ज्याला पाकिस्तानात पाठवायचं होतं, त्यालाच भाजपने खासदार केलं..!!!

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यसभेतील रिक्त होणाऱ्या ४ जागांसाठी नवीन नियुक्तीस आज मंजुरी दिली. यामध्ये प्रसिद्ध नृत्यांगना सोनल मानसिंग, प्रख्यात मूर्तिकार रघुनाथ महापात्रा, माजी खासदार आणि दलित नेते राम शकल यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या राकेश सिन्हा यांचा समावेश आहे.
राष्ट्रपतींच्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्त करण्यात आलेल्यांपैकी राकेश सिन्हा यांच्याशी संबंधित एक किस्सा अतिशय रंजक आहे. त्यांच्या राज्यसभेवरील नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर खास ‘बोल भिडू’च्या वाचकांसाठी हा किस्सा.
इस देश में रेहना होगा, तो वंदे मातरम केहना होगा..!!!
जवळपास सर्वच हिंदुत्ववादी संघटनांचा हा हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेला मंत्र. भाजप, संघ परिवार आणि हिंदुत्ववादी संघटनांमधील बहुतेक नेते लोकांना देशभक्तीचे सर्टिफिकेट देण्यासाठी ‘वंदे मातरम’ या गीताचा आधार घेत असतात. तुम्हाला वंदे मातरम गाता येत असेल तर तुम्ही देशभक्त, नाहीतर मग पाकिस्तानात निघून जायचं असं हे या नेत्यांचं अजब तर्कट. हाच तर्क जर संघाने राकेश सिन्हा यांना लावला असता तर सिन्हांनी आतापर्यंत पाकिस्तानात असायला हवं होतं, परंतु यापुढे ते राज्यसभेचे खासदार असणार आहेत.
हा किस्सा आहे टीव्ही चॅनेलवरील चर्चेमधला. तर अशीच वंदे मातरम संदर्भातील चर्चा एनडीटीव्ही या न्यूज चॅनेलवर सुरु होती. राकेश सिन्हा हे संघाचे प्रवक्ते म्हणून चर्चेत सहभागी होती. चॅनेलवरील अँकर निधी राजदान यांनी राकेश सिन्हा यांना विचारलं की तुम्हाला वंदे मातरम गायला आवडेल का..? यावर सिन्हांचं उत्तर असं की ‘का नाही’
हाच मुद्दा पकडून निधी राजदान यांनी सिन्हा यांना वंदे मातरम गाऊन दाखवण्याविषयी संगीतलं. यावेळी मात्र सिन्हा यांची गडबड झाली. त्यांनी सारवासारव करून विषयांतर करण्याचा प्रयत्न केला. वंदे मातरम असं गीत आहे की हिंदी आणि संस्कृत येत नसलेल्या कुणाच्याही तोंडातून ते सहज बाहेर येऊ शकतं, असा प्रतिवाद सिन्हा करत होते पण त्यांनी स्वतः मात्र हे गीत गायचं टाळलं.
सिन्हांनी हा चेंडू स्टुडीओमध्ये बसलेल्या कलावंत आणि दिग्दर्शक आमीर रझा हुसैन यांच्या पारड्यात फेकला. त्यांनी मात्र स्टुडीओत लाईव्ह चर्चेत वंदे मातरम म्हणून दाखवत सिन्हांचं आव्हान अगदी सहजरित्या परतवून लावलं होतं.
कोण आहेत राकेश सिन्हा..?
राकेश सिन्हा हे व्यवसायाने प्राध्यापक असून गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आणि भाजपशी संबंधित आहेत. कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये पत्रकार म्हणून देखील काम केलेलं आहे. दिल्ली येथील ‘इंडिया पॉलिसी फौंडेशन’ नावाच्या थिंक टँकचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार याचं राकेश सिन्हा यांनीच लिहिलेलं चरित्र भारत सरकारकडून प्रकाशित करण्यात आलेलं आहे. याव्यतिरिक्त टीव्ही चॅनेलवरील चर्चांमधील संघाचे प्रवक्ते म्हणून देखील ते घराघरात पोहोचलेले आहेत.