महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना हवाईसुंदरीला छेडल्याप्रकरणी राजीनामा द्यावा लागला

गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. महाराष्ट्रातील राजकीय स्थिती प्रचंड अस्थिर असण्याचा हा काळ. सत्ता कॉंग्रेसचीच होती पण अंतर्गत स्पर्धा इतकी होती की टोप्या बदलाव्या त्याप्रमाणे मुख्यमंत्री बदलत होते.

आपल्या मर्जीतल्या व्यक्तींना मुख्यमंत्री करून महाराष्ट्रातील सत्ता ताब्यात ठेवण्याचा सल्ला इंदिरा गांधी यांना त्यांच्या खूषमस्कर्यानी दिला होता. यामुळे अंतुले, बाबासाहेब भोसले यांना मोठा जनसंग्रह नसूनही मुख्यमंत्री बनवण्यात आलं. पण राज्यातील असंतोष वाढत गेला.

अखेर वसंतदादा पाटील यांना मुख्यमंत्री पदी परत बोलवण्यात आलं.

मात्र त्यांच्यावर दबाव राहावा म्हणून अॅड. रामराव आदिक या निष्ठावंतांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं.

रामराव आदिक हे मुळचे नगर जिल्ह्यातील खानापूरचे. इंग्लंडमधून त्यांनी कायद्याच शिक्षण घेऊन बॅरीस्टर ही पदवी संपादन केली होती. मुंबईच्या हाय कोर्टात त्यांची प्रॅक्टीस चालायची. एक हुशार वकील म्हणून त्यांचं चांगलच नाव झाल होत. त्यांच्या अनेक केसेस गाजल्या देखील होत्या.

महाराष्ट्र राज्याचे अॅड्व्होकेट जनरल म्हणून देखील त्यांनी काम केलं होत.

रामराव आदिक यांना राजकारणात रस होता. त्यांनी महाराष्ट्र हितवर्धिनी नावाचा पक्ष स्थापन केला होता. तो पुढे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत विलीन झाला. अनेकदा रामराव आदिक यांनी बाळासाहेब यांच्यासोबत सभा देखील गाजवल्या होत्या.

मुंबई कॉंग्रेसच्या रजनी पटेल यांनी त्यांना सक्रीय राजकारणात आणलं. पुढे जेव्हा कॉंग्रेस फुटली तेव्हा इंदिरा गांधी यांच्या सोबत उभे राहणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये रामराव आदिक हे होते. यामुळेच त्यांच्यावर गांधी परिवाराची खास मर्जी होती.

यामुळेच रामराव आदिक यांना उपमुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली होती.

पण मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याशी त्यांचे बऱ्याचदा खटके उडत असत. वसंतदादांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांच्याशी त्यांची खडाजंगी झाली होती. वसंतदादा यांना हा दिल्लीतून लादलेला उपमुख्यमंत्री नको होता.

पण योगायोगाने एक घटना घडली ज्यामुळे रामराव आदिक यांना राजीनामा द्यावा लागला.

एकदा रामराव आदिक जर्मनीच्या हॅनोव्हर येथे प्रदर्शनाला भेट देण्यासाठी सरकारी दौऱ्यावर गेले होते. पण एअर इंडियाच्या विमानात त्यांची तिथल्या क्रूसोबत खडाजंगी झाली.

त्याकाळी प्रसिद्ध झालेल्या इंडिया टुडे या मासिकात ही घटना सविस्तर मांडण्यात आली होती.

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानुसार रामराव आदिक यांनी विमानप्रवासादरम्यान वाईनप्राशन केले होते. जेव्हा फ्लाईट अटेंडंट विमानात जेवण सर्व्ह करत होते तेव्हा उशीर झाला म्हणून आदिक यांचा पारा चढला व नशेत त्यांनी स्वतःवरील नियंत्रण गमावले.

यावेळी त्यांनी फ्लाईट अटेंडंट यांना शिवीगाळ केली, त्यांना आवरण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या अंगावर धावून गेले.

यावेळी एका एअरहोस्टेसबरोबर त्यांनी गैरवर्तन देखील केले. विमानाच्या पायलटला यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. अखेर आदिक यांची शुद्ध हरपली व तेव्हाच ते शांत झाले.

पुढे हॅनोव्हर मध्ये उतरल्यावर त्यांना आजारी माणसाच्या व्हीलचेअरमध्ये बसवून एअरपोर्टमधून बाहेर नेण्यात आलं तेव्हा देखील त्यांचा आरडाओरडा सुरूच होता. जर्मनीच्या हॉटेलमध्ये देखील त्यांनी गोंधळ घातला व तिथल्या एका वेट्रेसशी देखील गैरवर्तन केले.

जर्मनी मधल्या वर्तमानपत्रात देखील नाव न घेता या प्रकरणाची चर्चा झाली होती. 

हे प्रकरण भारतात जास्त चिघळल नसत, पण रामराव आदिक यांच्या दुर्दैवाने मोहम्मद युनुस या ट्रेड फेअर ऑथोरिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष त्या दिवशी त्यांची दिल्लीला जाणारी फ्लाईट लेट असल्यामुळे हॅनोव्हर एअरपोर्टवर उपस्थित होते. त्यांनी तो प्रकार पाहिला व भारतात परतताच ही बातमी थेट पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कानावर घातली.

संपूर्ण भारतात या लाजीरवाण्या बातमीमुळे खळबळ उडाली. महाराष्ट्र सरकारची नाचक्की झाली. कॉंग्रेसवर प्रचंड टीका होऊ लागली.

मात्र मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी रामराव आदिक यांच्या पाठीशी राहायचं ठरवलं.

रामराम आदिक यांच्या बचावासाठी त्यावेळच्या १४ मंत्र्यानी पत्रक काढून त्यांची पाठराखण केली. त्यांनी तसं काही केलंच नाही असा दावाही त्यांनी केला. हे सगळ भाजप व विरोधीपक्षाने रचलेलं कुभांड आहे अस सांगितल गेलं. आदिक यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही

पण  वृत्तपत्रांचा दबावच एवढा होता की आदिकांना राजीनामा देण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

रामराव आदिक यांनी विमानात जे मद्य दिलं होतं ते भेसळयुक्त होतं त्यामुळं आपल्याला त्रास झाला असा खुलासा दिला व राजीनामा देताना यापुढे कधीही दारूला स्पर्श देखील करणार नाही असं जाहीर केलं.

राजीनाम्यानंतर सर्व वादळ शांत झाल. ही घटना खरी होती का फक्त विरोधकांचे आरोप हे मात्र गुलदस्त्यातच राहिलं.

पुढचे काही वर्ष रामराव आदिक हे राजकारणापासून दूर राहिले. नव्वदच्या दशकात त्यांनी पुरागमन केलं, महाराष्ट्राचे अर्थमंत्रीपद देखील भूषवल. १९९१ साली त्यांनी मांडलेला राज्याचा सरप्लस बजेट खऱ्या अर्थाने गाजला. एक दिग्गज वकील, एक अभ्यासू मंत्री, शिक्षणमहर्षी म्हणून त्यांची ओळख कायम राहिली.

संदर्भ- https://www.indiatoday.in/magazine/indiascope/story/19840515-drinking-habit-costs-ramrao-adik-maharashtra-deputy-cm-post-803601-1984-05-15

 हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.