गेहलोत यांना उगाच जादूगार म्हणत नाय, डाव पलटवणं त्यांच्या डाव्या हातचा मळ आहे…
देशभर सध्या एकच मुद्दा चर्चेत आहे, तो म्हणजे राज्यसभेच्या निवडणूका. महाराष्ट्राचा निकाल लांबला खरा, मात्र इतर राज्यांमध्ये निवडणुका पार पडून विजयाचा गुलालही उधळला गेला आणि पराभवाचं खापरही फुटून झालं.
सगळ्यात जास्त चर्चा झाली ती राजस्थानमधल्या निवडणुकांची. राजस्थानमध्ये यंदा चार जागांसाठी निवडणूका झाल्या. तिथलं संख्याबळ पाहिलं, तर सत्ताधारी काँग्रेसकडे १०८ आमदार आहेत, भाजपकडे ७१ आमदार आहेत, अपक्ष आमदारांची संख्या आहे १३. छोट्या पक्षांचं संख्याबळ पाहायचं झालं, तर रालोपकडे ३, माकप आणि बीटीपीकडे प्रत्येकी २ आणि रालोदकडे १ आमदार आहे.
या समीकरणामुळं उमेदवारांना विजयी होण्यासाठी ४१ मतं गरजेची होती.
काँग्रेसच्या दोन आणि भाजपची एक जागा फिक्स मानली जात होती. त्यामुळे चुरस रंगणार होती ती चौथ्या जागेसाठी. काँग्रेसच्या उमेदवाराचा सामना करण्यासाठी भाजपनं अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांना पाठिंबा दिला.
या निवडणुकांची जबाबदारी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी स्वतःच्या शिरावर घेतली होती. काँग्रेसनं सुरुवातीलाच आपल्याकडे १२६ आमदारांचा पाठिंबा आहे, असा दावा केला होता.
या निवडणुकीत रणदीप सुरजेवाला, प्रमोद तिवारी आणि मुकुल वासनिक हे काँग्रेसचे तिन्ही उमेदवार विजयी तर ठरलेच, पण भाजप पुरस्कृत सुभाष चंद्रा यांना क्रॉस वोटिंगचा फटका बसला.
काँग्रेसच्या या विजयाचं श्रेय अशोक गेहलोत यांना गेलं, त्यांची जादू पुन्हा एकदा चालली अशी चर्चाही रंगली. त्यांनी ही जादू नेमकी कशी केली? हेच पाहुयात.
त्याआधी हे पाहायला हवं की सुभाष चंद्रा यांचा गेम कसा झाला…
भाजपचं संख्याबळ आहे ७१. त्यातली ४१ मतं घनश्याम तिवारी यांना जाणार हे तर नक्की होतं. त्यामुळं भाजपची ३० मतं, रालोपची ३ मतं अशा ३३ मतांची जुळणी सुभाष चंद्रा यांनी केली होती. त्यांना गरज होती ती ८ मतांची. दुसऱ्या बाजूला काँग्रेसकडे २६ अतिरिक्त मतं होती, त्यांना २५ मतांची जुळणी करायची होती. गेहलोत यांनी छोटे पक्ष आणि अपक्षांची मोट बांधत फिल्डिंग सेट केली.
मात्र सुभाष चंद्रा यांना पराभवाआधीच क्रॉस व्होटिंगचा धक्का बसला.
भाजप आमदार शोभारानी कुशवाह यांनी थेट काँग्रेसचे उमेदवार प्रमोद तिवारी यांना मत दिलं. तर भाजप आमदार कैलाश मीणा यांनी आपलं मत पार्टी एंजटला सोडून दुसऱ्यालाच दाखवलं. विशेष म्हणजे ही दोन्ही मतं आक्षेप घेतल्यानंतरही निवडणूक आयोगानं रद्द केली नाहीत.
चंद्रा यांना तिसरा धक्का बसला, तो भाजप आमदार सिद्धी कुमारी यांच्या रूपानं. पक्षानं मत सुभाष चंद्रा यांना द्यायचं असा आदेश दिल्यानंतरही, सिद्धी कुमारी यांनी पक्षाच्याच घनश्याम तिवारींना मत दिलं.
साहजिकच जुळणी झाली नाही आणि निवडणुकीत चुरस निर्माण करणाऱ्या सुभाष चंद्रा यांचाच गेम झाला.
या पिक्चरमध्ये गेहलोत कुठं आले, असं प्रश्न पडला असेल. तर विषय असाय की, क्रॉस व्होटिंग करणारे शोभारानी कुशवाह आणि कैलाश मीणा हे दोन्ही आमदार वसुंधराराजेंच्या गोटातले आहेत, असं सांगण्यात येतं.
वसुंधराराजे आणि भाजपमध्ये सारंकाही आलबेल नाही, अशी चर्चा सुरू होतीच. त्यात वसुंधराराजेंचे एकेकाळचे पक्षांर्तगत विरोधक असणाऱ्या घनश्याम तिवारींना उमेदवारी दिल्यानं नाराजीनाट्य स्वाभाविक होतंच. राज्यसभेच्या निवडणुकांमुळं हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय.
असंही बोललं जातंय की, विषय वसुंधरा राजेंच्या गोटातून फिरला असला, तरी सूत्र हलवण्यात आणि भाजपमधली नाराजी उघड करण्यात गेहलोत यशस्वी ठरलेत.
नाही म्हणलं, तरी ही पडद्यामागची चर्चा आहे. पण पडद्यापुढंही गेहलोत कमी ठरले नाहीत.
राज्यसभा निवडणुकांची चाहूल लागली आणि तेवढ्यात काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य रंगलं. काँग्रेसच्या काही आमदारांनी गेहलोत यांच्या कामावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. विरोधक भाजपच्या नजरेतून हे सुटणं अशक्य होतं. त्यामुळं राज्यसभा निवडणुकीत मतं फुटू न देण्याचा मोठा टास्क गेहलोत यांना पार पाडायचा होता.
चौथ्या जागेसाठी घोडेबाजाराची पूर्ण शक्यता होती. राजस्थानला रिसॉर्ट पॉलिटिक्स अजिबात नवं नाही. गेहलोत यांनी ही स्कीम पुन्हा एकदा वापरली आणि काँग्रेसचे आमदार, त्यांचे सहयोगी आमदार या सगळ्यांची रवानगी उदयपूरच्या आलिशान ताज अरावली हॉटेलमध्ये झाली.
गेहलोतांनी इथं आपल्या आमदारांना गुंतवून ठेवलं, त्यांच्यावर देखरेख ठेवली. चक्क आमदारांसाठी जादूचे प्रयोगही केले. या सगळ्याचं फळ म्हणजे चर्चा असूनही काँग्रेसचं मत काही फुटलं नाही.
आमदारांनी रिसॉर्टमध्ये जादूचे प्रयोग पाहिले असले, तरी ऐन निवडणुकीच्या दिवशी कुठलीही हातसफाई न दाखवता गेहलोत यांनी जादू केली.
सकाळी नऊच्या सुमारास मतदानाला सुरुवात झाली, तेव्हा मुख्यमंत्री गेहलोत यांनी पहिलं मत दिलं. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांनी काँग्रेसचे पोलिंग एजंट म्हणून काम पाहिलं. प्रत्येक मत मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांना दाखवून करायचं असल्यामुळं मतं फुटायचा प्रश्न नव्हताच.
त्यात गेहलोत यांनी आणखी एक खेळी केली, जे आमदार क्रॉस व्होटिंग करु शकतात अशा आमदारांना त्यांनी सर्वात आधी मतदान करायला लावलं.
बहुजन समाज पार्टीमधून काँग्रेसमध्ये आलेल्या आमदारांनाही त्यांनी मतदान करण्यासाठी प्राधान्य दिलं. जिथून पेच निर्माण होऊ शकला असता, तिथं गेहलोतांनी फिल्डिंग सेट केली आणि काँग्रेस सेफ झाली.
फक्त राज्यसभा निवडणुकीतच गेहलोतांनी जादू दाखवलीये असं नाही…
राजस्थानच्या विधानसभा निवडणुकांमध्ये तिकीट वाटप सचिन पायलट यांच्या नेतृत्वात झालं, काँग्रेसनं निवडणूकही त्यांच्याच नेतृत्वात लढवली मात्र जेव्हा सत्तास्थापन करण्याची वेळ आली, तेव्हा मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली गेहलोत यांना. या घटनेमुळं त्यांनी आपलं हायकमांडमधलं वर्चस्व सिद्ध केलं होतंच.
पुढं नोव्हेंबर २०२१ मध्ये राजस्थानच्या मंत्र्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले. सचिन पायलट राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ घडवून आणणार अशी चर्चाही झाली, मात्र प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही. गेहलोत त्यांची खुर्ची कायम राहिली, उलट सचिन पायलट यांची झेप पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदापर्यंतच सीमित राहिली.
जवळपास ६-७ महिन्यांपूर्वी घडलेलं राजीनामा नाट्य, राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर व्यक्त झालेली उघड नाराजी, तिन्ही उमेदवारांच्या विजयासाठी गरजेचा असलेला पाठिंबा, विरोधी गोटात केलेली खळबळ आणि सगळ्यात मुख्य म्हणजे अचूक पार पाडलेली मतदान प्रक्रिया… या सगळ्या पातळ्यांवर गेहलोत मॅजिकनं आपलं काम केलं आणि काँग्रेसनं भाजपला धोबीपछाड दिला.
म्हणूनच हरण्याची शक्यता असलेला डाव पालटणं गेहलोतांच्या डाव्या हातचा मळ ठरला.. पुन्हा एकदा!
हे ही वाच भिडू:
- नुसता पेन बदलल्याने सुभाष चंद्रांनी राज्यसभा गाठली होती
- गहलोत असा माणूस आहे, ज्याला दूध दिलं तरी तो पहिला ते मांजराला प्यायला देतो
- शहा-पटेलांच्या राड्यात राज्यसभा निवडणूकीचा खुट्टा मजबूत झाला होता..