सुशीलकुमार शिंदे प्ले बॉय आहेत ही अफवा पसरली आणि त्यांचं मुख्यमंत्रीपद हुकलं!

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मुदत २४ जुलैला संपणार आहे. तत्पूर्वी, २९ जूनपर्यंत नवीन राष्ट्रपती पदासाठी अर्ज करावा लागणार आहे. एनडीएच्या उमेदवारपुढं तगडा उमेदवार देण्यासाठी विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नकार दिल्यानंतर सर्वसमावेशक उमेदवार म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्याकडे पाहिले जात आहे.

दिल्लीतून निरोप आल्यानंतर शिंदे हे तातडीने दिल्लीला पोहचले असून आता त्यासंदर्भात बैठक सुरु आहे. 

मात्र असाच एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याच्या आधी  मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून सुशिलकुमार शिंदे यांचं नाव आघाडीवर होतं. मात्र ऐनटायमाला एक अफवा पसरली आणि सुशील कुमार शिंदेंना मुख्यमंत्रीपदासाठी मुकावं लागलं. त्याचाच हा किस्सा

ही गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अस्थिरतेच वातावरण कायम होत. जवळपास पाच वर्षात महाराष्ट्राने चार मुख्यमंत्री बघितले. दिल्लीकरांच्या लहरीप्रमाणे राज्यातलं दळ हलत होते. वसंतदादा पाटील सोडले तर अंतुले, बाबासाहेब भोसले वगैरे मुख्यमंत्री दिल्लीतून नेमण्यात आले होते.

दर काही दिवसांनी मुख्यमंत्र्यांची खुर्ची हलू लागली की राज्यातले नेते फिल्डिंग लावण्यासाठी दिल्लीला जायचे. एकमेकांवर कुरघोडी केली जायची.

संभाव्य नेत्यांच्या चर्चेत तरुण सुशीलकुमार शिंदे यांचं नाव वरच्या स्थानावर असायचं.

सुशीलकुमार शिंदे यांचा जन्म एका गरीब दलित कुटुंबात झाला. रात्रशाळेत शिकून दिवाणी न्यायालयात शिपाईची नोकरी करून त्यांनी स्वतःच शिक्षण पूर्ण केलं. पोलीस सब इन्स्पेक्टर झाले. पण यशवंतराव चव्हाण, शरद पवार या नेत्यांच्या आग्रहामुळे राजकारणात आले. शरद पवारांनी जेव्हा दादांचं सरकार पाडलं तेव्हा सुशीलकुमार त्यांच्या सोबत होते. पण काही दिवसातच परत कॉंग्रेसचा आसरा घेतला.

सुशीलकुमार यंग डॅशिंग अर्थमंत्री होते. आपल्या मोहक हास्यामुळे विरोधकांना जिंकून घेण्याची किमया त्यांना जमली होती.

गांधी घराण्याशी निष्ठा त्यांनी सिद्ध केली होती. शिवाय राज्यातही कानाकोपऱ्यात त्यांचा जनसंपर्क चांगला होता. यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनाच संधी मिळणार असाच अनेकांचा अंदाज होता.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण यावरून दिल्लीतही वातावरण तापलं होतं.

एकदा एका जेष्ठ पत्रकार अशोक जैन व कॉंग्रेसचे सरचिटणीस जी.के.मुपणार यांची अनौपचारिक गप्पा सुरु होती. मुळचे तामिळनाडूचे असलेले मुपणार हे महाराष्ट्रातील संघटनात्मक बाबींचे प्रमुख होते. बोलता बोलता जैन त्यांना म्हणाले कि,

“सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी चांगले उमेदवार आहेत.”

यावर मुपणार ताडकन उत्तरले,

“शक्य नाही कारण ते प्ले बॉय आहेत.” 

अशोक जैन यांच्या लक्षात आलं की दूर दिल्लीत बसलेल्या मुपणार यांच्या मनात कोणीतरी पक्षातल्याच विरोधकाने सुशीलकुमार शिंदे यांच्या बद्दल अफवा पसरवली आहे. जास्त काही तपशील विचारण्याच्या भानगडीत ते पडले नाहीत.

पण दुसऱ्या दिवशी आपल्या वार्तापत्रात मुख्यमंत्रीपदाच्या संभाव्य नावांचा उहापोह करताना मुपणार यांचे नाव न घेता ” पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याच्या मते सुशीलकुमार शिंदे हे रंगराव आहेत” असा उल्लेख केला.

त्यावेळी मंत्री असल्यामुळे सुशीलकुमार शिंदे राज्यात कुठेतरी दौऱ्यावर होते. ही बातमी त्यांच्या पर्यंत पोहचली. त्यांच्या डोक्यात धोक्याची घंटा घणघणली. दौरा अर्ध्यावर टाकून त्यांनी तडक दिल्ली गाठली. अशोक जैन यांना फोन केला आणि विचारलं,

“मला रंगराव म्हणणारे ते पदाधिकारी कोण?”

सर्वसामान्यपणे पत्रकार कधी आपले सूत्र बातमीचा सोर्स सांगत नाहीत तरी या प्रकरणातील गांभीर्य ओळखून अशोक जैन यांनी सुशीलकुमारांना मुपणार यांचे नाव अप्रत्यक्षरीत्या सांगितले. सुशीलकुमार यांना धक्का बसला.

मुपणार यांच्याशी त्यांची विशेष घसट नव्हती त्यामुळे ते आपल्याला भेटतील का किंवा त्यांचा पीए तरी भेटेल का याची काळजी त्यांना पडली.

त्यांची व मुपनार यांची भेट झाली कि नाही हे माहित नाही पण श्रेष्ठींच्या मनात बसलेल्या गैरसमजामुळे सुशील कुमारांचं मुख्यमंत्रीपद हुकलं ते हुकलंच. पुढच्या काळात स्वतःची प्रतिमा उजळून यावी यासाठी सुशीलकुमार शिंदेनी विशेष प्रयत्न केले. जनतेत एक सभ्य व स्वच्छ चारित्र्याचा नेता म्हणून ओळख निर्माण केली.

पुढे अनेक वर्षांनी म्हणजे २००३ साली त्यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची अखेर मिळाली.

हा किस्सा जेष्ठ पत्रकार अशोक जैन यांनी आपल्या राजधानीतून या पुस्तकात सांगितला आहे.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.