कधी प्रश्न पडलाय का, सकाळी ऐकलेलं गाणं दिवसभर डोक्यात का राहतं?

सकाळी घरातनं बाहेर पडताना घरात कुणीतरी लावलेल्या गाण्याचे बोल कानावर पडतात. हे बोल कानावर पडले की घराबाहेर पडल्यावर आपण चालता चालता ते बोल आपल्या बऱ्या-वाईट कशाही आवाजात गुणगुणतो… पुढे दिवसभर मग ते गाणं आपण एकतर गुणगुणतो किंवा मग त्याची चाल डोक्यात वाजत राहते.

तुमच्या सोबतसुद्धा असं नक्कीच घडत असेल, कारण प्रत्येकासोबतच असं घडतं.

पण हे असं का घडतं? त्यामागे नेमकं काय कारण आहे याचा कधी विचार केलाय का? नसेल तरी लोड घेऊ नका. याच प्रश्नाचं उत्तर सांगायला आलोय.

पहिली गोष्ट म्हणजे, 

हे जे एखादं गाणं आपल्या कानात किंवा डोक्यात दिवसभर राहतं त्याला वैज्ञानिक भाषेत इअरवर्म (EarWorm) असं म्हणतात. यात इअर म्हणजे कान आणि वर्म म्हणजे किडा. आता हे असं इअरवर्म का म्हणलं जातं? तर एखादा किडा आपल्या कानाजवळ ज्याप्रमाणे सतत भुणभुण करत राहतो तसंच या गाण्यांचं किंवा म्युझिकचंही असतं.

बरं तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, उगाच कोणतंही गाणं कानात बसत नाही तर, त्यासाठी ते गाणं किंवा म्युझिकचं कम्पोझिशन हे इतर गाण्यांपेक्षा वेगळं, युनिक असलं पाहिजे. त्यासोबतच ते ऐकायला सुरेलही असलं पाहिजे. तरच, ते गाणं आपल्या कानात आणि डोक्यात घट्ट बसतं.

वैज्ञानिक या गोष्टीला  Involuntary Musical Imagery असंही म्हणतात.

आता याचा अर्थ काय तर, अनैच्छिक संगीत प्रतिमा… जे गाणं आपल्या डोक्यात घर करून बसतं, ते गाणं आपण काही ठरवून पाठ करतो किंवा ठरवून ते म्युझिक लक्षात ठेवलेलं असतं असं नाहीये. आपल्या अजाणतेपणी ते गाणं आपल्या लक्षात राहतं म्हणून, त्याला हे असं नाव दिलं गेलंय.

हे गाणं लक्षात ठेवण्यासाठी आपल्या मेंदुला कोणत्याही प्रकारची सुचना द्यावी लागत नाही किंवा मेहनत करावी लागत नाही.

हे असं काहीच न करता गाणं लक्षात कसं राहतं तर, अशी गाणी ऐकताना आपल्या मेंदुतला ऑडिटरी कॉर्टेक्स हा कप्पा सक्रिय होतो. आता हा कप्पा काय असतो हे सांगायचं झालं तर, एखादी गोष्ट जेव्हा आपल्या कानावर पडते तेव्हा ती गोष्ट कानापासून मेंदूपर्यंत जाऊन ती आपल्याला समजते. ती गोष्ट समजण्यामध्ये या ऑडिटरी कॉर्टेक्सचा मोठा रोल असतो. ज्याप्रमाणे एखादी समजून घेतलेली गोष्ट आपल्या मेंदूत घर करून राहते अगदी तसंच या गाण्यांचंही होतं.

आता काही लय हुशार लोकांच्या मते हे असं होणं काही चांगली गोष्ट नाहीये. लोक या गोष्टीची तुलना कम्प्युटरच्या भाषेतल्या व्हायरसशी करतात. कारण, व्हायरसमुळे सुद्धा कमांड न देताच एखादी कृती केली जाते. अगदी तसंच या गाण्यांचं असतं.

मात्र, ही गाणी डोक्यात तशीच राहिली किंवा आपण गुणगुणत राहिलो तरी त्यामुळे आपलं काही नुकसान होत नाही. कम्प्युटरच्या व्हायरसबाबतीत तसं नसतं. कम्प्युटरमधला व्हायरस हा कम्प्युटरसाठी हानीकारक असतो. त्यामुळे, अनेक जणांच्या मते इअरवर्म गाणी ही काही त्रासदायक नसतात.

बरं तरीही तुम्हाला गाणी मेंदूत बसून राहणं नकोच वाटत असेल तर, त्यासाठी एक बेसिक उपाय आहे. हे असं एख्याद्या गाण्याच्या बाबतीत इअरवर्म झाल्यासारखं वाटलं आणि ते गाणं डोक्यात फिरू लागलं की, च्यूईंग गम खायचं.

तुम्ही म्हणाल, च्यूईंग गम खाल्ल्यानं गाणं डोक्यातनं कसं जाईल? तर, च्यूईंग गम खाताना आपल्या अजाणतेपणीच आपलं लक्ष हे त्या च्यूईंग गम चघळण्याकडे जातं आणि त्यामुळं हे गाणं डोक्यातनं निघून जातं. हा उपाय आम्ही सांगत नाही आहोत तर, असं तज्ञच सांगतात.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.