जग्गू दादाला घडवणारा भिडू !!

तीनबत्तीका जग्गू दादा. जयकिशन काकुभाई श्रॉफ नावाचा हा मुंबईच्या चाळीत वन रूम किचनमध्ये राहणाऱ्या गुज्जू कुटुंबातला हा मुलगा. प्रत्येक आईवडिलांप्रमाणे त्याच्या आईवडिलाना आपलं पोरग स्टार आहे हे वाटायचं. त्याचे वडील धीरूभाई अंबानीचे ज्योतिषी होते.

त्यांनी भविष्यवाणी केली होती पुढ जाऊन हा स्टार होणार.

गरिबीमध्ये सुद्धा त्याला लाडात वाढवला. इकडे तिकडे उनाडक्या करणे, मुलांची गँग करून टपोरीगिरी करणे हेच त्याचे उद्योग होते. मुंबईच्या त्या छोट्या गल्ल्यांमध्ये जग्गुदादा म्हणून तो फेमस झाला. तोपर्यंत त्याला नोकरी पैसा वगैरे महत्वाच वाटायचं नाही.

“आपुन की मां ने आपुनको किसीके हात के नीचे काम करने के लिये नही पैदा किया.”

याच काळात त्याच्या आयुष्यात एक मुलगी आली तीच नाव आयेशा दत्त. हिच्यासोबत लग्न करायचं तर आयुष्याला स्थैर्य हवं , पुढे होणाऱ्या मुलाबाळांसाठी संसारासाठी कमवलं पाहिजे. तेव्हा त्याला आयुष्यात पैशाचं महत्व कळाल. तो नोकरीच्या शोधात बाहेर पडला.

अनेक ठिकाणी शिक्षण नाही म्हणून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. एका ट्रॅव्हल एजन्सी मध्ये त्याला नोकरी मिळाली.

एकदा कामावर जाण्यासाठी तो बस स्टॉप वर उभा होता. भिडू नुसता उभा जरी राहिला तरी देव आनंद स्टाईलमध्ये उभा राहायचा. तिथे त्याची स्टाईल एका जाहिरात एजन्सी मध्ये काम करणाऱ्या अकौंटंटला आवडली. त्याने  त्याला मॉडेल होणार का विचारलं. जॅकी म्हणाला, क्यों नही भिडू?

त्याच दिवशी त्याचं आयुष्य बदलल होत.

दुसऱ्या दिवशी एका सूटच्या जाहिरातीसाठी त्याचं फोटोशुट झालं. मुंबईमध्ये ठिकठिकाणी त्याचे मोठे मोठे होर्डिंग्ज लागले. मॉडेल म्हणून जॅकीच करीयर सेट झालेलं. मग कोणीतरी त्याला सांगितलं की आशा चंद्राच्या अक्टिंग क्लासला जा. तिथ त्याची ओळख सुनील आनंदबरोबर झाली. झाली म्हणजे काय आपल्या भिडूने जाऊन मुद्दाम ओळख करून घेतली.

सुनील आनंद म्हणजे देवोंके देव महान सुपरस्टार देव आनंद यांचे चिरंजीव.

आपला भिडू जग्गू दादा म्हणजे देव आनंद यांचा खूप मोठा फॅन होता. त्याच्या कपड्याच्या स्टाईलपासून उभे राहण्याच्या स्टाईलपर्यंत सगळ्यात देवसाबची नक्कल असायची. जॅकीला आयुष्यात त्यांना एकदा तरी भेटायचं होतं. सुनील आनंद ला हा भिडू आवडला त्याने आपल्या वडिलाकडे नेल.

देव आनंदच्या ऑफिसमध्ये जग्गूने पाऊल टाकला आणि देव साबनी डोळे बारीक केलं, दोन वेळा मान इकडे तिकडे केली, हाताला झटका देत उद्गारले,

“सुबह सुबह तुम्हारी तस्वीर देखी शाम को तुम मेरे सामने खडे हो. अजीब इत्तेफाक है. तुम्हे तो मै एक रोल जरूर दुंगा !!”

जग्गू दादाच्या पुंगळ्या टाईट झाल्या. आपल्या देवाच फक्त दर्शन घ्यायचं म्हणून आलेल्या भक्ताला थेट 12 वर्षाच्या तपश्चर्येच फळ एका दर्शनात मिळाल होतं. देव साबनी त्याच दिवशी जॅकीचे ते होर्डिंग बघितले होते आणि तो त्यांच्या लक्षात राहिलेला. सगळे योगायोग जुळून आलेले. त्यांच्या पुढच्या सिनेमामध्ये दोन नंबरच्या हिरोचा रोल जग्गू दादा ला देण्यात आला. (प्रत्येक पिक्चर मध्ये हिरो देवसाब स्वतःच असायचे, बाकी सगळे साईड हिरो )

जग्गू दादा तेवढ्यात खुश झाला. गडबडीत जाऊन सगळ्यात पहिल्यांदा आईला फोन लावला. चाळीत परत गेला तर एकदम जल्लोषात स्वागत झालं. सगळीकडे मिठाई वाटली जात होती.

 “अपना जग्गूदादा हिरो बन गया”

पण पिक्चर अभी बाकी था मेरे दोस्त.

परत १५ दिवसांनी देव आनंदच्या ऑफिस मधून फोन आला. जग्गूचा रोल ऐनवेळी मिथुनदा कडे गेला होता. देवसाबनी त्याला बदली दुसरा एक रोल दिला. सेकंडरी व्हिलनचा. ऐकताना बर वाटलं सेकंड लीड हिरो चा सेकंड लीड व्हिलन. पण खर बघायला गेल तर तो व्हिलनचा चमच्याचा फुटकळ रोल होता.

आपल्या भिडूची आयुष्यातली सगळ्यात मोठी संधी गेली होती. पण गडी मोठा जिद्दी होता. देव आनंदबरोबर काम करायची संधी तसही तो सोडणार नव्हता. त्याने चमचाचा रोल स्वीकारला. 

व्हिलन होता शक्ती कपूर. आपल्या भिडूला पूर्ण पिक्चरभर त्याच्या मागे उभे राहायचं काम होतं. त्याने अक्शन केली की मारामारी करायची, कधी मिथुन दा कडून मार खायचं एवढच काम. शक्ती कपूरने देखील जेव्हा आपल्या या चमच्या कडे बघितल तेव्हा त्याला स्वतःला सुद्धा लाज वाटली. एवढा देखणा माणूस आपल्या हाताखालचा सेकंडरी व्हिलन. त्याने देखील जग्गुच सांत्वन वगैरे केलं.

एक गोष्ट खरी होती की जॅकीला तेव्हा अक्टिंगची एबीसीडी सुद्धा येत नव्हती. जेवढ सांगण्यात आलंय तेवढ करायचं हे तत्व त्याने पाळलेल. पण तरी चुका होतच असायच्या. 

एकदा एक अक्शन डायरेक्टर त्याच्यावर खूप भडकला. साधी साधी गोष्ट कळत नाही म्हणून थेट त्याला अस्सल पंजाबीमध्ये शिव्या देऊ लागला. जरी बाहेर मुंबईचा दादा असला तरी सेटवर जग्गू एकदम सज्जन होता. त्याने खाली मान घालून त्या शिव्या ऐकल्या. त्याकाळी चूक झाली तर अक्शन डायरेक्टरनी आईबहीन काढणे नॉर्मल होतं आणि त्यात जग्गूने खूप मोठी चूक केलेली.

हे सगळ शिव्या प्रकरण चाललेलं. तेव्हा तिकडे दूर देव साब कमेऱ्यामागे बसले होते.त्यांनी तिकडूनच जोरात हाक दिली,

“TAKE  IT EASY TAKE IT EASY नया लडका है. धीरे धीरे सिख जाएगा. “

ते शब्द जॅकीच्या कानात एखाद्या वेदमंत्रांप्रमाणे कोरले गेले. त्याच्यामनातला देव आनंद यांच्या बद्दलचा आदर आणखी वाढला. आपल्या अभिनयावर मेहनत घेतली. पुढे त्याला थेट शोमन सुभाष घईच्या पिक्चरमध्ये हिरोचा रोल मिळाला, पिक्चरच नाव पण हिरोच होतं.

हिरो गाजला, पुढे जग्गू दादा सुपरस्टार झाला. 

त्याने अफाट पैसा कमावला. त्याला तर नंतर अभिनयाचे अवार्ड्स देखील मिळाले. याकाळात तो देव आनंद यांना कधी विसरला नाही. ते त्याच्या साठी पहिले आणि शेवटचे गुरु होते. त्यांनी कसलाही सिनेमा बनवला, त्यात कसलाही रोल दिला तरी जग्गू एकही शब्द न विचारता तोंडाला मेकअप लावून त्यांच्यासाठी उभा राहायचा. कोणी कधी त्याबद्दल विचारलं तर म्हणायचा,

“उस भिडूने अपुनको सब कुछ सिखाया. अपना पेट उसकी वजेह से भरता है. उसको कैसे नां केह सकता है !!”

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.