खास दिल्ली स्टाईल बेफिकीरीने तो जगला पण याच बेफिकिरीमुळे त्याचा घात केला..

तारीख २३ फेब्रुवारी १९९८, बांगलादेशमध्ये वंगबंधू स्टेडियमवर ढाका प्रीमियर लीग सुरु होतं. फायनल मच होती अबहानी क्रीडा चक्र विरुद्ध मोहमेडन स्पोर्टिंग क्लब. अबहानीचक्रचा नेहमीचा कप्तान मोहम्मद अमिनुल इस्लामच्या जागी कीपर खालिद मसूद तात्पुरती कॅप्टन्सी करत होता.

अबहानी टीमला जिंकण्यासाठी विकेटची खूप आवश्यकता होती.

कप्तानने बॉलिंग चेंज केली. लेफ्ट आर्म स्पिनर सैफुल्ला खानला बोलवले. त्याने पहिले तीन बॉल टाकले पण मेहराब हुसेनने ते व्यवस्थित खेळून काढले. खालिद मसूदला वाटलं की याला आउट करायचं झालं तर फोरवर्ड शोर्ट लेगवर एखादा खेळाडू उभा करावा. त्याने चौथ्या बॉलच्या आधी फिल्डिंग बदलली.

फोरवर्ड शोर्ट लेग म्हणजे अगदी बॅट्समनच्या पुढ्यात एक पावलावरची फिल्डिंग पोजिशन. येथे उभारणाऱ्या फिल्डरला अतिशय सतर्क राहावे लागते आणि म्हणूनच टीमच्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाला तिथे उभ केलं जातं. अबहानी टीमचा सर्वोत्तम फिल्डर होता सुप्रसिद्ध भारतीय क्रिकेटर रमण लांबा.

मुळचा मेरठचा असणारा रमण लांबा आपल्या फिटनेस साठी फेमस होता.

दिल्लीकडून रणजी खेळताना त्याने अनेक विक्रम केले होते. दोन वेळा त्रिशतक झळकवल होतं. दिल्ली रणजी टीमचा तो कप्तान देखील होता. त्याला खरी प्रसिद्धी त्याच्या फिल्डिंग मुळे मिळाली. आपल्या पहिल्याच सिरीजमध्ये पाकिस्तानच्या अब्दुल कादिरचा कपिलदेवच्या बोलीन्ग्व्र त्याने घेतलेला अशक्यप्राय कच जगभरात फेमस झाला.

लोक त्याला भारताचा नेक्स्ट एकनाथ सोलकर म्हणू लागले. सोलकर प्रमाणेच फोरवर्ड शोर्ट लेगचा जादुगार अशी त्याला ओळख मिळाली.

फिल्डिंग प्रमाणे त्याची बॅटिंगही प्रचंड आक्रमक होती. ऑस्ट्रेलिया विरुद्ध् त्याला भारतासाठी ओपनिंग करायची संधी मिळाली. त्याने आणि के.श्रीकांतने त्या सिरीजमध्ये धुव्वाधार सुरवात करून दिली. पहिल्या पंधरा ओव्हर मध्ये त्यांनी दोन वेळा शंभरच्या वर धावा केल्या.

या इनिंग पाहूनच पुढे जयसूर्या आणि कालूवितरनाला आयडिया सुचली आणि त्यांनी श्रीलंकेला १९९६चा वर्ल्डकप जिंकून दिला.

रमण लांबाची ओळख वनडे प्लेअर अशीच होती. तरी त्याने भारतासाठी काही कसोटी सामने देखील खेळले मात्र तिथे काही चमक दाखवू शकला नाही आणि त्याच्या जागी अझरूद्दीनला संधी मिळाली. लांबा आपल्या स्ट्रोकप्लेयिंग गेम मुळे जगभर प्रसिद्ध होता. भारतीय संघाची दारे बंद झाल्यावर तो काउंटी खेळू लागला. आयर्लंडच्या टीमकडूनही त्याने काही सामने खेळले.

अशातच त्याला बांगलादेशच्या ढाका प्रीमियरलीग खेळण्याची संधी मिळाली. पुढे अनेक वर्षांनी भारतात आयपीएल सुरु झाला मात्र त्याच्या आधीच ही संकल्पना बांगलादेशमध्ये राबवली होती. रमण लांबा स्टार प्लेअरम्हणून ढाका प्रीमियरलीग खेळू लागला. तिथे तो प्रचंड हिट झाला. बांगलादेशच्या अजून बाल्यावस्थेत असलेल्या बॉलिंगला ठोकून काढण्यात त्याला खूप मज्जा यायची.

गंमतीमध्ये स्वतःला तो “ढाका का डॉन” म्हणवून घ्यायचा.

तर हा ढाका का डॉन आपल्या कप्तानच्या सांगण्यावरून आपल्या आवडत्या फोरवर्ड शोर्ट लेगवर फिल्डिंग ला आला. खालिद मसूदने त्याला हेल्मेट घालायला सांगितले. पण रमणने नकार दिला. त्याला वाटलं की ओव्हरचे फक्त दोनतीन बॉल शिल्लक आहेत, एवढ्यासाठी कुठे हेल्मेट घालायची. तसही तो बऱ्याचदा बिनाहेल्मेटची फिल्डिंग करायचा.

सैफुल्लाने ओव्हरचा चौथा बॉल टाकला. मेहराब हुसेनने जोरात बॅट फिरवली आणि काही कळायच्या आत बॉल शोर्ट लेगवर उभ्या असलेल्या रमण लांबाच्या डोक्यावर आदळला. बॉलचा वेग एवढा प्रचंड होता की लांबाला लागल्यावर तो उडून कीपरच्या हातात जाऊन पडला. मेहराब हुसेन आउट झाला. सगळी टीम जल्लोष करू लागली.

विकेटकीपर कप्तान खालिद मसूदने त्याला मिठी मारायला आलेल्या सहकार्यांना बाजूला करत रमण लांबा कुठे आहे ते पाहिले. जमिनीवर कोसळलेला रमण लांबा हळूहळू उभा राहिला होता. सगळी टीम त्याच्या दिशेने धावली.

लांबाने आपण ठीक असल्याचे सांगितले आणि स्वतःच्या पायावर कोणाचीही मदत न घेता पव्हेलीयनमध्ये परतला. 

ड्रेसिंग रूमवर उपस्थित असणाऱ्या फिजिओने त्याला तपासलं. वरून तरी काही जखमा जाणवत नव्हत्या. पण रमण लांबाच्या वेदना प्रचंड वाढल्या होत्या. तिथेच शेजारी उभ्या असलेल्या मोहम्मद अमिनुल इस्लामला तो म्हणाला,

“बुल्ली मै तो मर गया यार !!”

हे रमण लांबाचे शेवटचे शब्द ठरले. काही क्षणातच तो कोम्यात गेला. त्याला ढाक्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आल. त्याच्या उपचार करण्यासाठी दिल्लीहून बेस्ट न्युरोसर्जन खास विमानाने आला. पण काही उपयोग झाला नाही. तीन दिवसांनी रमण लांबाचा मृत्यू झाला.

रमण लांबाच्या जाण्याने फक्त भारतीय क्रिकेटच नुकसान झालं अस नाही. तर बांगलादेशच्या क्रिकेटसाठी देखील हा मोठा झटका होता.

बांगलादेशमध्ये क्रिकेट रुजाव यासाठी प्रयत्न करणाऱ्यामध्ये रमण लांबा आघाडीवर होता. आपल्या खास दिल्ली स्टाईल बेफिकीर आक्रमकतेने तो जगला पण या आक्रमकतेमुळे त्याचा घात केला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.