थेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार आहे.’

सत्तरच्या दशकाचा काळ. जगभरात शीतयुद्धामुळे स्फोटक वातावरण बनले होते. आपल्या देशाने देखील १९६२चे चीनचे युद्ध आणि १९६५चे पाकिस्तानचे युद्ध झेलले होते. यातील चीनच्या युद्धात आपला मानहानीकारक पराभव झाला होता. 

या पराभवास जबाबदार असणाऱ्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे शत्रुपक्षाच्या सशक्त आणि कमजोर बाजूची माहितीच भारताकडे नव्हती.आपल्या सुरक्षा यंत्रणा ती मिळविण्यात अयशस्वी ठरल्या होत्या.

जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या तेव्हा त्यांनी  सर्व परिस्थिती बघता देशाची एकूणच सुरक्षा व्यवस्था आणि शेजारी राष्ट्रांमधील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी एका वेगळ्या गुप्तचर संस्थेची स्थापना करण्याचा घेतला.

तोपर्यंत भारतात खास हेरगिरीसाठी म्हणून कुठली संस्था अस्तित्वात नव्हती. ‘इंटेलिजन्स ब्युरो’अर्थात आयबी  तोपर्यंत अशाप्रकारचं काम बघत होती. मात्र या स्वतंत्र संस्थेच्या स्थापनेसाठी इंदिरा गांधींनी पाचारण केलं रामेश्वर नाथ काव यांना. त्यांनी व त्यांच्या  २५० अधिकाऱ्यांच्या तुकडीने जगभरातील नामांकित गुप्तचर संस्थांचा अभ्यास करून आपला अहवाल सादर केला.

या अहवालाच्या आधारेच दि. २१ सप्टेबर १९६८ रोजी एका नवीन संस्थेची निर्मिती करण्यात आली.

 ‘रिसर्च अँड अँनालिसिस विंग’ अर्थात ‘रॉ’ 

कोण होते रामेश्वर नाथ काव..?

‘भारताचे मास्टर स्पाय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामेश्वर नाथ काव यांच्या नावाला भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासात फार महत्वाचं स्थान आहे. काश्मिरी पंडित असणाऱ्या काव यांनी आय.बी.मध्ये काम केलेलं होतं. शिवाय माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सुरक्षा यंत्रणेचे प्रमुख म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळलेली होती.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९५० साली ज्यावेळी इंग्लंडच्या राणीने भारताला भेट दिली होती, त्यावेळी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी जवाहरलाल नेहरूंनी काव यांच्यावरच सोपवली होती. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी या दोघांचेही ते विश्वासू समजले जात असत.

अगदी सुरवातीच्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण देण्यापासून ते जगभरातील अनेक महत्वाच्या देशांमध्ये ‘रॉ’चं जाळपसरवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. म्हणूनच रॉच्या पहिल्या बॅचच्या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना ‘कावबॉय’ असं आज देखील ओळखलं जातं.

सुरवातीला या नव्या संस्थेवर लष्करातल्या मोठ्या ऑफिसर्सनी इतक्या सहज विश्वास ठेवला नाही. विरोधी पक्षातले तर अनेकजण रॉ म्हणजे इंदिरा गांधींनी केलेला सरकारी पैशाचा अपव्यय आहे असाच प्रचार करण्यास सुरवात केली होती.

एक घटना घडली ज्यामुळे रॉच महत्व संपूर्ण देशाला पटलं.

१४ जानेवारी १९७१ रोजी रामेश्वरनाथ काव यांनी एक पंचवीस पानाचे पत्र इंदिरा गांधींना लिहिलं. या पत्रात पूर्व पाकिस्तानची सगळी परिस्थिती, तिथून आसाममध्ये येत असलेल्या बांगलादेशी घुसखोरांचे वाढते प्रमाण, पाकिस्तानच्या मुख्य भूमीतील पंजाबी सिंधी नेत्यांशी बंगाली नेत्यांचा वाढत असलेला संघर्ष याची सगळी विस्तृत माहिती दिली होती.

आणि शेवटी सांगितलेलं कि या सगळ्यापासून लक्ष वळवण्यासाठी पाकिस्तान भारताबरोबर युद्ध सुरु करू शकतो.

अनेकांना हे पटलं नाही. इंदिरा गांधींनी मात्र लष्करी सुसज्जता वाढवण्याचे आदेश दिले. असं म्हणतात की याच्याही अगोदर दोन वर्षांपूर्वी काव यांनी इंदिरा गांधींच्या जवळ भविष्यवाणी केली होती की

“पाकिस्तानच्या फाळणीची वेळ जवळ आलेली आहे.” 

पाकिस्तानविरुद्धच्या बांगलादेशी मुक्तिवाहिनीच्या निर्मितीमध्ये रामेश्वरनाथ काव यांचा हात होता असे आरोप आजही केले जातात. काव यांनी रॉ चे अधिकारी पाकिस्तानमध्ये जागोजागी पेरून ठेवले होते. काही हेर तर थेट याह्या खान यांच्या ऑफिसमध्ये देखील होते.

अशाच एका सूत्राच्या हवाल्यावरून काव यांना माहिती मिळाली की पाकिस्तानी लष्कर हल्ला करणार आहे.

असंही सांगितलं जात कि दारूच्या नशेत याह्या खान यांनी कोणाजवळ तरी या हल्ल्याचे उल्लेख केले होते. तो संदेश भारतीय हेराने टिपला आणि सांकेतिक भाषेत रॉ कडे पाठवून दिला.

त्या मेसेजमधला कोड वाचून काव यांनी इंदिरा गांधींना हवाई दलाला अलर्ट करण्याची विनंती केली. तातडीने तसे आदेश देण्यात आले. संपूर्ण एअरफोर्स सुसज्ज उभे होते. सुरवातीला दोन दिवस काहीच घडलं नाही. लष्करी अधिकाऱ्यांच्याकडून चुळबुळ सुरु झाली. हा सगळं फार्सच असल्याचं काही जणांचं म्हणणं होतं.

अखेर एअरफोर्सच्या प्रमुखानी काव यांना स्पष्ट सांगितलं ,

आम्ही हवाई दलाला इतके दिवस सतर्क नाही ठेऊ शकत.

त्यावर काव यांनी त्यांना फक्त आणखी काही दिवस वाट पहा अशी विनंती केली.

नाही होय म्हणत हवाई दल प्रमुख त्यासाठी तयार झाले. आणि काय आश्चर्य दुसऱ्याच दिवशी म्हणजेच ३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने हल्ला केला. पण भारतीय लष्करी यंत्रणा सुसज्ज होती, हवाई दल हाय अलर्टवर उभे होते यामुळे हा हल्ला आपण सहज परतवून लावू शकलो. इतकेच नाही तर पुढच्या आठ दिवसात आपल्या शूरवीर जवानांनी पाकिस्तानी लष्कराला धुळीस मिळवले. त्यांना गुडघ्यावर आणलं.

त्या दिवशी पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून ज्या एजंटने हल्ल्याचा संदेश पाठवलेला त्याचे नाव गूढ राहिले. १९७१ चे युद्ध भारत जिंकला आणि बांगलादेश ची निर्मिती झाली याला रामेश्वरनाथ काव यांचा आणि त्यांच्या रॉच्या जाबांज काव बॉईज यांचे मोठे क्रेडिट होते.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.