उपेक्षा सहन झाली नाही. सतत बिझी राहून सवय असणारा राजकिरण काम नसल्यामुळे दिवसेंदिवस तो नैराश्याच्या गर्तेत जात राहिला.

अस म्हणतात की त्याच्या बायकोने या काळात त्याला हवी तशी साथ दिली नाही. याचा तर जास्तच मोठा परिणाम झाला. आधीच तंगी होती त्यात मानसोपचारतज्ज्ञांच्या फेऱ्या सुरु झाल्या.

एकटेपणाने आणि नैराश्यामुळे त्याला मुंबईत वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं.

तिथून सुटका झाल्यावर तो आपल्या भावाकडे अमेरिकेला गेला. अस म्हणतात की एकेकाळी हिंदी सिनेमात रेखा सोबत हिरोचा रोल केलेला राजकिरण न्यूयॉर्कमध्ये टक्सी चालवू लागला होता. उरलेल्या वेळेत कुरियर पोहचवणे वगैरे कामे त्याने केली. पण तिथे जास्त काळ टिकला नाही.

परत भारतात आला. पण आता काम मिळणे पूर्ण बंड झाल होतं. बेंगलोरमध्ये सत्य साईबाबाच्या आश्रमात गेला मात्र तिथेही दारू पियुन राडा केल्याने रखवालदाराने त्याला मारले व तिथून हाकलून दिले. राजकिरणचा डिव्होर्स झाला. त्याच्या भावाने त्याला परत अमेरिकेला नेले.

त्यानंतर त्याचा पत्ता कुठेच नाही. 

दुनिया फास्ट आहे. मायबाप प्रेक्षकांनी लक्षात ठेवावं एवढ काही मोठ काम त्याने केलेलं नव्हतं. सिनेमाच्या गर्दीत आपण त्याला विसरूनच गेलो. जे त्याला ओळखायचे त्यांची समजूत झाली की त्याच निधनच झालंय. इतकी वर्ष गायब राहिल्यावर कोणी ना कोणी आठवण काढणे साहजिकच आहे. अभिनेत्री दीप्ती नवल यांनी एकदा फेसबुकवर पोस्ट टाकली की

आमचा मित्र हरवलाय. कोणाला काहीही माहिती असेल तर त्यांनी आम्हाला कळवावी.

यानंतर शोध सुरु झाला. सगळ्या इंटरनेटवर त्याची चर्चा झाली. तो सिनेमात यशाच्या शिखरावर असताना पण जेवढी चर्चा झाली नसेल तेवढी तेव्हा झाली. अखेर ऋषी कपूर यांनी माहिती दिली की राजकिरणच्या भावाशी संपर्क झालाय आणि त्याने कळवलंय की राज किरण जिवंत आहेत आणि अटलांटाच्या एका वेड्याच्या इस्पितळात आहेत.

राज किरणचा आज वाढदिवस. प्रचंड गुणवत्ता असून तो भावाच्या भुमिकेमुळे  वाया गेला.

कोणाला सांगून पटणार नाही पण त्याने १००च्यावर सिनेमात काम केलंय. आज तो ७१ वर्षांचा झाला. भावाच्या भूमिकेतून वडिलांच्या भूमिकेत त्याच प्रमोशन झालं असत.

ऐंशीच्या दशकातल्या सिनेमात बऱ्याचदा स्क्रिप्ट कन्टीन्युटी नसायची. अचानक एखाद कॅरेक्टर मधूनच गायब व्हायचं आणि अचानक शेवटी परत अवतरायचं. तसच राजकिरणच्या बाबतीतही व्हावं. इंटर्वलमध्ये गायब झालेला तो एंड क्रेडीटवेळी खणखणीत बरा होऊन परत यावा, नेहमी प्रमाणे हिरोच्या उपदेशाच्या शिव्या खाव्या पण सगळ गोड व्हाव अशीच प्रार्थना.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. संतोष says

    राजकिरण खरोखर चांगले अभिनेते होते. ८० च्या दशकात उत्तरार्धात एकूणच सिनेइंडस्ट़री बॅडपॅच मधून जात होती. राजकिरण यांनी कर्ज, वारीस, तेरी मेहरबानियाँ या सिनेमात छोट्या पण लक्षणीय भूमिका साकारल्या. त्यांचा एक चित्रपट होता ‘हिप हिप हुर्रे’ ज्यात त्यांनी फूटबॉल कोचची भूमिका केली होती. त्यात खेळाडूंचे मनोधैर्य वाढवून त्यांना सामना जिंकून देतात, अशी कथा होती. नेहमीच्या देमार चित्रपटांपेक्षा तो नक्कीच लक्षात राहिला.

Leave A Reply

Your email address will not be published.