प्रचारस्थळी अटलजी उशिरा पोहचले पण तोवर पुण्याचे उमेदवार त्यांची वाट बघून निघून गेले होते..

पुणेकर म्हणजे वेळेला पक्के. त्यांचं सगळं काम आखीव रेखीव असत असं म्हणतात. दुपारची १ ते ४ ची  झोप तर पुणेकरांना किती प्रिय आहे यावरून इंटरनेटवर मिम करून करून लोकांनी ऊत आणलाय. पण काहीही म्हणा यात अतिशयोक्ती नाही.

मध्यंतरी एक निवडणूक होती, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात दुपारी प्रचाराला आले होते. योगायोगाने त्यांना पोहचेपर्यंत दुपार झाली. सभा पुण्यातल्या भाजपच्या बालेकिल्ल्यात होणार होती. प्रचंड गर्दीत आपलं स्वागत होणार असं फडणवीस यांना वाटत होतं पण तिथं पोहचले आणि त्यांना धक्काच बसला.

प्रचारस्थळावर सगळ्या रिकाम्या खुर्च्या होत्या. फडणवीसांनी कार्यकर्त्यांना विचारलं की आपण वेळेच्या आधी पोहचलो कि काय? पण उमेदवार  पुढं आले म्हणाले साहेब तुम्ही वेळेत आलाय. पण हे पुणे आहे. इथं लोक दुपारी आमरस पुरी खाऊन ताणून देतात. जरी ब्रम्हदेव जरी आला तरी ते घराबाहेर येत नाहीत.

फडणवीसांची सभा गंडली पण  त्या निवडणुकीत भाजपचे सगळे उमेदवार निवडून आले हि गोष्ट अलाहिदा. काहीही झालं तरी पुणेकरांनी मुख्यमंत्र्याना आपल्या swagचा स्वाद अनुभवायला लावला हे मात्र खरं. 

असाच एक अनुभव माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी याना देखील आला होता.

गोष्ट आहे १९७१ सालची. लोकसभा निवडणूका होत्या. पुण्यात काँग्रेसकडून मोहन धारिया यांना तिकीट मिळालं होतं. तर त्यांच्या विरोधात उभे होते रामभाऊ  म्हाळगी जनसंघाकडून उभे होते. 

हा काळ म्हणजे इंदिरा गांधी यांच्या लोकप्रियतेच्या शिखरावर असण्याचा काळ होता. जनसंघ हा पक्ष देशपातळीवर अजूनही चाचपडत होता. अटलबिहारी वाजपेयी त्यांचे सर्वोच्च नेते होते. एकेकाळी अमोघ वक्तृत्वामुळे पंतप्रधान नेहरूंनी त्यांचा भावी पंतप्रधान असा उल्लेख केला होता. जनसंघाच्या प्रचाराची मुख्य जबाबदारी वाजपेयींवरच होती. 

त्यातल्या त्यात जनसंघाचे हिंदुत्ववादी विचार पोहचलेले आणि जिंकण्याची थोडीफार तरी शक्यता असलेले जे मोजके मतदारसंघ होते त्यात पुण्याचा समावेश होता.

पुण्यात जनसंघाच्या तिकिटावर उभे असलेले रामभाऊ म्हाळगी यांची ओळख महाराष्ट्रातील एक अभ्यासू नेता अशी होती. रामभाऊ म्हाळगी यांची जडणघडण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत झाली. पारतंत्र्याच्या काळात केरळ येथे संघ प्रचारकाचे काम केले. १९४८ साली गांधी हत्येनंतर संघावर बंदी आली. तेव्हा त्यांनी भूमिगत राहून या अन्यायाविरुद्ध आंदोलन केले.

जनसंघाची स्थापना झाल्यावर महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून जाणारे ते पहिले आमदार होते. पुढे जनसंघचे प्रदेशाध्यक्ष बनले. महाराष्ट्रात संघाची विचारसरणी रुजवण्यात रामभाऊ म्हाळगींचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यांच्या अभ्यासूवृत्ती, सुसंस्कृतपणा, साधेपणामुळे जनसंघ, भाजप यांचे द्रोणाचार्य अशी ओळख त्यांनी मिळवली. 

त्यांचे व अटलबिहारी वाजपेयी यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. देशाचं हित हेच कर्तव्य आणि तेच सगळ्यात आधी- हा दोघांच्याही विचारातला समान धागा असल्यामुळे त्यांच्यात हा जिव्हाळा होता.

१९७१ च्या निवडणुकीवेळी स्वतः अटलबिहारी वाजपेयी दिल्ली वरून त्यांच्या प्रचाराला पुण्याला येणार होते. सकाळी दहा वाजता अलका चित्रपटगृहाच्या चौकात अटलजींची सभा होणार असं ठरलं होतं. ती सभा आटोपून हडपसरला साडेबारा वाजता म्हाळगी यांची सभा होणार होती. काही कारणाने अटलजींना यायला उशीर होत होता.

त्या काळात लँडलाइन फोन होता. रामभाऊ म्हाळगी यांचा व अटलजींचा कसाबसा संपर्क झाला. रामभाऊ म्हाळगी यांनी वाजपेयींना आपण तुमची वाट बघून पुढच्या सभेला जात असल्याचं सांगितलं.  तेव्हा अटलजींनी ‘तुम्ही घ्याल तो निर्णय मान्य!’ असा निरोप रामभाऊंना दिला.

आणि खरंच  तेव्हा रामभाऊंनी अलका चित्रपटगृहाच्या चौकातील सभेत भाषण करून पुढे हडपसरच्या सभेला निघून देखील गेले.

अटलजी उशिरा पोहचले व त्यांनी उमेदवार नसताना सभा घेतली. ‘तुम्ही उमेदवार आहात, तुमच्या प्रचारासाठी मी येत असताना तुम्ही पुढे निघून जाणार का?’ वगैरे कुठलेही आढेवेढे त्यांनी घेतले नाहीत. कारण मानापमान, लहान-मोठेपण या गोष्टींचा खरंच या दोघा व्यक्तिमत्त्वांना स्पर्शही नव्हता.

दोघांच्यातील जिव्हाळा, मैत्री यात कधीही खंड पडला नाही. वाजपेयी जेव्हा पुण्याला यायचे तेव्हा रामभाऊ म्हाळगी यांच्या शनिवार पेठेतल्या छोट्याशा घरात हमखास जायचे. अगदी कौटुंबिक पातळीवरची त्यांची मैत्री हा पुणेकरांसाठी अभिमानाचा विषय होता.

पुढे जेव्हा जनसंघ विसर्जित करून भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. तेव्हा देशातील लोकप्रतिनिधींच्या संघटनात्मक बांधणीची जबाबदारी अटलजींनी रामभाऊंकडे सोपवली. भाजपचे महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी रामभाऊ म्हाळगी यांनी सांभाळली.

पुढे रामभाऊ म्हाळगी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृतींना वंदन म्हणून भारतीय जनता पक्षाच्या मुंबई येथील प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेचे नाव रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी असे देण्यात आले. 

२००३ साली अटलजी पंतप्रधान असताना भाईंदरमधील उत्तन येथे ‘रामभाऊ  म्हाळगी प्रबोधिनी’चं लोकार्पण करण्यात आलं. लोकार्पणानंतर पंतप्रधान अटलजी आणि त्यांचे परममित्र उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी प्रबोधिनीत मुक्काम केला. सामान्यत: पंतप्रधान आणि उपपंतप्रधान सुरक्षेच्या कारणासाठी एकत्र प्रवास करत नाहीत, एकत्र राहत नाहीत. असं असतानाही हे दोघे म्हाळगी प्रबोधिनीत शेजारी शेजारी राहिले, हा एक दुर्मीळ योग होता. हि रामभाऊ म्हाळगी यांना त्यांनी वाहिलेली श्रद्धांजलीच होती.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.